कंधार (प्रतिनिधी), दि.१०जुलै२०२६
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिंदे गुट शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी मोठा राजकीय डाव टाकत मतदारसंघाची जम्बो नुतन कार्यकारिणी जाहीर केली. मंगळवारी कंधार येथील त्यांच्या 'किसान भवन' येथे आयोजित पत्रकार परिषदेत विविध आघाड्या, विभाग आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटन अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संघटनेची पुनर्बांधणी वेगाने सुरू असल्याचे शंकर अण्णा धोंडगे यांनी सांगितले. जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मतदारसंघात विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विधानसभा प्रमुख, उपप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, युवा सेना, शिवसेना शेतकरी परिषद, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच शहर कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे पक्षाची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शंकर अण्णा धोंडगे म्हणाले की, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील ३३८ बूथवर युवक व पदाधिकारी नियुक्तीचे काम पूर्ण झाले असून, लवकरच महिला आघाडी, ओबीसी आघाडी, बाजार समिती व इतर विविध आघाड्यांच्या कार्यकारिण्याही जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे उतरल्याचे चित्र दिसणार आहे.

COMMENTS