नांदेड (प्रतिनिधी) : मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता.उमरी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या २२ वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा *लोकसंवाद राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार* लेखक व समीक्षक प्रा. डॉ. नारायण शिवशेट्टे यांच्या साहित्य क्षेत्रातील अनमोल योगदानाचा तसेच उल्लेखनीय कार्याचा विचार करून लोकसंवाद साहित्य पुरस्कार निवड समितीने जाहीर केला आहे. लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक व सुप्रसिद्ध कथाकार मा.दिंगबर कदम यांनी पुरस्कार निवडी बाबतची माहिती पत्राद्वारे कळविली आहे.
डॉ. नारायण शिवशेट्टे यांना यापूर्वी कोपरगाव येथील भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार , टाकळीभान येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार ,हिंगोली येथील संत नामदेव राष्ट्रीय समीक्षा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे 'रातवा : आत्मसंघर्ष आणि आत्मशोध', ' विद्यार्थ्यांची कविता' (संपादक) व 'ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय : एक अभ्यास' हे ग्रंथ प्रकाशित आहेत. ग्रामीण साहित्य व आत्मचरित्र हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय असून त्यांनी अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंधाचे वाचन व लेखन केले आहेत. डॉ. नारायण शिवशेट्टे सध्या पानसरे महाविद्यालय अर्जापुर ता. बिलोली जि. नांदेड येथे मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
२८ नोव्हेंबर २०२६ रोजी गोदावरी इंटरनॅशनल स्कूल,शिवमळा, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात ना. हेमंत पाटील, साहित्यिक विचारवंत शेषराव मोरे, संमेलनाध्यक्ष साहित्यिक आसाराम लोमटे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य साहित्यिक देविदास फुलारी, साहित्यिक प्रा .महेश मोरे, प्रा. नारायण शिंदे, प्रा.धाराशिव शिराळे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत 'लोकसंवाद राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे .

COMMENTS