ग्लोबल मराठवाडा
| 3 Jun 2020, 6:10 pm202
देगलूर नाका व शिवाजीनगर परिसरात गेल्या आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळे त्यांचे नातेवाईक व परिसरातील संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर आज त्यापैकी 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यात देगलूर नाका (11) व शिवाजीनगर, नईआबादी (9) या भागातील तर देगलूर तालुक्यातील आमदापूर व मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील रुग्णांचा समावेश असल्याने आता नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या 175 वर पोहोचली आहे.
आज एकूण 238 अहवालापैकी 193 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले व 23 रुग्णांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 175 वर पोहोचली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी सायंकाळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथील एक व पंजाब भवन यात्री निवास येथील दोन रुग्णांची तब्येत ठिक झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 124 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरित 43 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यात दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.
आज प्राप्त झालेल्या 23 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी आमदापूर (ता. देगलूर जि. नांदेड) येथील 35 वर्षीय महिला व भेंडेगाव (ता. मुखेड) येथील 21 वर्षीय पुरुषाचा स्वॅब पॉझिटीव्ह आल्याने त्यांना देगलूर व मुखेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. देगलूर नाका व शिवाजीनगर भागात नईआबादी परिसरात दोन दिवसापूर्वीच रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींचे स्वॅब घेतल्यानंतर त्यापैकी देगलूर नाका परिसरातील 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर नईआबादी शिवाजीनगर भागातील 9 जणांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आज एकाच दिवशी 23 रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात आता कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या 175 वर पोहोचली आहे. यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS