माजलगाव/भास्कर गिरी
अनुसूचित जातीच्या विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींना सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची मुंडे यांनी तातडीने दखल घेवून मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अशोक डक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, जून 2020 मध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यींनींना परदेशी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख 14 ऑगस्ट 2020 आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठी उमेदवाराने बिनशर्त प्रवेश देय पत्र (Unconditional Offer Letter) देणे अनिवार्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी सदर पत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र जगभरातील नामांकित विद्यापीठाने निर्धारित केलेल्या कालमर्यादा आणि प्रवेश प्रक्रियेनुसार अंदाजे 10 ते 16 आठवड्यांचा कालावधी देवून बिनशर्त प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते. त्यामुळे सदरचे पत्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वेळेत मिळणे कठीण आहे. तरी आपण या सर्व बाबींचा विचार करून मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अशोक डक यांनी लावून धरली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या या निर्णयाचे डक यांनी स्वागत केले असून तातडीने निर्णय बदलून निर्णय दिल्याबद्दल महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
COMMENTS