उमरी :-तालुक्यातील निमटेक या छोट्याशा खेड्यातील विद्यार्थ्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणाऱ्या या शिक्षकाची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे.
विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे, एकेकाचे रूप मनोहर घडविण्यास मी सज्ज असे.हे ब्रीद घेऊन शिराढोण च्या जन्मभूमी तून निघालेला ध्येयवेडा शिक्षक म्हणजेच उत्तम गायकवाड.
तो निमटेक च्या शाळेमध्ये एवढा मिसळुन गेला की आख्ख गावाच शाळा झाली होती. मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर दूर खोल दरीत विसावलेल्या टुमदार शंभर ते दीडशे घरांचे गाव. पाच खोल्यांची शाळा.
प्रथम नेमणूक या गावात झाल्यानंतर भाड्याने गावात रूम मिळेना. आठ दिवस शाळेतच एका वर्गखोलीत मुक्काम.
मनात प्रचंड जिद्द, सृजनात्मक काहीतरी करायची प्रचंड ऊर्जा, शाळेचा चेहरामोहरा बदलण्याच उराशी स्वप्न.. हे गोड स्वप्न घेऊन हा शिक्षक शाळेत, गावातच स्थिरावला.
गावातील त्यांचे घर म्हणजे एक जणु शाळा झाली. शाळेची गावातून सांस्कृतिक कार्यक्रमातून झालेल्या बक्षीस मधून रंगरंगोटी, लाईट फिटिंग, पंखे, शाळेच्या मैदानावर भव्य वृक्षारोपण, मैदाना वरील सपाटीकरण, सुसज्ज स्वच्छालय, शाळेला गेट व गेटवरची कमान, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ती बाग.
पाहता पाहता निमटेक ची शाळा सर्व तालुक्यांचे लक्ष वेधून घेऊ लागली.
उत्तम गायकवाड सरांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडत सोबत गोविंद जाधव सर, ईश्वर वडजे सर, साईनाथ होनशटे सर या टीमने शाळेचा कायापालटच केला.
शाळेची सुरुवात सुंदर परिपाठने होऊ लागली.गायकवाड सर यांनी तब्बल 11 वर्षे जि प प्रा शा निमटेक येथे अविरत विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. त्याकाळात 100% पटनोंदणी. शंभर टक्के उपस्थिती. 100% गुणवत्ता होती.
शिक्षणाबरोबरच संस्कारही देणारी शाळा म्हणून गावकरी शाळेकडे पाहू लागले. विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथील पथकाने सतत तीन वर्षे या शाळेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि गुणवत्ता पाहून शिक्षकांचीपाठ थोपटली.ह्या काळात अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आणि वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या जीवनाची सुरुवात केली.
गायकवाड सरांच्या काळातीलच ह्या गावची भूमिकन्या राजश्री चंदापूरेही पहिली विद्यार्थिनी पोलीस उपनिरीक्षक पदावर सरळ सेवेतून निवड झाली. गायकवाड सरांचा विद्यार्थी दीपक चंदापूरे हा आय. आय. टी. पाटणा येथे होऊन आज डॉक्टर होमी भाभा रिसर्च सेंटर मुंबई येथे शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. शफी शेख हा विद्यार्थी मुंबई येथे जीएसटी कार्यालयात करसहाय्यक या पदावर कार्यरत आहे. हरिदास चंदापूरेहा विद्यार्थी समाजकल्याण विभागात कार्यरत आहे. संग्राम पाटील एमबीए होऊन पुणे येथे हे चांगल्या पदावर कार्यरत आहे. कु. पूजा चंदापूरे ही बीएएमएस होऊन एमडी करत आहे. शंकर चंदापूरे हा विद्यार्थी न्यायालयात कार्यरत आहे. विलास पाटील हा विद्यार्थी सिव्हिल इंजीनियरिंग होऊन चांगली सेवा बजावत आहे.
त्याकाळात हरिदास चंदापूरे आणि जगन्नाथ ढेरे हे विद्यार्थी या शाळेतूनच नवोदय विद्यालयास पात्र ठरली होती.
यासारखे अनेक गुणवंत विद्यार्थी व निर्व्यसनी सुजाण नागरिक घडविण्याचे काम या ध्येयवेड्या शिक्षकांनी केले.
सरांनी ह्या शाळेत लहान चिमुकल्यांच्या हातातून निर्माण झालेली हस्तलिखित" कलिका"प्रकाशन सोहळा या शाळेतच मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला होता.
अशा या शाळेतूनच जून 2013 मध्ये भव्य आणि प्रशस्त जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे सर बदलीने रुजू झाले . या शाळेची कुशल प्रशासक माननीय संजय सिंह राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अध्यापनाच्या कार्याला सुरुवात केली.तालुक्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा म्हणून या शाळेमध्ये सुरुवात झाली.त्यामध्ये पाचवी ते सातवी या विद्यार्थ्यांना गणित अध्यापनाचे कार्य उत्तम गायकवाड यांनी केले. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन कुंटूर येथे सरांनी सुरू केले.
या शाळेचे आकर्षण म्हणजे सांस्कृतिक विभाग. या विभागाची जबाबदारी गायकवाड सरांनी अतिशय चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडली. या विभागाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. प्रजासत्ताक दिनी होणारा संस्कृती कार्यक्रम सर्व
गावातील जनतेचे लक्ष वेधून घेतो.गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथील विद्यार्थी सुरेखा सूत्रसंचालन करतात. जिल्हास्तरीय विविध वक्तृत्व स्पर्धेत या शाळेतून विद्यार्थ्याने अनेकदा बक्षिसे पटकावली. कुमारी शबनम सय्यद ही विद्यार्थिनी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय आलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय पूर्व परीक्षा, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून स्पर्धेची आवड निर्माण केली. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अनेक लेखकांची भेट घडवून" लेखक तुमच्या भेटीला" स्तुत्य उपक्रम शाळेमध्ये राबवला. विभागीय विज्ञान प्रदर्शन सगरोळी येथे जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर चा निर्मल ग्राम हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या वतीने सुंदर सादरीकरण करण्यात आला होता. सामाजिक उपक्रम म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमातून हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव, ह्यावर आधारित सुंदर नाटकांचे विद्यार्थ्यांना सहभागी करून सादरीकरण केले. ह्यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व हृदयाचा ठाव घेतला. नाटकी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना प्रसंगी खूप हसवलं आणि रडवलं ही..
त्यानंतर प्रशासकीय बदलीने मे 2018 ला अंचोली तालुका नायगाव या ठिकाणी सरांची प्रशासकीय बदली झाली.
एवढ्या प्रशस्त शाळेतून दोनच वर्गखोल्या असलेल्या शाळेमध्ये सर विद्यार्थ्यांमध्ये खूप रमले.
शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढू लागली.गावकऱ्यांच्या मदतीने संस्कृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातून हजारो रुपयांची मदत शाळेला झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस मधून शाळा डिजिटल झालेली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली चे रूप पालटण्यासाठी येथील शिक्षक भारत घोरपडे सर, स्वाती अडबलवार मॅडम व गावकऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक गायकवाड सर प्रयत्न करत आहेत.
म्हणूनच म्हणावेसे वाटते
दिव्यत्वाची प्रचिती, तेथे माझे कर जुळती!
म्हणून तर असे शिक्षक व वेळोवेळी आमच्या गावाला व शाळेला लाभावी!
COMMENTS