वडेपुरी (ता. लोहा) : नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी देवीच्या गडावर नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विधिवत पूजाअर्चा, अभिषेक आणि घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त रत्नेश्वरी गडावर रंगरंगोटी आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शनासाठी रांगेचे नियोजन तसेच स्वच्छता व इतर आवश्यक सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता माता रत्नेश्वरी देवीची विधिवत पूजा व अभिषेक करून घटस्थापना करण्यात येईल. त्यानंतर महाआरती होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ परिसरातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पाटील दळवे, सचिव साहेबराव झांबरे, विश्वस्त सदाशिव आंबुरे, सदाशिव स्वामी, माधवराव धर्माधिकारी, जनार्दन मामीडवार, व्यंकटराव मुळे, जवळेकर देशमुख यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

COMMENTS