केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या महाआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जन आंदोलनाची संघर्ष समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, रायगड, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी रस्ता रोको, मोर्चे, धरणा, निदर्शने यासारखी आंदोलने झाली. याचाच एक भाग म्हणून हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौंसिलतर्फे माथाडी कामगार, एसटी कामगार, बेस्ट कामगार, गोदी कामगार, महापालिका कामगार, यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चे, धरणे, निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभराच्या कानाकोपऱ्यातुन दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना कडकडीत थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचा मारा केला तरी शेतकरी मात्र मागे हटला नाही, त्यांनी आपले आंदोलन चालूच ठेऊन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तो हाणून पाडला पाहिजे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदीसाठी सर्व कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांना खुली सूट देऊन शासकीय बाजार समित्या संपुष्टात येणार आहेत. त्याला पर्याय खाजगी बाजार समिती स्थापन करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.त्यामुळे नजीकच्या काळात सरकारी बाजार समित्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही व त्यांची जागा खाजगी बाजार समित्या घेतील आणि हळूहळू भांडवलदार व खाजगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी कृषीमालाच्या खरेदीमध्ये निर्माण होणार आहे. ,त्याचप्रमाणे शेतीमालाला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून शेतमालाची कितीही अमर्याद साठवणूक करण्यास केंद्र सरकारच्या नवीन कायद्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे तीनही काळे कायदे जोपर्यंत रद्द करणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र प्रयत्नशील आहे. आज ठाणे येथे झालेल्या भारत बंद आंदोलनात कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते कॉ. विश्वास उटगी, साथी संजय वढावकर, कॉ.एम. ए.पाटील, कॉ.संजय म. गो. यांनी सहभाग घेतला. तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, अध्यक्ष शंकर साळवी, कॉ. विवेक मोन्टेरो, माथाडी कामगारांचे नेते निवृत्ती धुमाळ, एसटी कामगार संघटनेचे नेते संदीप शिंदे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे नेते पी. जी. शिंदे, अरुण मनोरे, नाशिक मिंट टांकसाळचे नेते राजेश टाकेकर, सांगलीत विकास मगदूम, गोदी कामगारांचे नेते राजाराम शिंदे, रमेश कुऱ्हाडे तसेच अनेक कामगार संघटनांचे पदाधिकारी, कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र

COMMENTS