हमने सनम को खत लिखा… आज जागतिक टपाल दिन!

हमने सनम को खत लिखा… आज जागतिक टपाल दिन! 'हमने सनम को खत लिखा… ' आठवते ना! साधारण १९८२ मध्ये आलेल्या शक्ती चित्रपटातील हे गाणं. अमित...
हमने सनम को खत लिखा…
आज जागतिक टपाल दिन!
'हमने सनम को खत लिखा… ' आठवते ना! साधारण १९८२ मध्ये आलेल्या शक्ती चित्रपटातील हे गाणं. अमिताभ आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं… आनंद बक्षी यांनी कल्पकतेने लिहिलेलं आणि आर. डी. यांनी अजरामर केलेलं हे गाणं… ज्यांनी त्या काळात पत्रं लिहिली असतील… आणि ज्यांच्या पत्राचं उत्तरच कधी मिळालं नसेल… त्यांना या पत्रातल्या या ओळी अवघ्या आयुष्याची शिदोरी होऊन गेल्या आहेत…
पीपल का ये पत्ता नहीं
काग़ज़ का ये टुकड़ा नहीं
इस दिल का ये अरमान है
इसमें हमारी जान है…
खरंच, पत्रावळीचा तो सुवर्णकाळ! केवळ ६०–७० किलोमीटरवर असताना सुद्धा दळणवळणाची साधनं नसायची… अगदी तालुक्याच्या गावाला जाणंसुद्धा न परवडणाऱ्या या काळात फक्त पत्रं सोबतीला होती… त्यातली काही पत्रं अजूनही कपाटाच्या कोपऱ्यात जपून ठेवली आहेत अनेकांनी! त्यातला सुगंध गेला. अक्षरंही अस्पष्ट झाली… मात्र भावना तशाच ओल्यागच्च अगदी नव्वदीतल्या…
हे सगळं आठवायला कारण म्हणजे आज, ९ ऑक्टोबर—जागतिक टपाल दिन…
आज पन्नाशी ओलांडलेली पिढी या जादूची साक्षीदार आहे. काळ बदलला. मोबाईल आला, संदेश आले, छायाचित्रं क्षणात पोहोचू लागली. तरीही पत्राची जादू संपलेली नाही. कारण मोबाईलवरचा संदेश वाचला जातो; पण पत्र भावनांनी ओथंबलेलं असतं. ते कपाटात जरी जीर्ण झालं, तरी हृदयात मात्र वर्षानुवर्षं जपून ठेवलं जातं.
मित्रांनो! आज ९ ऑक्टोबर—जागतिक टपाल दिन. जगातील टपाल व्यवस्थेला एकत्र आणणाऱ्या सार्वत्रिक टपाल संघाची स्थापना ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे झाली. पुढे १९६९ मध्ये ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पण, ही झाली एक नोंद… आपली पत्रावळी अनादी काळापासून सुरू आहे… भाग्यश्रीने 'मैने प्यार किया 'मध्ये कबुतराला पत्र घेऊन ‘कबूतर जा-जा’ केले होते. तेव्हा आमच्या मनात कबुतरंही पत्रं घेऊन जातात याबद्दल यत्किंचितही शंका नव्हती… फक्त आमची जिंदगी हे शोधण्यात गेली की ते पत्र पाठवणारी नेमकी कोण होती ! बाकी आपली जिंदगी तर फक्त लिहिण्यात गेली…
न जाने कौन थे वो लोग जिन के ख़त के जवाब आए,
हमारा क्या है, हम ने तो बस ख़त पर ख़त लिखे हैं…
बरं, ही झाली आपली चित्तरकथा… तसेही माणसाने संदेश पाठवण्याची सुरुवात टपाल कार्यालयापासून केलेली नाही. प्राचीन काळात माणूसच संदेशवाहक होता. धूर, अग्नी, नगारे, ध्वज, घोडेस्वार आणि धावते दूत अशा अनेक माध्यमांतून निरोप पोहोचवले जात. प्राचीन इजिप्तपासून पर्शियाच्या राजमार्गापर्यंत आणि भारतातील प्राचीन राजवटींपर्यंत संदेशवहनाची स्वतःची व्यवस्था होती.
भारतातही संदेशवाहकांची परंपरा प्राचीन आहे. अलाउद्दीन खिलजीच्या काळातील टपाल व्यवस्था, 'इब्न बतूता ' या जागतिक पर्यटकाने केलेले तिचे वर्णन आणि शेरशाह सूरीने १५४१ मध्ये उभारलेली घोडेस्वार टपाल व्यवस्था हा आपल्या टपाल इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
पुढे ब्रिटिश काळात आधुनिक टपाल व्यवस्थेला आकार मिळाला. १७७४ मध्ये कलकत्ता येथे मुख्य टपाल कार्यालय सुरू झाले. त्यानंतर मद्रास आणि मुंबई येथेही टपाल कार्यालये सुरू झाली. १८५४ मध्ये टपाल खात्याचे एकसंध स्वरूप निर्माण झाले आणि भारतातील आधुनिक टपाल व्यवस्थेचा पाया अधिक मजबूत झाला.
या प्रवासात टपाल तिकिटाची कहाणीही तितकीच रंजक आहे. जगातील पहिले चिकटवता येणारे टपाल तिकीट म्हणजे ब्रिटनचे ‘पेनी ब्लॅक’. १८४० मध्ये प्रसिद्ध झालेले हे तिकीट राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले होते. टपालाच्या शुल्काची पद्धतच त्याने बदलून टाकली.
भारतातील पहिले टपाल तिकीट म्हणून ‘सिंध डाक’चा उल्लेख केला जातो. १८५२ मध्ये सिंध प्रांतात ते वापरात आले. पुढे १८५४ मध्ये भारतासाठी नियमित टपाल तिकिटांची मालिका प्रसिद्ध झाली. टपाल तिकीट म्हणजे केवळ टपाल शुल्क भरल्याची खूण नव्हे; कालांतराने ते देशाचा इतिहास, संस्कृती, कला, व्यक्तिमत्त्वे आणि राष्ट्रीय स्मृती जपणारे छोटेसे दस्तऐवज बनले.त्या काळाने गावागावात असे ' फिलॅटली ' बघितले आहे आणि त्यांची जिद्द ही अनुभवली आहे.
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे, ऐतिहासिक घटनेचे, सांस्कृतिक वारशाचे किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयाचे स्मारक टपाल तिकीट काढण्याची प्रक्रियाही औपचारिक असते. संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडून प्रस्ताव येतो. त्याची छाननी केली जाते. तज्ज्ञ समितीच्या स्तरावर विचार होतो. सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेतल्यानंतर तिकिटाची रचना, छपाई आणि प्रकाशनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
आणि मग येतो तो प्रतिष्ठेचा क्षण—टपाल तिकीट प्रकाशन सोहळा! अशा अनेक सोहळ्यांना पत्रकार म्हणून उपस्थित राहता आले… टपाल तिकिटावर मान्यवराचे चित्र आणि मग ते तिकीट चिकटविण्यासाठी पोस्टाच्या दारातली ती निळी बाटली आजही लक्षात आहे… काही बहाद्दर त्या काळात जिभेवर बोट फिरवून तिकिटांच्या मागे लावताना बघितले…
एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित होणे ही मोठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. कारण एकदा ते तिकीट टपालाच्या इतिहासात आले की त्या व्यक्तीचे किंवा विषयाचे नाव देशाच्या टपाल स्मृतीचा भाग बनते.
टपाल तिकिटासोबत आणखी एक आकर्षण असते—प्रथम दिवस आवरण. एखादे नवीन टपाल तिकीट ज्या दिवशी प्रकाशित होते, त्या दिवशी विशेष लिफाफ्यावर ते तिकीट लावून आणि त्या दिवसाचा विशेष टपाल शिक्का उमटवून तयार केलेले आवरण म्हणजे प्रथम दिवस आवरण. टपाल तिकीट संग्राहकांसाठी त्याला विशेष महत्त्व असते.
टपाल म्हणजे फक्त पत्र नव्हे. तार, मनीऑर्डर, टपाल, बचत बँक, जीवन विमा, पार्सल अशा अनेक सेवांनी भारतीय समाजजीवनाशी टपाल खात्याचे नाते जोडले. धावणारा टपालवाहक, घोडे, उंट, रेल्वे, मोटार आणि विमान असा टपाल वाहतुकीचा प्रवासही विलक्षण आहे.
आणि मग आले स्पीड पोस्ट.
१९८६ मध्ये सुरू झालेल्या स्पीड पोस्टने भारतीय टपाल व्यवस्थेला नवा वेग दिला. आज पत्र किंवा पार्सल कुठे पोहोचले, याचा मागोवा घेता येतो. संगणकीय नोंदणी, भ्रमणध्वनीवर लघुसंदेश, एकवेळचा संकेतांक, ऑनलाइन सेवा अशा सुविधांमुळे टपाल व्यवस्था काळानुसार बदलत गेली.
पण गंमत अशी की, डिजिटल युगातही हाताने लिहिलेल्या पोस्टकार्डची ओढ संपलेली नाही… गावाच्या डोंगरावर क्रिकेट खेळत असताना तुमच्या गावचा पोस्टमन तुम्हाला शोधत तुमचं खासगी पत्र तुमच्या हातात द्यायला आल्यावर होणारा आनंद काय असतो… तज्ज्ञांनाही गुदगुल्या करणारी ही आठवण आहे.
सज्जनाचा ‘अ नॉस्टॅल्जिक सोल’ करणारा हा सारा पसारा आहे. याच भावनेतून जगभर लोकप्रिय झालेली एक आगळीवेगळी चळवळ म्हणजे ‘पोस्टक्रॉसिंग’. २००५ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील अनोळखी व्यक्तीला पोस्टकार्ड पाठवायचे आणि बदल्यात जगातील दुसऱ्या कोणत्या तरी कोपऱ्यातून आपल्याला पोस्टकार्ड मिळायचे. इंटरनेटच्या युगात अनोळखी माणसाने हाताने लिहिलेलं पोस्टकार्ड आपल्या घराच्या टपालपेटीत येणे—हीच या उपक्रमाची खरी गंमत!
म्हणजेच टपाल संपलेले नाही; त्याने फक्त आपले रूप बदलले आहे. कधीकाळी संदेश पोहोचवण्यासाठी माणूस मैलोन्‌मैल धावत होता. आज काही क्षणांत संदेश जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. पण काही गोष्टींना वेगाची गरज नसते. काही भावना पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणूनच त्या अधिक मौल्यवान असतात.
म्हणूनच आज जागतिक टपाल दिनानिमित्त एक छोटासा प्रयोग करूया. तुम्ही, मी सारेच पुन्हा तो कालावधी आठवूया! चला, ‘पोस्टकार्ड’च्या आजूबाजूला लिहिलेला मजकूर, आंतरदेशीय पत्राच्या आत सुरक्षित कोंबलेला मजकूर आणि लिफाफ्याच्या आत अंतराच्या सुगंधात भिजवलेल्या कागदावर मनाच्या शब्दांचे अक्षर करून गोंदलेला तो मजकूर आठवूया… तो सध्या काय करत असेल… ती सध्या काय करत असेल… ‘लिखे जो ख़त तुझे, जो तेरी याद में…’ पुन्हा करूया…
बस्, एक पोस्टकार्ड घ्या. पेन हातात घ्या. आपल्या अक्षरांमध्ये आपलं मन उमटू द्या. एखाद्या जुन्या मित्राला, मैत्रिणीला किंवा आपल्या आयुष्यात खास असलेल्या व्यक्तीला लिहा—
“तू माझ्या आयुष्यात खास आहेस…”
आणि ते पोस्टकार्ड टपालपेटीत टाका.
ज्या पिढीने टपालाचे सुवर्णयुग पाहिले आहे, त्या पिढीने पुन्हा एकदा पत्र लिहावे. कारण अक्षरांमध्ये फक्त शब्द नसतात… भावनांचा सुगंध असतो… मी आठवणार आहे, तुम्हीही आठवा… चला, पुन्हा एक पत्र लिहूया! आज जागतिक टपाल दिन साजरा करूया!!
  • प्रवीण टाके
  • उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय,
  • छत्रपती संभाजीनगर
  • ९७०२८५८७७७

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group