केज येथे माजी सैनिकांचे घर फोडले
केज/प्रतिनिधी :- घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी केज येेेथे एका माजी सैनिकांंच्या घराच्या दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश करून दागिन्यासह नगदी ३९५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज शहतील उमरी रस्त्यावरील द्वारका नगरीत गुरुवारी दुपारी १२:३० ते ३:०० वाजेच्या दरम्यान घडली .
केज तालुक्यातील लव्हुरी येथील सतीश निवृत्ती चाळक हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांचे वडील निवृत्ती चाळक हे सुद्धा निवृत्त सैनिक होते. त्यांचे कुटुंब हे केज शहरातील उमरी रस्त्यावर असलेल्या द्वारका नगरीत वास्तव्यास आहे. तर निवृत्ती चाळक हे आजारी असल्याने त्यांना लातूरला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी सतीश चाळक यांनी रक्कम आणून कपाटात ठेवली होती. मात्र रविवारी निवृत्ती चाळक यांचे निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर मूळगावी लव्हूरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवसापासून त्यांचे कुटुंब गावी आहे . तर सतीश चाळक यांचा मुलगा व मुलगी हे केजच्या घरी होते. गुरुवारी दुपारी १२:०० वाजता चाळक यांचा मुलगा जेवणाचा डबा आणण्यासाठी घराला कुलूप लावून लव्हूरीला गेला होता. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कटरने दरवाजाचे कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाट तोडून कपाटातील ३९५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सतीश चाळक यांचा मुलगा दुपारी तीन वाजता लव्हूरी येथून डबा घेऊन घरी आला असता हा प्रकार निदर्शनास आला.
दरम्यान, सतीश चाळक यांच्या फिर्यादीवरुन केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे करत आहेत.
COMMENTS