( प्रा. डॉ. मथुताई सावंत ह्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहेत. एक उपक्रमशील शिक्षिका, सिद्धहस्त लेखिका आणि समाजभान जपणाऱ्या बहुआय...
(प्रा. डॉ. मथुताई सावंत ह्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहेत. एक उपक्रमशील शिक्षिका, सिद्धहस्त लेखिका आणि समाजभान जपणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा हा मागोवा......) काही शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम शिकवतात, काही शिक्षक त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयार करतात; पण काही मोजके शिक्षक असे असतात, जे विद्यार्थ्यांना जगणे शिकवतात, विचार करायला शिकवतात आणि स्वतःमधील सामर्थ्य ओळखायला शिकवतात. अशा शिक्षकांची निवृत्ती ही त्यांच्या कार्याची समाप्ती नसते, तर त्यांनी घडविलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या रूपाने त्यांच्या कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असते. नांदेडच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक विश्वातील बहुआयामी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मथुताई सुरेश सावंत.
१९८६ ते २००५ अशी सुमारे वीस वर्षे राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर मराठीचे अध्यापन केल्यानंतर सप्टेंबर २००५पासून पीपल्स कॉलेज, नांदेड येथे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन आणि संशोधन मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी केले.
म्हणून त्यांची वाटचाल केवळ शिक्षक ते प्राध्यापक एवढी नाही; ती ‘शिकवता शिकवता स्वतः शिकत राहणाऱ्या एका ज्ञानसाधकाची वाटचाल’ आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी शिक्षिका डॉ. मथुताई सावंत यांच्यासाठी विद्यार्थी म्हणजे केवळ वर्गातील रोल नंबर नव्हता. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एखादा सुप्त लेखक, वक्ता, कवी, विचारवंत किंवा कलावंत दडलेला असतो, यावर त्यांचा विश्वास होता.
विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी ‘चाहूल’ आणि ‘फुलोरा’ यांसारख्या वार्षिक अंकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कथा, कविता आणि लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांचे साहित्य संकलित-संपादित करून त्याला व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी संसद, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, निबंधलेखन, कथाकथन आणि काव्यवाचन अशा विविध उपक्रमांसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली. शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश, शैक्षणिक शुल्क आणि इतर साहित्याच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचे कार्यही त्यांच्या सेवेला अधिक मानवी बनवते.
त्यांनी शाळांमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना थेट लेखक-कवींशी संवाद साधण्याची संधी निर्माण केली. शिक्षक म्हणून हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुस्तकातील धडा शिकवण्यापेक्षा त्या धड्यामागील साहित्यविश्व विद्यार्थ्यांसमोर जिवंत करणे ही खरी अध्यापनकला आहे.
लेखणीला समाजाच्या वेदनेचे भान :
डॉ. मथुताई सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा भक्कम पैलू म्हणजे त्यांचे साहित्य.
कथा, कादंबरी, चरित्र, नाटक, बालसाहित्य, समीक्षा, संशोधन आणि संपादन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. ‘पाण्यातील पायवाट’, ‘राहु-केतू’, ‘जिनगानी’, ‘समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’, ‘राजर्षी शाहू महाराज’, ‘नवरसांची नवलाई’, ‘तिची वाटच वेगळी’, ‘कथाकार भास्कर चंदनशिव’, ‘निवडुंगाची फुलं’, ‘पाणबळी’, ‘सर्जनाचा शोध’, ‘लगीनघाई? मुळीच नाही!’, ‘समाज, साहित्य आणि संस्कृती’, ‘साहित्यसौरभ’, ‘अधोरेखित’ आणि ‘अक्षरवाटा’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती त्यांच्या विस्तीर्ण साहित्यविश्वाची साक्ष देतात.
