सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पुढाकार घेऊन सोनपेठमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरु करण्याचा प्रश्न राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लावून धरला होता.विटेकर यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सोनपेठ बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फेडरेशनमार्फत होणाऱ्या कापूस खरेदीसाठी http://parbhani.gov.in/cotton या संकेतस्थळावर आपली नोंदणी करत आपला कापूस विक्री करण्याचे आवाहन केले आहे.सदर नोंदणी दिनांक ०१ डिसेंबर सकाळी १० वाजेपासून ते ६ डिसेंबर रात्री १२ पर्यंत नोंदणी होणार आहे.त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीस आणण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळवण्यात येणार असल्याची माहीतीही विटेकर यांनी दिली.सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजेश विटेकर नेहमी प्रयत्नशील असतात.शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नी मागील वर्षी त्यांनी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय कापूस खरेदीचे दोन केंद्र मंजूर करून आणले होते.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.यावर्षी सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी केंद्र तालुक्यात नसल्याने बाहेर तालुक्यात जाऊन आपला कापूस विक्री करावा लागत असल्याने विटेकर यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता.आणि तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र देण्याची मागणी लावून धरली असता पाटील यांनी लवकरच सोनपेठला वाढीव शासकीय कापूस खरेदी केंद्र देणार असल्याचे सांगितले होते.त्यानुसार शेतकऱ्यांनी आता शासकीय कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी वरील संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहनही विटेकर यांनी केले आहे.

COMMENTS