छत्रपती संभाजीनगर, दि. २५ नोव्हेंबर २०२६
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लेखिका व प्राध्यापिका तसनीम पटेल यांच्या ‘टॉर्चर्ड ट्रूथ’ या जीवनचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीचे बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती डॉ. अंकुशराव कदम, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक इंद्रेश कुमार आणि सामाजिक कार्यकर्ते मेहताब खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
तसनीम पटेल यांनी आपल्या जीवनप्रवासावर आधारित ‘भाळ आभाळ’ हे मूळ मराठी चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रथम हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात आला. या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
‘टॉर्चर्ड ट्रूथ’मध्ये लेखिकेच्या बालपणापासून सुरू झालेला संघर्षमय जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. स्त्री म्हणून सहन करावा लागलेला अन्याय, आर्थिक अडचणी, सामाजिक अवहेलना आणि भेदभाव अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि यशाचा मार्ग गाठला. संकटांशी झुंज देतानाही आत्मसन्मान, संवेदनशीलता आणि माणुसकी जपण्याचा त्यांचा प्रवास या चरित्रातून समोर येतो.
डॉ. मोहन भागवत यांनी पुस्तकातील प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “आयुष्यात मोठा संघर्ष आणि दुःख वाट्याला आले की माणूस कडवट बनू शकतो. मनात इतरांविषयी राग, द्वेष आणि उद्वेग निर्माण होऊ शकतो. मात्र या चरित्रात तसे काहीही दिसत नाही. लेखिकेने आपले माणूसपण टिकवून ठेवले आहे. आयुष्यात कितीही मोठा संघर्ष आला, तरी माणूसपण टिकले पाहिजे.”
धर्माविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. भागवत म्हणाले की, धर्म म्हणजे केवळ ‘रिलिजन’ नव्हे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मांडलेला सत्य आणि करुणेचा विचार हा जगण्याचा आधार असला पाहिजे. भारतातील मूल्यपरंपरा आणि संस्कारांचा उल्लेख करत त्यांनी जगाला आज भारताकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले.
एमजीएम विद्यापीठाचे कुलपती डॉ. अंकुशराव कदम यांनी पुस्तकाविषयी भावना व्यक्त करताना लेखिकेच्या जीवनप्रवासाला ‘कृष्णविवर’ अशी उपमा दिली. ते म्हणाले, “तसनीम यांना मी ओळखतो. पुस्तकात त्यांचा जीवनप्रवास वाचल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून चार ओळी लिहिल्या आहेत. भावनांना आवर घालता न येणारी माणसे असे पुस्तक वाचताना रडून घेतात. आयुष्यात भोगलेले आणि भूतकाळात गेलेले दुःख कृष्णविवरासारखे असते. म्हणूनच तसनीम यांच्या कहाणीला मी ‘कृष्णविवर’ ही उपाधी दिली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीना पठाण बारगीर यांनी केले, तर अझर बारगीर यांनी आभार मानले.

COMMENTS