किनवट: स्थानिक CCI खरेदी केंद्रांच्या अभावामुळे कापूस विक्रीसाठी अडचणींचा सामना करणाऱ्या किनवट-माहूरच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समो...
किनवट: स्थानिक CCI खरेदी केंद्रांच्या अभावामुळे कापूस विक्रीसाठी अडचणींचा सामना करणाऱ्या किनवट-माहूरच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. आमदार भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आदिलाबाद (तेलंगणा) येथील CCI केंद्रांवर कापूस विक्रीचा पर्याय खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रस्तावाला CCI ने तत्त्वतः हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे
२१ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार केराम यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी CCI ने तेलंगणा शासनाच्या कृषी विपणन विभागाला पत्र पाठवून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय अटी पूर्ण झाल्यास किनवट-माहूरच्या शेतकऱ्यांचा कापूस आदिलाबादमधील निश्चित केंद्रांवर खरेदी करण्यास सकारात्मक भूमिका घेतली.मात्र, तत्त्वतः सहमती मिळाली असली, तरी प्रत्यक्ष खरेदीचा मार्ग अद्याप पूर्णपणे मोकळा झालेला नाही. शेतकरी पडताळणी, जमीन अभिलेख व ‘कपास किसान अॅप’वरील नोंदणी, बाजार शुल्क, जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांची निवड आणि वाहतूक परवानग्या यांसारख्या बाबींची पूर्तता बाकी आहे. वाहतुकीची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार असल्याने या पर्यायाचा आर्थिक फायदा किती होईल, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
राज्यात १५ ऑक्टोबर २०२६ पासून हमीदराने कापूस खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा शासनाच्या यंत्रणांनी तातडीने समन्वय साधून निर्णय घेणे आवश्यक आहे. CCI चा सकारात्मक प्रतिसाद प्रत्यक्ष खरेदीत रूपांतरित होणार की शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार? याचे उत्तर आगामी काही दिवसांत मिळणे अपेक्षित आहे.स्थानिक पातळीवर CCI खरेदी केंद्रे आणि जिनिंग-प्रेसिंगची सुविधा उपलब्ध होण्याची गरजही कायम आहे. आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे आदिलाबादच्या पर्यायाबाबत सकारात्मक हालचाल सुरू झाली असून, आता महाराष्ट्र आणि तेलंगणा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे किनवट-माहूरमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS