भटक्या विमुक्त समाजाचे नेते मा. लक्ष्मनराव माने यांच्या सहवासात राहून समाजाचे दुःख जवळून अनुभवत समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी समाजकारण व राजकारणात यशस्वी वाटचाल करणारे फार कमी लोकं आपणास पाहायला मिळतील. त्यापैकीच उदगीर नगर परिषदेचे तीनवेळा सदस्य म्हणून लोकांच्या सेवेत असलेले श्री. अनिल मुदाळे यांचाआज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख....
श्री. अनिल नागोराव मुदाळे यांचा जन्म दि. 20 जुलै 1979 रोजी उदगीर येथे एका भटक्या विमुक्त वडार समाजात झाला. श्री. मुदाळे यांच्या घरी आठराविश्व दारिद्र्य वडील श्री. नागोराव मुदाळे हे भटक्या विमुक्त जमातीचे नेते लक्ष्मनराव माने यांचे समवेत काम करायचे. केवळ लक्ष्मनराव माने यांच्या शिक्षण शिकण्याच्या सूचनेवरून अनिल मुदाळे यांनी शिक्षणास प्रारंभ केला. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर, उच्च माध्यमिक शिक्षण श्यामलाल कनिष्ठ महाविद्यालय उदगीर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पदवी आणि शासकीय अध्यापक महाविदयालय अहिल्यानगर येथून अध्यापन पदवी प्राप्त केली. श्री. मुदाळे हे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना फार कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. रात्रीला दालमीलमध्ये 15 रू. मजुरीने काम केले व दिवसा शिक्षण घेतले. पारंपरिक व्यवसायही त्यांनी केला. वडार समाजातील परिसरातील एकमेव विद्यार्थी मुदाळेच्या रूपात बी. एड. झाला. याचा समाजाला अभिमान आहे. बी. ए. बी. एड. पर्यंत शिक्षण घेतल्यावर माने साहेब यांच्या मार्गदर्शनाने भटक्या विमुक्त जमातीच्या विकासासाठी संघटनेत कार्य सुरु. 2003 मध्ये त्यांची भटक्या विमुक्त जमातीचे उदगीर तालुकाध्यक्ष म्हणून निवड व कार्यास सुरुवात केली.मुदाळे यांनी उदगीर उपविभागीय कार्यालयासमोरमोर्चा काढला. या मोर्चामध्ये जवळपास 5000 लोकं उपस्थित होते. सामाजिक कार्य करीत असताना वेळोवेळी त्यांना राजकारणाची गरज भासू लागली. आणि अशातच तत्कालीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची जवळीक आली. आपल्या पक्षात भटक्या विमुक्त जमातीचा कार्यकर्ता असावा म्हणून त्यांनी मुदाळे यांना जवळ केले. त्याकाळात विधानसभा निवडणुका लागल्या. अनिल मुदाळे यांनी भटक्या विमुक्त जमातीचा भव्य मेळावा घेवून राष्ट्रवादीचा उमेदवार चंद्रशेखर भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी भटक्या विमुक्तचे नेते लक्ष्मनराव माने हेही उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर भोसले हे निवडून आले. नंतरच्या काळात चंद्रशेखर भोसले यांच्या आशीर्वादाने अनिल मुदाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.उपाध्यक्ष पदावर राहून मुदाळे यांनी भटक्या विमुक्तसाठी कार्य सुरु केले. उदगीर येथील भटक्या विमुक्त जमाती किंवा पाल टाकून राहणाऱ्या लोकांची प्रथम जनगणना करून त्या लोकांना राशन कार्ड मिळवून दिले. त्यांची नावे मतदार यादीत जोडली. या लोकांना श्रावणबाळ योजने अंतर्गत मानधन मिळवून दिले. वसंतराव नाईक आर्थिक विकास मंडळाकडून जवळपास 70 लोकांना अर्थसहाय्य मिळवून दिले. आमदार फंडातून भटक्या विमुक्तसाठी समाज मंदिर, स्मशान भूमी कंपाउंड वालचे काम केले. 1999 मध्ये वडार समाजातील नऊ जोडप्याचे सामूहिक विवाह सोहळा स्वखर्चाने पार पाडला.भटक्या विमुक्त जमातीच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा अवलंब करीत 2006 मध्ये त्यांनी बौद्ध धर्मान्तर केले. राजकारणात वाटचाल करीत असताना त्यांना जात, पैसा व लोकांचा पाठिंबा हया गोष्टी कमी पडत होत्या. 2006 मध्ये आ. चंद्रशेखर भोसले यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर शहराध्यक्ष केले.पुन्हा उदगीर नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या. पण काही तांत्रिक अडचणीमुळे श्री. मुदाळे यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. पुन्हा त्यांना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. 2007 मध्ये त्यांची भटक्या विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर उदगीर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. त्या माध्यमातूनही त्यांनी समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. जात प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजना, स्मशान भूमी व इतर महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले.भटक्या विमुक्त जमातीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होती. दि. 15 जून 2009 रोजी शहरातील भटक्या विमुक्त जमातीतील 100 विद्यार्थ्यांना घेवून रॅली काढून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदयालयात प्रवेश मिळवून दिला. त्यातील 60 - 70 विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहिले. अनेकजण शिकून आज स्वावलंबी बनले. काही महत्वाच्या कामासाठी श्री. मुदाळे यांना मोर्चे काढावे लागले. आंदोलन, उपोषण यात सहभागी व्हावे लागले.भटक्या विमुक्त जमातीचा एस. सी./ एस. टी. मध्ये समावेश करावा यासाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणात सहभागी झाले. अहिल्या नगर येथे शरद पवार साहेबाच्या उपस्थितीत हक्क परिषदेत सहभागी झाले. पुणे यशदाच्या वतीने भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्ता शिबिरात सहभाग. चंद्रपूर येथे बाबा आमटे यांच्या आनंदवनात एक महिना सेवा बजावली.हरियाणा येथील रुतम जिल्हा येथे 1996 ला आर्य समाजाच्या वतीने आयोजित योग शिबिरात सहभाग.भटक्या विमुक्त जमातीसाठी बचत गटाच्या स्थापना करून त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. श्री. अनिल मुदाळे यांनी अतिशय गरीब परिस्थितीचा सामना करीत शिक्षण घेत समाजकारण आणि राजकारणात वाटचाल केली. त्यामुळे परिस्थितीची जाणीव ठेवून अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करीत असतात. उदगीर शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना त्यांनी प्लास्टिकच्या घागरी विक्री, भंगार गोळा करून विकणे अशा व्यवसायास मदत करून जवळपास 20 कुटुंबाला त्यांनी जगण्याचा मार्ग दाखविला. आज ते कुटुंब हजारो रुपये कमवीत आपला उदरनिर्वाह चालवतात.एक उद्योजक, म्हणूनही मुदाळे यांची ओळख आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य चालू आहे.
अलीकडच्या काळात उदगीर विधानसभेचे भाग्यविधाते माजी मंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात सक्रिय असून पुन्हा ते उदगीर नगरपरिषदेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.विशेष म्हणजे ते एका प्रभागातून निवडून आले तर दुसऱ्या एका प्रभागात त्यांच्या पत्नी नगरसेवक म्हणून निवडून आल्या.आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते भटक्या विमुक्त जमातीच्या विकासासाठी प्रयत्न करीत असतात. आ. संजयभाऊ हे दूरदृष्टीचे राजकारणी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सक्रिय राजकारणात वाटचाल करीत आहेत. श्री. अनिल मुदाळे यांचा आहे वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया!
*शंकर बोईनवाड*
*पत्रकार , उदगीर*

COMMENTS