नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार ) मुदखेड तालुक्यातील महाटी येथील व्यंकटराव ढगे, माधवराव ढगे यांच्यासह अन्य काही लोकांनी जाहीर उपसंपच पदाचा लिलाव करून सविधानाचा अवमान केल्या प्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नायगांव येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास भालेराव यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण जाहिर होताच महाटी ता.मुदखेड येथील काही मुख्य लोकांनी उपसरपंच पदाचा जाहिर बोली लावून लिलाव करून साडे दहा लाख रुपयांत विकत घेण्याचा लज्जास्पद प्रकार केला गेला असून. लोकशाहीची थट्टा करून पवित्र आचारसंहितेचा भंग केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदानाचा हक्क हिरावून भारतीय संविधानाचा अवमान केल्याचा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी बातमी प्रसारित केलेली आहे.
आदर्श आचारसंहितेचा भंग व भारतीय संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाणार असा इशारा कैलास भालेराव यांनी देऊन निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी केली आहे.

COMMENTS