नांदेड -(दि. २७ नोव्हेंबर २०२६)
भारतीय संविधानामुळे देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. जात, धर्म, भाषा, पंथ, वर्ग, लिंग आणि इतर भेद असतानाही भारत एकसंघ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, मानवता या मूल्यांचा समावेश संविधानामध्ये आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून स्वतःच्या लेकरांचाही विचार न करता रक्ताचे पाणी करून संविधान लिहिले आहे. त्याचे भान ठेवून आपण जगले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी प्रथमतः भारतीय व अंतिमतःही भारतीयच आहे. जात, धर्म, पंथ या विषयावरून वाद होण्याचे काही कारण नाही; कारण आपण भारतीय आहोत. आपले संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. निर्भीड रहा, अभ्यास करा, आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करा. तुम्हाला जीवनात कुठेही अडचण येणार नाही; कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. अजय गव्हाणे यांनी केले.
श्री.शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणिकनगर येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
प्रारंभी मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर कुरूडे, प्रमुख वक्ते डॉ. अजय गव्हाणे व इतर मान्यवरांच्या हस्ते महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक संविधान उद्देशिका वाचन विजय पवार यांनी घेतले. गणेश मुधोळकर यांनी वंदे मातरम गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कळसे यांनी केले. शेवटी आभार डॉ. कविता तिर्थे यांनी मानले.
याप्रसंगी माध्यमिक पर्यवेक्षक सत्यवान पारेकर, आर.सी. गायकवाड, माध्यमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका वरवंटकर, दिगंबर कांबळे, सुजाता कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख शैलेश भांगे, क्रीडा विभागप्रमुख सुशील कुरूडे, विजय कळणे, व्यंकट उपासे, मंगेश पाटील, सचिन गायकवाड, सुरज यादव, सचिन कळसे, सूर्यभान ताटे, अनिल हातणे, मोहिनी दिनकर, अनिल कुमठेकर, राज्यशास्त्राचे संशोधक प्रा. मारुती भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS