माजलगाव/भास्कर गिरी
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
------------------
चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) हे मल्ल वंशीय राजे जसे भगवान शिवाचे उपासक आणि पूजक होते, तेवढेच ते देवीच्या आदिमाया आणि आदिशक्ति रुपाचेही पूजक घराणे होते. या घराण्यातील राजांनी ज्याप्रमाणे मध्य भारतापासून दक्षिणेतील संपूर्ण राज्यातल्या अनेक गावांतून जशी महादेव आणि इतर देवतांची हजारों मंदिरे बांधली अगदी तशीच त्यांनी देवींची देखील खूप मंदिरे बांधली आहेत. चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) या घराण्यातील राजांनी देशातील अनेक भागांतून बांधलेल्या देवी मंदिरांचा आढावा आपण यावर्षी आजपासून सुरू झालेल्या नवरात्रा निमित्ताने रोज घेणार आहोत. यामुळे अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात देवीच्या आदिमाया आणि आदिशक्ति रूपाची पूजा व आराधना होतं होती हे सिद्ध होते.
नवरात्री हे एक प्राचिन काळापासून चालत आलेले हिंदू पर्व आहे. नवरात्री हा एक संस्कृत शब्द असून, ज्याचा अर्थ 'नऊ रात्री' असा होतो. नवरात्रीच्या या नऊ रात्री आणि दहा दिवस चालणाऱ्या या पर्वात देवीच्या नऊ शक्ति रूपाची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा या नावाने प्रसिद्ध असतो. नवरात्रिच्या नऊ रात्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गा या तिन्ही देवतांच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, ज्यांना नवदुर्गा असे म्हटले जाते. दुर्गा या शब्दाचा अर्थच जीवनातील दु:खांना समाप्त करणारी असा आहे. नवरात्रि हा हिंदूंचा एक महत्वपूर्ण आणि प्रमुख सण मानला जातो, ज्याला संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात देवीची 108 नावे असून तिची एकंदरीत 52 शक्तिपीठे आहेत.
नाशिक- त्र्यंबकेश्वर पासून मराठवाड्याच्या आंध्रप्रदेश बॉन्ड्रीपर्यंत गोदावरी नदी काठावर महाराष्ट्रातील जेवढी तीर्थक्षेत्रे असतील, अशाच क्षेत्रांपैकी एक असलेले क्षेत्र म्हणजे सादोळा हे तीर्थक्षेत्राचे गाव आहे. माजलगाव या तालुक्याच्या गावापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या सादोळा येथील सर्वच हेमाडपंथी मंदिरांचे बांधकाम चाळुक्य नरेश विक्रमादित्य चाळुक्य यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेले आहे, मात्र तरी देखील ऐसपैस जागेवर बांधलेल्या श्री सुवर्णा देवीच्या हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम अगदीच बघण्याजोगे आहे. चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी बांधलेले हे भव्य हेमाडपंथी रचनेतील मंदिर स्टारफिश आकारातील असून, बघणाऱ्या प्रत्येकाच्याच मनाला हे मंदिर मोहहून जाते.
मंदिराच्या उंच जोत्याच्या पाच दगडी पायऱ्याला चढून वर गेल्यावर आपला प्रवेश, मंदिराच्या प्रवेश मंडपात होतो. प्रवेश मंडपाच्या दोन्ही बाजुला मंदिर भिंतीवर देवड्या आहेत, मात्र या दोन्ही देवड्या रिकाम्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही देवतेची मूर्ती ठेवलेली दिसत नाही. मंदिराच्या भव्य सभागृहातील प्रवेश हा छोट्या दगडी दरवाजातून होतो. पण त्यापूर्वी आपणाला मंदिराच्या प्रवेश मंडपातून आत जावे लागते. हा प्रवेश मंडप चार दगडी नक्षीदार खांबावर टेकलेला आहे. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतांना जे प्रवेशिका द्वार लागते, त्याच्या चौकटीवर चाळुक्य राजांनी त्यांची वास्तू निशानी असलेली गणेश पट्टी कोरलेली आहे. तर खाली उंबऱ्यावर दोन कीर्तीमुख कोरलेले आहेत.