त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कल्पनेच्या आभाळात तरंगत नाही; त्याचे पाय मातीमध्ये घट्ट रोवलेले आहेत. मराठवाड्यातील ग्रामीण जीवन, स्त्रियांचे दुःख, सामाजिक विषमता, मानवी नातेसंबंध, राजकारणातील विसंगती, सामान्य माणसाची घुसमट आणि त्याच वेळी संकटांवर मात करण्याची माणसाची जिद्द त्यांच्या साहित्यामधून व्यक्त होत राहते.
‘राहु-केतू’ ह्या कादंबरीत ग्रामीण राजकारणाचे वास्तव दिसते. ‘जिनगानी’मध्ये ग्रामीण स्त्रीजीवनाची वेदना आकार घेते. ‘तिची वाटच वेगळी’ आणि ‘पाणबळी’ यांसारख्या कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनातील स्त्रीच्या संघर्षाचे विविध पदर उलगडतात. त्यांच्या लेखनात वेदना आहे; पण निराशा नाही. प्रश्न आहेत; पण त्या प्रश्नांमधून परिवर्तनाची शक्यता शोधण्याची धडपडही आहे.
पुरस्कारांनी गौरवलेली साहित्यसाधना :
त्यांच्या साहित्यकृतींना महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
'पाण्यातील पायवाट’ला स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य पुरस्कार, 'राहु-केतू’ला महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार, नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, फुले-आंबेडकरवादी साहित्य पुरस्कार आणि बडोद्याचा अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले.
विशेषतः ‘तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कारासह विविध संस्थांचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. त्यांच्या इतर साहित्यकृती आणि समग्र साहित्यिक योगदानालाही राज्यभरातील विविध संस्थांनी गौरविले आहे
मात्र पुरस्कारांची संख्या ही त्यांच्या कार्याची खरी उंची नाही. वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करणे, उपेक्षित माणसाच्या वेदनेला शब्द देणे आणि स्त्रीच्या संघर्षाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणे, हा त्यांच्या लेखणीला मिळालेला सर्वांत मोठा पुरस्कार आहे. साहित्यनिर्मितीबरोबर साहित्यचळवळ स्वतः लिहिणारा लेखक महत्त्वाचा असतो; पण इतरांनाही लिहिते करणारा लेखक अधिक महत्त्वाचा ठरतो.
डॉ. मथुताई सावंत यांनी अनेक वर्षे ‘साहित्य संजीवन’ या वार्षिकाच्या संपादक म्हणून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कथा, कविता आणि लेख महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या नियतकालिकांत प्रकाशित झाले. दूरदर्शनवर त्यांचे काव्यवाचन झाले, तर आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कथा, कविता, मुलाखती आणि भाषणे प्रसारित झाली.
साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन सोहळे आणि साहित्यिक स्पर्धांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. साहित्यविश्वातील नव्या प्रतिभेला संधी देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्या केवळ ‘लेखिका’ न राहता ‘साहित्यचळवळीतील कार्यकर्त्या’ बनल्या.
संशोधक आणि संशोधन मार्गदर्शक :
पीएच.डी. प्राप्त करून स्वतः संशोधन करण्यापुरती त्यांची संशोधनयात्रा मर्यादित राहिली नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध विद्यापीठीय जबाबदाऱ्या, परीक्षा, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक चर्चासत्रांमध्येही त्यांनी योगदान दिले.
घरामध्ये सुमारे चार हजार पुस्तकांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह निर्माण करून सातत्याने स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याची त्यांची धडपड विशेष उल्लेखनीय आहे. ही बाब शिक्षकांसाठीही एक संदेश देते, चांगला शिक्षक तोच, जो आयुष्यभर विद्यार्थी असतो.
वर्गखोलीच्या पलीकडची समाजशिक्षिका :
डॉ. मथुताई सावंत यांचे कार्य वर्गखोलीच्या चार भिंतींपुरते कधीच मर्यादित राहिले नाही.
