तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी - भिमराव धोंडे
मा.आ.धोंडेसाहेब यांनी खा.मुंडे,माजी मंत्री बोंडे यांना ट्ँक्टर मध्ये बसुन केली शिवार फेरी
आष्टी ( दादासाहेब बन ) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कल्याणासाठी तीन कृषी विधेयके आणली आहेत. केंद्राने दिलेल्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने लागु कराव्यात असे मत माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले. बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेले तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत परंतु काॅंग्रेसकडून याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम चालु आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्राने आणलेले शेतकरी हिताचे बील लागु केले नाही तर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केली.
भारतीय किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे शेतात आयोजित केलेल्या किसान सवांद यात्रा कार्यक्रमात बोंडे, मुंडे, धोंडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे,उत्तमराव माने, बबनराव झांबरे, वाल्मिकराव निकाळजे, भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, आष्टी तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष बबनराव औटे सभापती सौ. लांबरुडताई, व इतर उपस्थित होते.
प्रारंभी माजी आमदार भिमराव धोंडे यांनी टॄॅक्टर चालवत व्यासपिठापर्यंत आणला त्यांच्यासोबत खा. डॉ. प्रितमताई मुंडे, माजी मंत्री अनिल बोंडे हे स्थानापन्न झाले होते.
पुढे बोलताना माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले की, कॉंग्रेसच्या २०१९ च्या जाहीरनाम्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील पुस्तकात कृषी विधेयकाचे समर्थन केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमातून शेतकरी मुक्त झाले पाहिजेत, असा त्या पुस्तकात उल्लेख आहे. पण राज्यातील सत्ताधारी नेते विधेयकाला विरोध करत आहेत.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना हमीचा बाजारभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना तीन दिवसांच्या आत शेतीमालाचे पैसे न मिळाल्यास संबंधित दलाल, व्यापारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करता येतो. याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे. बाजार समितीच्या बाहेर कोठेही व कोणत्याही गांवात शेतीमाल विकता येईल, त्यामुळे दलालाच्या आर्थिक जाचातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्याना केंद्र सरकारकडून मदत केली जाते. राज्यात लाखों शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. पण राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली आहेत, असा आरोपही बोंडे यांनी यावेळी केला. राज्यशासन हे दळभद्री शासन आहे. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आहेत. आणि २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवुन दिले आहे.
यावेळी खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले की, केंद्रात पुढचे २५ वर्षे तरी काॅंग्रेसची सत्ता येणार नाही.राज्यात चुकुन तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. राज्यसरकार कोरोनाला आटोक्यात आणु शकले नाही. केंद्राने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. लाॅकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी, गोरगरीब जनता, निराधार यांना कोट्यावधी रुपयांचे अर्थसहाय्य केले. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा पिकविमा व इतर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले होते. परंतु या राज्य सरकारने शेतकरी, गोरगरीबांना कसलेही सहकार्य केले नाही. विद्यमान पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री नसुन फक्त परळीचे पालकमंत्री आहेत अशी टिका ना. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खा. मुंडे यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेले तीनही कृषी विधयके राज्य शासनाने अंमलात आणावेत अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना पिकांवर फवारणीसाठी लागणारी औषधे, अवजारे यांच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. वाढत्या किंमती, होणारा खर्च आणि उत्पादीत माल यांचा मेळ बसत नाही. कोरोनाबाबतही ठाकरे सरकार उदासीन आहे. तसेच यावेळी भिमराव धोंडे यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचे भाषण झाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीड जि. प. माजी सदस्य सतिष झगडे यांनी केले. सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव शंकरराव देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष, जि. प. सदस्य, पं स. सदस्य, सरपंच तसेच प्रमुख कार्यकर्ते, विविध पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS