उमरी/नरेंद्र येरावार*
आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, भगवंताचे चिंतन करा, नामस्मरण करा आणि संत संगती करा, असा अमूल्य संदेश परमपूज्य आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज यांनी उमरी येथे दिला.
उमरीतील वामनतीर्थ महादेव मंदिरात आयोजित शिवमहापुराण कथेला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
यंदाही शिवमहापुराण कथेसाठी मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला.
कथेच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांचा ओघ सुरू झाला. सकाळपासूनच महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग कथास्थळी दाखल झाला होता.
कथेचे निरूपण करताना आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज म्हणाले, "मानव जन्म दुर्मिळ आहे. हा जन्म केवळ खाणे, पिणे आणि पैसा कमावण्यासाठी नाही. या आयुष्यात परमार्थ, सेवा आणि सत्कर्म यांना प्राधान्य दिले पाहिजे. दररोज थोडा वेळ भगवंताच्या नामासाठी काढा. नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि जीवनातील दुःख दूर होतात.
ते पुढे म्हणाले, "संतांची संगती हीच खरी संपत्ती आहे. संत जे सांगतात ते आचरणात आणले तरच जीवनाला अर्थ प्राप्त होतो. शिवमहापुराण आपल्याला वैराग्य, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवते.
महाराजांनी कथेमधून अनेक प्रसंगांचे रसाळ वर्णन केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
शिवमहापुराण कथा ऐकून अनेक भाविकांनी आपले जीवन सार्थकी लावण्याचा संकल्प केला. आयुष्याचा खरा उपयोग भगवंताच्या चरणी आणि समाजसेवेत आहे" हा संदेश घेऊन सर्वजण घरी परतले.
या कथेसाठी गायक दीपक मालवे, तबला वादक संदिप गवई, ऑर्गन वादक केवल बनसोड, बॅन्जो वादक गौतम वासनिक, पॅड वादक गौरव पांडे साथ देणार आहेत. तसेच झांकी सजावट हेमराज काळे आणि सोशल मीडिया व्यवस्थापन माधवराव पाटील व देवराव करपे पाहत आहेत.

COMMENTS