नांदेड, [दि.१७/०८/२०२६] -
यशवंत महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या सुविधांची ओळख करून देण्यासाठी 'ग्रंथालयाची पारंपारिक संसाधने व ई-संसाधनांचा वापर' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथपाल डॉ. कैलास एन.वडजे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची रचना, ग्रंथसंग्रह, ई-वाचन साहित्य, नियतकालिके, संशोधन पत्रिका तसेच ग्रंथालयाच्या विविध सोयीसुविधांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वेबओपेक आणि एन-लिस्ट कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या ई-संसाधनांचा सदैव वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच मोबाईलवर प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे प्रशिक्षणही देण्यात आले.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सत्राचे अध्यक्षपद डॉ. माधव एस. दुधाटे यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि ई-संसाधनांचा योग्य समतोल साधून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे महत्त्व सांगितले. इंग्रजी विभागाचे डॉ. रत्नमाला म्हस्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. एच. एस. पतंगे यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील विविध अहवाल व संदर्भ ग्रंथांचा दैनंदिन अभ्यासासाठी पुरेपूर वापर करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भारती सुवर्णकार यांनी केले.
कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. कैलास इंगोले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध असलेल्या या सुविधांचा शैक्षणिक व स्पर्धात्मक विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक इंग्रजी विभागाचे डॉ. रत्नमाला मस्के यांनी केले.
कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भोळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, शिक्षकेत्तर व ग्रंथालय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.

COMMENTS