दरवाजाच्या खालच्या उंबऱ्यावर कीर्तीमुखा शेजारी दोन्ही बाजूंनी देवाचे रखवालदार जय विजय कोरलेले असून, त्या शेजारी दोन्ही बाजुला नृत्य करणाऱ्या चार चार नृत्यांगना (अप्सरा) कोरलेल्या आहेत. मंदिराचे प्रशस्त सभागृह (नवरंगमंडप) सोळा दगडी खांबावर टेकलेले असून, चालुक्यांनी मंदिरातील खांबावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपातील दक्षिण बाजुला असलेल्या भिंतीवर कोरलेले पंचभैरवाचे शिल्प सर्वांचेच लक्ष वेधून घेईल असेच कोरलेले आहे. मंदिराच्या सभामंडपातून गर्भगृहात जाताना दोन्ही बाजूला दोन देवड्या आहेत. एका देवडीत श्री गणेशाची मूर्ती ठेवलेली असून दुसरी देवडी मात्र रिकामीच आहे.
मंदिराचे प्रशस्त सभागृह (नवरंगमंडप) सोळा दगडी खाम्बावर एकावर एक अशा दगडी शिळा मांडून बनवलेले आहे. चालुक्यांच्या स्थापत्य शैलीने या सभामंडपाचे तीन तीनच्या ओळीने छोटे छोटे नऊ घुमट बनवले आहेत. मंदिराच्या सभामंडपातून चाळुक्य मंदिर निर्मीती शैलीतिल कोरलेल्या आणि खाम्बावरील कोरलेली काही प्रमुख शिल्पांना सोडता, मंदिरात इतरत्र कोठेही शिल्पांचे कोरीवकाम न दिसावे, ही बाब मनाला खटकल्या शिवाय रहात नाही. मंदिर नवरंग मंडपाला पार करतच आपला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजू बंदिस्त असल्यामुळे मंदिर गर्भगृह एका घुमटाचेच बनलेले वाटते.
मंदिराच्या गर्भगृहातून आपला देवीच्या अंतराळ कक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अजून एक दगडी चौकट असून, गर्भगृहाच्या चौकटीप्रमाणेच निर्माण केलेली ही चौकट आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर जेवढी काही शिल्पे चालुक्यांनी कोरलेली आहेत, अगदी तीच शिल्पे गर्भगृहातून देवीच्या अंतराळमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या चौकटीवर कोरलेली आहेत. अंतराळमध्ये देवीचे साडेतीन फूट उंचीचे दगडी सिंहासन असून, त्याचा आकार महादेवीय साळुंखी (लिंगा खालील भाग) प्रमाणे आहे. त्यावर सुवर्णा देवीची सुंदर अशी पाषाणाची चतुर्भुज मूर्ती विराजमान असून, देवीच्या चारही हातात आयुधे आहेत. ही सुवर्णा देवी म्हणजे भवानी की लक्ष्मी ? अशी गोंधळाची परिस्थिती देवी भक्तांमधे पाहायला मिळत आहे.
मंदिरातील प्रवेश प्रशस्त सभागृहातून गर्भगृहात आणि गर्भगृहातून देवीच्या अंतराळ कक्षामध्ये होतो. मात्र हा प्रवेश करण्यासाठी छोट्या दगडी दरवाजातून थोडे वाकुनच आत जावे लागते. तीन ते साडेतीन फूट उंचीच्या सिंहासनावर विराजमान असलेली श्री सुवर्णा देवीची सुंदर पाषाणाची देखणी काळी मूर्ति मनाला मोहित करून जाते. देवीचे अंतराळ कक्ष चार रेखीव खाम्बावर टेकलेले असून, वरती मोठा दगडी घुमट आहे. म्हणजेच हे मंदिर एकूण वीस खाम्बावर टेकलेले असून, सम्पूर्ण मंदिराला एकंदरीत अकरा छोटे आणि एक मोठा असे बारा घुमट आहेत. मंदीरावर सुंदर अशा देखण्या शिखराचे काम करण्यात आलेले असले तरी शिखराचे काम चालुक्यीय स्थापत्य नमुना शैलीतील असल्याचे वाटत नाही, यावरून या मंदिराच्या शिखरांचा नंतरच्या काळात जीर्णोद्धार झाला असावा असे वाटते.
मंदिराच्या बाहेर काही ठिकाणी दगडी भोवऱ्या बसवलेल्या दिसत असून, मंदिरात दगडी खांब सोडता कुठेही शिल्पे कोरलेली दिसत नाहीत. सम्पूर्ण मंदिरात फेरफटका मारला असता लक्षात येते, की राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे सहावा यांच्या राजवटीतील अखेरच्या काळात बांधलेल्या मंदिरापैकी हा एक मंदिर समूह आहे. कारण मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला सम्पूर्ण दगड हा त्यावर कोरीवकाम करण्याजोगा वापरलेला असतानाही, चाळुक्यांनी मंदिर खांब वगळता इतरत्र कुठेही शिल्पांचे कोरीवकाम न केल्यामुळे अशी शंका घेण्यास वाव मिळतो. बघणाऱ्यांना जरी या मंदिरांचे निर्माण पूर्णावस्थेतील वाटत असले, तरी बारकाव्याणे पाहिल्यास या मंदिर निर्माणाचे काम अपूर्ण असल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही.
चाळुक्य मंदिर स्थापत्य कलेनुसार आगोदर मंदिराचे स्ट्रक्चर उभे करून, नंतर त्यावर विविध शिल्पांचे काम कोरण्यात येत असे. मात्र सादोळा येथील मंदिराचे निर्माण केल्यानंतर चाळुक्यांना अशी पुरेशी शिल्पे कोरण्यास पाहिजे तसा अवधि न मिळाल्याने, हे मंदिर निर्माण विक्रमादित्य सहावा यांनी त्यांच्या अखेरच्या काळात केलेले असावे असे वाटते. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या सादोळा येथे हा हेमाडपंथी मंदिरांचा समूह आहे. अकराव्या शतकात निम्म्याधिक भारतावर साठ वर्षाहून अधिक काळ स्थीर शासन केलेल्या विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे यांनी या मंदिरांचे निर्माण केलेले आहे.
चाळुक्यांनी त्यांच्या कार्यकालात अनेक मंदिरांचे निर्माण केलेले आहे, तर काही ठिकाणी त्यांनी एकापेक्षा जास्त मंदिरे म्हणजे समूह मंदिरांचे निर्माण केलेले आहे. सादोळा येथे दोन दगडांच्या मध्ये चुना वगैरे काहीही न टाकता दोन दगडांच्या फटी एकमेकांत अडकवून मंदिरे निर्माण करण्याची ही अफलातून कला विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) यांनी विकसीत केली होती. समूह मंदिर बांधकामाचीच उदाहरणे द्यायची झाली, तर कर्नाटकातील पट्टडकल, हम्पी, हलेबिडु, गदग, बदामी, आणि महाराष्ट्रातील विविध भागात चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी समूह मंदिरे बांधलेली आहेत.
चालुक्यीय राजांनी वरील ठिकाणी जसे मंदिरांचे निर्माण केले आहे अगदी तशाच हेमाडपंथी मंदिरांचे समूह निर्माण चाळुक्यांनी मराठवाड्यातील गोदाकाठच्या सादोळा या तीर्थक्षेत्री देखील केले आहे. गोदावरी नदी परिसरातील सम्पूर्ण भाग हा पूर्वीच्या काळी दंडकारण्याचा भाग होता. प्रभू रामचंद्राच्या चौदा वर्षाच्या वनवसाच्या काळात हा सम्पूर्ण परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. गोदावरी नदीच्या परिसरात जिथे जिथे प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केले आणि वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शिवाची आराधना केली, पुढे त्या ठिकाणांना जनमाणसांत तीर्थक्षेत्र संबोधण्यात येऊ लागले. अशा सर्व तीर्थक्षेत्रांचा शोध घेवून, त्या सर्व ठिकाणी विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे यांनी अकराव्या शतकात महादेव आणि इतर देवतांची मंदिरे बांधलेली आहेत. मात्र यातील काही मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली असली, तरी दोन मंदिरे येथे अजून तग धरून उभी आहेत.
चाळुक्य मंदिर निर्माण शैलीच्या सर्व खुणा सादोळा येथील श्री सुवर्णादेवी मंदिर आणि शार्दुलेश्वर (महादेव) मंदिरात देखील दिसून येतात. भोवऱ्या, अप्सरा शिल्प, नाग शिल्पे, स्त्रियांची लढाई शिल्पे, नर्तिका शिल्प, लढाई शिल्प, गणेश पट्टी, पंचभैरव पट्टी इत्यादिसह या मंदिराची संपूर्ण शैलीच, चाळुक्य स्थापत्य कलेची साक्ष देत दिमाखात उभी आहे. पुष्करणी बारव मात्र काळाच्या ओघात नष्ट झाली असली, तरी तिच्या काही खुणा अजूनही स्पष्टपणे दिसून येत आहेत. नष्ट झालेल्या या बारवेवर ग्रामस्थांनी पंचायतची इमारत बांधली आहे. शार्दुलेश्वराचे मंदिर कायमस्वरूपी जमीनदोस्त झाले होते, मात्र ग्रामस्थांनी दर्जेदार कारागिरीतले लोक बोलावून पडलेल्या मंदिर ढिगाऱ्यातील दगडांच्या आहे तशा वापराने 1992 मध्ये पुन्हा तसेच (हेमाडपंथी सारखे) मंदिर उभे केले आहे.
सादोळा, ता. माजलगाव येथील श्री सुवर्णादेवी मंदिर आणि शार्दुलेश्वर (महादेव) मंदिराचा काळ हा बाराव्या शतकाच्या पूर्वार्धातिल वाटतो, कारण मंदिरात कोरीवकाम न केलेले अनेक दगडी खांब वापर न करताच तसेच उभे करून ठेवलेले होते. पुढे भूकंपामुळे मंदिराला तडे गेले, त्या जागेवर ग्रामस्थांनी या खांबांना उभे करून मंदिराला त्याचा टेकू म्हणून आधार दिला आहे. शिवाय यातील काही खांबांचा आणि दगडी शिळाचा वापर करून गवळी लोकांनी गावातील हनुमान मंदिर बांधले असावे, हे स्पष्टपणे जाणवते. या मंदिरांचे निर्माण चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात केलेले आहे. आणि योगायोगाने पुढे याच गावात चौदाव्या अथवा पंधराव्या शतकात साळुंखे लोकांनी बस्थान मांडले असावे असा अंदाज़ आहे.
नंतरच्या काळात मराठवाड्यात समूहाने आलेल्या आणि या भागातील अनेक गांवात वसाहती निर्माण केलेल्या चाळुक्य उर्फ साळुंखे (आजचे सोळंके) लोकांनी या भागांत देखील मनगटी शौर्य दाखवत देशमुखी, जहागिरी, इनामदारी आणि पाटिलकी मिळवल्या. अशाच अनेक गावांपैकी मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्हयातील तेरा गांवात बस्थान बसवलेल्या सोळंके लोकांनी पुढील काळात आपल्या मनगटाच्या जोरावर साडेबारा गावची जहागिरीही मिळवली. त्यापैकीच एक सोळंकेे यांचे जहागिरीचे असलेले गाव म्हणजे माजलगाव तालुक्यातील सादोळा हे गाव आहे. सादोळा हे गाव माजलगाव या तालुक्याच्या गावापासून उत्तरेला बारा किलोमीटर अंतरावर गोदावरी नदी काठावर बसलेले गाव आहे.
विशेष म्हणजे गोदावरी नदीच्या भागात छोट्यात छोट्या दगडांचे देखील दुर्भिक्ष जाणवत असताना चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी या भागात जी भव्य मंदिरे बांधली, त्या बांधकामासाठी लागणारा दगड त्यांनी नेमका कोठून उपलब्ध केला असेल, हा नेहमीच अनेकांना कायम सतावणारा आणि भुवया उंचावयाला लावणारा प्रश्न आहे. गोदावरी नदीकाठच्या भागात पूर्वीच्या काळी रस्ते नसताना नद्या याच मार्ग ठरत असत. तर मोठाल्या नद्या या महामार्ग होत्या. नाशिक वगैरे भागातून उपलब्ध दगड तिथेच घडून, ज्या ज्या भागात मंदिर निर्माणाचे कार्य सुरू असेल, तिथे तो दगड गोदावरी महामार्गातून पाठविला जात असे. दगडांची बदली होऊ नये, म्हणून ही दगडे मंदिराच्या कोडवर्ड सहित गावाच्या नावाने पाठवली जात असत. ज्या गावचा दगड असेल, तोच तराफा त्या गावात सोडवून घेतला जात असे.
सती समाधी...
-------------------
सादोळा, ता. माजलगाव हे गाव प्राचीन काळापासून गोदावरी नदीकाठी अस्तित्वात आहे. पूर्वी या गांवात गवळी लोकांचे वास्तव्य होते. गावातील हनुमान मंदिराचे निर्माण देखील याच गवळी लोकांनी केल्याचे सांगितले जाते. तेराव्या शतकातील ऐतिहासिक साधनांमधून या गावाचा उल्लेख 'सादुलौ' असा केलेला आढळतो. पुढील काळात सादुलौ या शब्दाचा अपभ्रंश सादोळा असा झाला आहे. येथे सतीची पाच समाधी स्थळे होती, मात्र यातील तीनसमाधी स्थळे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. उरलेली दोन सतीची समाधी स्थळे आजही उन्ह, वारा आणि पावसाला झेलत दिमाखात उभी आहेत. ग्रामस्थांमधून सांगितले जाते, की या पाच समाधी स्थळांपैकी चार समाधी स्थळे ही सोळंकेतील सती गेलेल्या सतिंची आहेत. येथे सतीची शिळा असून, यावर ही सती आपल्या नवऱ्यासोबत घोड्यावर स्वार होऊन कैलासाला निघालेले दाखविली आहे.
माहिती संकलन
सतीशकुमार शिवाजीराव सोळंके - देशमुख,
मुख्य आयुर्वीमा सल्लागार LIC माजलगाव
9422241339;
9922241339.
COMMENTS