नांदेड :
सामाजिक क्षेत्रात गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘सामाजिक आयकॉन पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे राज्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा पार पडेल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांनी दिली आहे. ॲड. ठाकूर यांना देश-विदेशातून आतापर्यंत ११४ पुरस्कार मिळाले असून, हा त्यांचा विक्रमी ११५ वा पुरस्कार ठरणार आहे.
चार दशकांची अखंड निष्काम समाजसेवा
ॲड. दिलीप ठाकूर यांनी सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उभारलेले कार्य थक्क करणारे आहे:
अन्नदान व मानवता फ्रिज: गेल्या २३ वर्षांत २५ लाखांहून अधिक जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत. शहरात अन्न वाया जाऊ नये म्हणून सुरू केलेल्या ‘भाऊचा मानवता फ्रिज’मधून रोज ४० ते १२० डबे गरजूंना दिले जातात.
‘कायापालट’ उपक्रम: गेल्या ८१ महिन्यांपासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी बेघर व मानसिक संतुलन गमावलेल्या व्यक्तींची केस-दाढी कटिंग, अंघोळ, नवीन कपडे व १०० रुपयांचे बक्षीस देऊन त्यांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणले जाते.
हंगामांनुसार मदत: हिवाळ्यात १४ हजार उबदार चादरी, पावसाळ्यात 'कृपाछत्र' उपक्रमातून १४ हजार छत्र्या (यावर्षी २०२६ छत्र्या वाटप सुरू), तर उन्हाळ्यात 'चरण सेवा' अंतर्गत १४ हजार चप्पलांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
धार्मिक व सांस्कृतिक योगदान: सलग २६ वर्षांपासून 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर अमरनाथ यात्रा आयोजन, २५ वर्षांपासून हजारो महिलांच्या सहभागाने 'गोदावरी गंगा पूजा' आणि ३६ वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांना गणेशमूर्ती भेट देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे.
आरोग्य व शैक्षणिक उपक्रम: स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांसोबतच शालेय साहित्य वाटप व मोफत औषधोपचार शिबिरांचे ४० वर्षांपासून आयोजन केले जात आहे.
सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव २०२६ चे आयोजन
सप्तरंग सेवाभावी संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान कुसुम सभागृहात ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव-२०२६’ आयोजित केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय नृत्य-संगीत स्पर्धा, शास्त्रीय व लोकनृत्य, तृतीयपंथी सशक्तीकरण चर्चासत्र, रोजगार मेळावा आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर होणार आहे.
ॲड. दिलीप ठाकूर यांच्या या ऐतिहासिक ११५ व्या पुरस्कार सोहळ्यास तसेच सांस्कृतिक महोत्सवास नागरिकांनी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमरनाथ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS