लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ विधानसभेतील उपस्थिती नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, अडीअडचणीच्या काळात धावून जाणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा नेता. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आपल्या कार्यातून ही ओळख निर्माण केली आहे. सामान्य शिवसैनिकापासून आमदारपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, जनसंपर्क आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रवास आहे.
आमदार बोंढारकर यांच्या राजकीय जडणघडणीत नामदार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. संघटनात्मक काम करताना त्यांनी जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका आत्मसात केली. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
आमदार बोंढारकर यांची एक वेगळी ओळख म्हणजे चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असलेला नेता. दिवस असो वा रात्र, नागरिकांचा फोन आल्यास तो उचलण्याचा आणि शक्य तितक्या लवकर त्यांच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर कुटुंबातील माणूस म्हणून पाहतात.
मतदारसंघातील विकासकामांना त्यांनी सातत्याने गती दिली आहे. विविध रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, शासकीय इमारती, सामाजिक सुविधा आणि सार्वजनिक विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करून विकासाची प्रक्रिया अखंड सुरू ठेवली आहे. प्रत्येक गावात विकासाची कामे पोहोचावीत, हा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.
सहज उपलब्ध होणारे आमदार ही त्यांची आणखी एक ओळख आहे. कार्यालयात, गावभेटीत किंवा एखाद्या कार्यक्रमात नागरिकांना कोणत्याही दिमाखाशिवाय भेटून त्यांचे प्रश्न ऐकणे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधणे, ही त्यांची कार्यशैली आहे.
आरोग्य सेवांबाबतही त्यांनी संवेदनशीलता दाखवली आहे. दर तीन महिन्यांनी शासकीय रुग्णालयांना भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेणे, रुग्णांच्या अडचणी जाणून घेणे आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला सूचना देणे, हा उपक्रम त्यांनी सातत्याने राबविला आहे.
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत विष्णुपुरी येथे विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन वस्तीगृह उभारण्याचा पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात येताना होणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, हा या प्रयत्नामागील उद्देश आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. विष्णुपुरी येथून शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवीन पाईपलाईन मंजूर करून आणण्यासाठी त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. शेतीला पाणी मिळाल्याशिवाय ग्रामीण विकास शक्य नाही, या भूमिकेतून त्यांनी हा विषय प्राधान्याने हाताळला.
विधानसभेत त्यांनी केवळ मतदारसंघाचे नव्हे, तर समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले. गोरगरीब, कष्टकरी, दीन-दुबळे, ज्येष्ठ नागरिक, पोलीस भरतीची तयारी करणारे युवक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांच्या समस्यांवर त्यांनी वारंवार आवाज उठविला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गोदावरी नदी स्वच्छ करण्याचे स्वप्न त्यांनी हाती घेतले आहे. गोदावरीचे प्रदूषण कमी करून नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहावी, अशी त्यांची भूमिका आहे.
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील अंडरपास दुर्घटनेनंतर त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडला. लोकांच्या जीवाशी संबंधित विषयांवर तडजोड न करण्याची त्यांची भूमिका यावेळी पुन्हा अधोरेखित झाली.
आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या कार्याची खरी ताकद म्हणजे जनतेशी असलेली नाळ. लग्नसोहळा असो, दुःखद प्रसंग असो, शेतकऱ्यांचे आंदोलन असो किंवा एखाद्या कुटुंबावर आलेले संकट—ते शक्य तितक्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते केवळ निवडून आलेले आमदार नसून, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे जननेते म्हणून ओळखले जातात.
१ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. हा दिवस केवळ शुभेच्छांचा नसून, जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, विकासाला गती देणाऱ्या, विधानसभेत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या आणि प्रत्येक नागरिकाला सहज उपलब्ध असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. नामदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातून घडलेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची वाटचाल करणारे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांचे नेतृत्व आगामी काळातही जनतेच्या विश्वासाला अधिक बळ देत राहो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्यांची मनापासूनची शुभेच्छा
जयराम पाटील गोळे गावकर



COMMENTS