डॉ. मथुताई सावंत : एक चिंतनशील लेखिका छाया बेले, नांदेड.

  आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात की, त्यांचा व आपला प्रत्यक्ष सहवास किती काळ आहे, हे महत्त्वाचं नसतं. काही क्षणांच्या भेटीतच एखाद्या व्यक्...

 

आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात की, त्यांचा व आपला प्रत्यक्ष सहवास किती काळ आहे, हे महत्त्वाचं नसतं. काही क्षणांच्या भेटीतच एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्या मनावर ठसा उमटून जातो. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रा. डॉ. मथुताई सावंत. त्यांच्याशी पहिली ओळख ही त्यांच्या कथासंग्रहातून झाली. आपल्या काळातील व आपल्या भागातील स्त्रीलेखिकांचा शोध घेत असताना मथुताईंचा 'तिची वाटच वेगळी ' हा कथासंग्रह हाती आला. 


अनेक लेखकांची अनेक पुस्तकं वाचनात आली. 

सगळेच काही लक्षात राहत नाहीत; मात्र 

'तिची वाटच वेगळी' हा कथासंग्रह अंतःकरणात कुठेतरी साठून राहिला. 

याचं कारण असं की, या कथांमधून ताईंनी मराठवाड्यातील स्त्रीजीवनाचं वास्तव एवढ्या तळमळीनं, जीवाच्या जिव्हाळ्यानं मांडलं आहे की ते थेट अंतःकरणाला भिडतं. तेव्हापासून मथूताईंना भेटण्याची आतुरता लागून होती. ती संधी प्रसाद बन साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने आली. तो क्षण अविस्मरणीय होता. जेवढी सच्चाई ताईंच्या लिखाणात तेवढीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून आली. सहज, सुंदर, नितळ, निर्मळ आणि निखळ स्वभाव. बघताच मनात आदर निर्माण होतो. 


डॉ. मथुताईं यांचा आज १५ ऑगस्टला वाढदिवस आहे. नियत वयोमानानुसार याच महिन्याच्या ३१ तारखेला ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून त्या सेवानिवृत्त होत आहेत. म्हणूनच हा क्षण अंतःकरणपूर्वक आदर व्यक्त करण्याचा क्षण आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माझ्या मनात असलेला आदर हा केवळ त्या ज्येष्ठ आहेत म्हणून नाही, तर त्यांच्या विचारात असलेल्या समष्टीच्या कळवळ्यामुळे. ज्येष्ठत्वाला खरा अर्थ प्राप्त होतो तो अनुभवातून, विचारांच्या प्रगल्भतेतून, माणसांविषयीच्या संवेदनशीलतेतून. 


साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची खरी उंची केवळ प्रकाशित पुस्तकांच्या संख्येने किंवा मिळालेल्या सन्मानांनी ठरत नाही; ती ठरते आपल्या शब्दांमागील प्रामाणिकपणाने, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीने आणि आपल्या लेखणीने किती मनांना स्पर्श केला याने. ही ताकद मथुताईंच्या लेखणीत आहे. 

माणसाच्या वास्तव जीवनाशी जोडलेले साहित्य हेच खरे साहित्य असते. सुख-दुःखांचे, संघर्षांचे, स्वप्नांचे, अस्वस्थतेचे आणि आशेचे सूक्ष्म प्रतिबिंब मथुताईंच्या साहित्यामध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांचं साहित्य सामान्य माणसाच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. साहित्य हा समाजाशी, जगण्याशी केलेला अर्थपूर्ण संवाद असतो‌.

त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या अनुभवाची खोली, संवेदनशीलतेची जाणीव आणि शब्दांकडे पाहण्याची सजग दृष्टी त्यांच्या कथा व कवितेतून दिसून येते.


साहित्याच्या वाटेवर चालणे ही तशी सोपी गोष्ट नक्कीच नाही. माणसाच्या जगण्याशी संबंधित 

अनेक प्रश्न समोर उभे असतात. त्या प्रश्नांना शब्द देताना, उत्तरं शोधताना लेखकाला स्वतःच्या आत उतरावं लागतं. अनेकांचं दुःख जगावं लागतं. कधी समाजाशी संवाद साधावा लागतो, कधी स्वतःशीच संघर्ष करावा लागतो. 

काही अनुभव लिहिता येतात, काही मनातच दीर्घकाळ साठवून ठेवावे लागतात. या सगळ्या प्रक्रियेतून साहित्यिकाची दृष्टी अधिक व्यापक होत जाते. काळाच्या ओघात त्याच्या शब्दांना अनुभवाचे गहिरेपण प्राप्त होते.


ज्येष्ठ साहित्यिकांकडे म्हणूनच आपण केवळ लेखक म्हणून पाहू नये, तर एका प्रदीर्घ अनुभवसंपन्न परंपरेचे वाहक म्हणूनही पाहिले पाहिजे. त्यांच्या आधीच्या पिढ्यांकडून त्यांनी काही घेतलेले असते आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते काहीतरी सोडून देत असतात. त्यांच्या लेखणीतील विचार, त्यांच्या कार्यातील शिस्त, साहित्याविषयीची निष्ठा आणि त्यांच्या वाटचालीतील सातत्य हे पुढे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असते.


लिहिणाऱ्याला जबाबदाऱ्या व सर्जनशीलता यांचा समतोल साधणे ही स्वतःमध्येच एक मोठी साधना करावी लागते. कारण लेखनासाठी केवळ वेळ पुरेसा नसतो; त्यासाठी मनाची मशागत आवश्यक असते. दैनंदिन जीवनाच्या व्यापातूनही मनातला लेखक जिवंत ठेवणे, हीच एका साहित्यिकाची खरी जिद्द असते. मथुताई ह्या हाडाच्या शिक्षिका आहेत. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी २१ वर्षे अध्यापन केले आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. प्राथमिक शिक्षिका ते वरिष्ठ महाविद्यालयील प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक, हा त्यांचा प्रवास आधुनिक काळातील स्त्रियांना प्रेरणादायी असाच आहे. 


मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या कथांचा त्यांनी पीएच. डी.साठी सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांचा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित झाला आहे. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. 

आता सेवापूर्तीच्या या टप्प्यावर त्या कार्यालयीन, शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत आहेत. 

आता निवांत वेळ नातवंडांच्या सहवासात रमणे आणि लेखन करणे याला प्राधान्य देणार असे ताईंनी सांगितले.

जीवनानुभवांकडे अधिक तटस्थपणे पाहण्याची, आठवणींच्या कप्प्यांमध्ये दडलेल्या असंख्य कथांना शब्द देण्याची आणि मनात साठलेल्या विचारांना आकार देण्याची हीच वेळ आहे.

आतापर्यंत कर्तव्यांच्या चौकटीत जगलेले क्षण आता चिंतनाच्या प्रकाशात पुन्हा अनुभवता येतात. 


मागे वळून पाहताना माणसं, प्रसंग, संघर्ष, यशाचे क्षण, अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जायचे, असं काही नव्यानं समोर येते. साहित्यिकासाठी तर हा सगळा अनुभव म्हणजे एका समृद्ध सर्जनविश्वाची बीजे असतात.

निवृत्ती ही सर्जनाच्या वसंताची सुरुवात म्हणायला हरकत नाही. आतापर्यंतच्या अनुभवांना शब्दात उतरविण्यासाठी 

अधिक मोकळे निवांत क्षण मिळतील.

पुढील लिखाणातून आपल्याला त्यांच्या साहित्याचे आणखी काही सुंदर पैलू उलगडताना दिसतील.


त्यांच्या अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीसाठी प्रेरणेचे भांडार ठरेल, यात शंकाच नाही.

मथुताईंच्या कार्याचा ठसा काळाच्या नोंदीत राहो. आपल्या पुढील आयुष्याचा प्रत्येक दिवस अधिक आनंददायी, अर्थपूर्ण, सर्जनशील राहो.

आपली लेखणी अशीच अखंड चालत राहो. आपल्या शब्दांचा प्रकाश अनेकांच्या वाटेला उजेड देत राहो. माझ्या आवडत्या लेखिका प्रा. डॉ. मथुताई सावंत यांना वाढदिवसाच्या निमित्ताने काळीजभर शुभेच्छा! 


छाया बेले, नांदेड

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group