महिला आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांपासून ग्रामीण भागातील सामाजिक कार्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महिला तक्रार निवारण व विद्यार्थिनी समुपदेशन, कौटुंबिक समस्या निवारण, महिला-बालकल्याण, ग्रामीण महिलांमध्ये जनजागृती, गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा अनेक क्षेत्रांशी त्यांचा संबंध राहिला.
त्यांच्या सामाजिक योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, प्रियदर्शिनी पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यांसह विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले. २०२६ मध्ये संध्याताई फाउंडेशनतर्फे त्यांना ‘साहित्यरत्न पुरस्कार’ देऊनही गौरविण्यात आले. साहित्यिक संवेदनशीलता जेव्हा प्रत्यक्ष सामाजिक कार्यात उतरते, तेव्हा लेखकाचे व्यक्तिमत्त्व अधिक उन्नत होते. डॉ. मथुताई सावंत यांच्या बाबतीत साहित्य आणि समाजकार्य यांचे हे नाते प्रकर्षाने जाणवते.
दोन साहित्ययात्रींचे सहजीवन : डॉ. मथुताई आणि डॉ. सुरेश सावंत
डॉ. मथुताई सावंत यांच्या साहित्यिक प्रवासाचा विचार करताना डॉ. सुरेश सावंत यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. सावंत दांपत्याने आपले आयुष्य अक्षरशः शिक्षण आणि साहित्यसेवेला वाहून घेतले आहे. डॉ. सुरेश सावंत हे महाराष्ट्रातील मान्यवर लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि विशेषतः बालसाहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या ‘आभाळमाया’ या बालकवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. कथा, कविता, चरित्र, समीक्षा, संशोधन, संपादन आणि विशेषतः बालसाहित्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे.
एका घरात दोन लेखक असणे ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही; त्या घरात सतत पुस्तकांची, विचारांची, विद्यार्थ्यांची, साहित्याची आणि समाजाची चर्चा होत राहणे ही एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असते.
डॉ. मथुताई सावंत आणि डॉ. सुरेश सावंत हे दांपत्य म्हणजे दोन स्वतंत्र साहित्यप्रवाह एकाच मूल्यनिष्ठ ध्येयाकडे वाहत राहिल्याचे सुंदर उदाहरण आहे.
एकीकडे बालमनाला शब्द देणारे डॉ. सुरेश सावंत आणि दुसरीकडे ग्रामीण जीवन, स्त्रीवेदना, समाजवास्तव आणि मानवी मूल्यांना अभिव्यक्त करणाऱ्या डॉ. मथुताई सावंत या दोघांच्या कार्यामुळे सावंत परिवाराने महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात स्वतःची स्वतंत्र अक्षरमुद्रा उमटवली आहे.
वाचन चळवळीसाठी समर्पित आयुष्य :
आजचे युग प्रचंड वेगाने बदलत आहे. हातात मोबाईल आला. माहितीचा महासागर एका क्लिकवर उपलब्ध झाला; पण या वेगात शांतपणे बसून पुस्तक वाचण्याची सवय मात्र कमी होत चालल्याची चिंता सातत्याने व्यक्त केली जाते. माहिती वाढत असताना चिंतन कमी होत आहे आणि तंत्रज्ञान वाढत असताना पुस्तकांशी असलेली मैत्री तुटू लागली आहे, हे आजच्या समाजासमोरील मोठे सांस्कृतिक आव्हान आहे. अशा काळात सावंत दांपत्याचे वाचनसंस्कृतीसाठीचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते. त्यांनी वाचनासाठी केवळ उपदेश केला नाही; तर स्वतः वाचत, लिहीत, विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करत आणि साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून पुस्तक व माणूस यांच्यातील नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला. वाचनसंस्कृती ही केवळ भाषणांतून निर्माण होत नाही; ती कृतीतून रुजवावी लागते. सावंत दांपत्याने हेच काम अतिशय शांतपणे केले आहे आणि करत आहेत.
त्यांच्या कार्यामध्ये प्रसिद्धीचा गजर कमी आणि साहित्यनिष्ठेचा स्वर अधिक आहे. कोणत्याही मोठ्या घोषणेशिवाय पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करणे, नव्या पिढीला वाचनाकडे वळवणे, लेखक-वाचकांमधील संवाद वाढवणे आणि साहित्यिक संस्थात्मक कार्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची अनमोल अक्षरवाटाचे कार्य आहे.
वाट हरवलेल्या पिढीसाठी पुस्तकांचा प्रकाश :
आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस अनेकदा स्वतःपासूनच दूर जातो. यशाची स्पर्धा, तंत्रज्ञानाचे आकर्षण आणि सतत बदलणाऱ्या जगामध्ये मनाला स्थैर्य देणाऱ्या मूल्यांची गरज अधिक तीव्र होत आहे. अशा वेळी पुस्तक हे केवळ मनोरंजनाचे साधन राहत नाही; ते माणसाचे मित्र, मार्गदर्शक आणि कधी कधी आयुष्याला नवी दिशा देणारे माध्यम ठरते.
म्हणूनच सावंत दांपत्याने वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी केलेले कार्य हे केवळ साहित्य क्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते माणूस घडविण्याचे कार्य आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात योग्य वयात योग्य पुस्तक पडले, एखाद्या तरुणाला एखाद्या पुस्तकातून आयुष्याची दिशा सापडली किंवा एखाद्या वाचकाच्या मनात साहित्यामुळे संवेदनशीलता जागी झाली, तर त्यामागे वाचनसंस्कृती जिवंत ठेवणाऱ्या अशा निःशब्द कार्यकर्त्यांचे योगदान असते.
पुरस्कार आले; पण पाय जमिनीवरच राहिले.
साहित्यविश्वानेही सावंत दांपत्याच्या योगदानाची वेळोवेळी दखल घेतली. त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाचा विविध पुरस्कार-सन्मानांच्या माध्यमातून गौरव झाला. मात्र पुरस्कार हा कार्याचा अंतिम मुक्काम न मानता, समाजाने दिलेली जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची त्यांची वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे. पुरस्कारांनी त्यांची उंची वाढवली असे म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्यामुळे पुरस्कारांची प्रतिष्ठा वाढली, असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल. सन्मान मिळाल्यानंतरही प्रसिद्धीच्या झगमगाटात न हरवता, अत्यंत साधेपणाने आणि शांतपणे आपली साहित्यसाधना सुरू ठेवणे हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती आहे.
त्यांनी मिळालेला गौरव स्वतःपुरता न ठेवता समाजाप्रति, साहित्याप्रति आणि वाचकांप्रति कृतज्ञतेने समर्पित केला. त्यामुळे त्यांची साहित्यसेवा ही वैयक्तिक यशाची कहाणी न राहता एका सामाजिक-सांस्कृतिक बांधिलकीची चळवळ ठरते.
एका घरातून सुरू असलेली अक्षरांची चळवळ :
सावंत दांपत्याकडे पाहताना एक सुंदर विचार मनात येतो, 'ज्या घरात पुस्तके जगतात, त्या घरातून संस्कार समाजात प्रवाहित होत राहतात.
डॉ. सुरेश सावंत यांनी बालसाहित्याच्या माध्यमातून बालमनाशी संवाद साधला; तर डॉ. मथुताई सावंत यांनी अध्यापन, संशोधन, लेखन आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्यातून संवेदनशीलतेची पेरणी केली. या दोघांच्या कार्याची दिशा वेगवेगळी दिसली तरी अंतिम ध्येय एकच आहे, वाचनशील, विचारशील, संवेदनशील आणि संस्कारित समाजाची निर्मिती. हेच सावंत दांपत्याच्या सहजीवनाचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. संसार आणि साहित्य, कुटुंब आणि सामाजिक बांधिलकी, लेखन आणि वाचन चळवळ या सर्वांचा सुंदर समन्वय त्यांच्या आयुष्यात दिसतो. म्हणूनच त्यांचे सहजीवन नव्या पिढीतील साहित्यिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
सेवानिवृत्ती म्हणजे पूर्णविराम नव्हे...
३१ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. मथुताई सावंत आपल्या औपचारिक शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहेत. पण अशा व्यक्ती खरोखर निवृत्त होतात का? महाविद्यालयातील तासिका थांबेल; पण त्यांच्या विचारांची तासिका सुरूच राहील.
हजेरीपटावरची सही थांबेल; पण त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर उमटलेली सही कधीच पुसली जाणार नाही. वर्गातील फळ्यावर लिहिणारा खडू थांबेल; पण त्यांच्या लेखणीने समाजाच्या मनःपटलावर कोरलेली अक्षरे कायम राहतील. कारण शिक्षकाच्या आयुष्याची खरी मोजणी त्याने किती वर्षे नोकरी केली यात होत नाही; त्याने किती आयुष्यांना दिशा दिली, किती विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला आणि किती मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली, यात होते.
डॉ. मथुताई सावंत यांनी शिक्षणातून विद्यार्थी घडवले, लेखणीतून समाजमन जागवले, संशोधनातून ज्ञानाची वाट समृद्ध केली आणि सामाजिक कार्यातून संवेदनशीलतेला कृतीची जोड दिली. म्हणून त्यांच्या सेवापूर्तीच्या या क्षणी एवढेच म्हणावेसे वाटते, त्या महाविद्यालयाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत; ज्ञानातून नाही.
त्या वर्गखोलीतून बाहेर पडत आहेत; विद्यार्थ्यांच्या मनातून नाही.
त्या पदावरून निवृत्त होत आहेत; पण साहित्य-संस्कृतीच्या जबाबदारीतून नाही.
त्यांच्या हातातील अध्यापनाचा खडू आता औपचारिकरीत्या खाली ठेवला जाईल; पण त्यांच्या हातातील लेखणी अधिक मुक्तपणे चालत राहील, याची खात्री आहे.
मराठी साहित्याला अजून अनेक कथा, कादंबऱ्या, समीक्षा आणि वैचारिक लेखन त्यांच्या लेखणीतून लाभो; नव्या पिढीतील लेखकांना त्यांचे मार्गदर्शन लाभो आणि त्यांच्या ज्ञानसाधनेचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत राहो, हीच त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने मनःपूर्वक सदिच्छा!
डॉ. मथुताई सावंत यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मनःपूर्वक सलाम आणि त्यांच्या पुढील अक्षरयात्रेला अनंत शुभेच्छा!
एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका, प्राध्यापिका, संशोधन मार्गदर्शक, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, चरित्रलेखिका, नाटककार, संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्या. चार दशकांची त्यांची ज्ञानसाधना आता औपचारिक सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर आली असली, तरी त्यांनी पेटवलेले ज्ञानदीप पुढील अनेक पिढ्यांच्या वाटा उजळत राहतील.
प्राथमिक शिक्षिकेपासून प्राध्यापिकेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास :
डॉ. मथुताई सावंत यांच्या वाटचालीतील सर्वांत प्रेरणादायी बाब म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच स्वतःचे शिक्षण सातत्याने चालूच ठेवले. डी.एड.नंतर प्राथमिक शिक्षिका म्हणून सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी बी.ए., एम.ए. (मराठी), बी.एड. आणि पुढे पीएच.डी.पर्यंत मजल मारली. ‘प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन केले.१९८६ ते २००५ अशी सुमारे वीस वर्षे राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर मराठीचे अध्यापन केल्यानंतर सप्टेंबर २००५पासून पीपल्स कॉलेज, नांदेड येथे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन आणि संशोधन मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी केले.

- प्रकाश गिरे पाटील
- नांदेड

COMMENTS