परभणी, दि. 1 (क्रीडा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अजीव अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कबड्डीच्या विकासावर परिसंवाद व चर्चासत्राचे येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी (दि.12) दुपारी 12 ते तीन यावेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली.
`महाराष्ट्रातील कबड्डी ः काल, आज, उद्या' या विषयावर आयोजित परिसंवादात अर्जुन पुरस्कार विजेते तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू शांताराम जाधव (पुणे), श्रीराम भावसार (मुंबई), अशोक शिंदे (मुंबई) यांच्यासह आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय माजी खेळाडू गणेश शेट्टी (मुंबई), रवि करमळकर (मुंबई), सचिव भोसले (मुंबई) हे सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातून उगम पावलेल्या कबड्डी खेळाचा प्रसार जगभर पसरला आहे. यामध्ये शरद पवार यांचे योगदान मोलाचे ठरलेले आहे. त्यांच्या कबड्डीतील योगदानाची ओळख नव्या पिढीतील तरूण खेळाडूंना व्हावी, त्याचबरोबर मराठवाडा व राज्यातील कबड्डी खेळाचा विकास राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व निर्माण करणारा ठरावा, या हेतूने शनिवारी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार वरपुडकर म्हणाले.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह महाराष्ट्रातील राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व कबड्डी प्रेमी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, स्पर्धा आयोजक व कबड्डी प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहून कबड्डीच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी परिसंवादात सहभागी व्हावे, असेही आवाहन आमदार वरपुडकर यांच्यासह उपाध्यक्ष प्रा.सुरेश जाधव, प्राचार्य के.एस. शिंदे, श्रीमंत कदम, संघटनेचे सचिव मंगल पांडे, प्रा.डॉ.यु.डी. सोळंके, पद्माकर कुलकर्णी, प्रा. हरिभाऊ रावळे, आदींनी केले आहे.

COMMENTS