नांदेड : नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी जिंतूर येथील कर्मचारी शिवराज माणिकराव येवते यांनी गोंधळ घालून शिवीगाळ केल्याच...
नांदेड : नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी जिंतूर येथील कर्मचारी शिवराज माणिकराव येवते यांनी गोंधळ घालून शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या प्रकरणी नांदेड रजिस्ट्री कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विठ्ठल भोसले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३५१ व ३५२ (३५२/२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजिस्ट्री कार्यालयात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शिवराज येवते यांना ताब्यात घेतले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही शिवीगाळ केल्याचा आरोप
या घटनेदरम्यान मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा आणि दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांनाही प्रतिसाद मिळाला नाही. उलट, त्यांच्यासोबतही शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटना मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन पितवार, जिल्हाध्यक्ष सुभाष चोरे, शरदकुमार सोने, संघटनेचे मराठवाडा सहसचिव मुजीब खान मुस्तफा खान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रजिस्ट्री कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि दस्तलेखकांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रजिस्ट्री कार्यालयातील दलालांवरही कारवाईची मागणी
दरम्यान, नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालय परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दलालांचा एक गट सक्रिय असल्याची चर्चा आहे. या कथित दलालांवरही जिल्हा निबंधक कार्यालयाकडून लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रजिस्ट्री कार्यालयातील अनियमितता आणि कथित दलालीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS