उदगीर / प्रतिनिधी :
बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यकार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांनी केले. ते उदगीर येथील अहिल्यादेवीगार्डन सभागृहात आयोजित माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार यांच्या 'बोलका ढोल' आणि 'मॅडम मॅडम शाळा सोडा' या दोन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका तथा माजी प्राचार्या सौ. मैनाताई साबणे ह्या होत्या. व्यासपीठावर लेखक बालाजी बिरादार आणि सौ. बिरादार यांची उपस्थिती होती.
डॉ. सावंत पुढे म्हणाले की, बालकांना बालसाहित्य वाचनाने अनुभवाचे आणि कल्पनेचे पंख फुटतात. बालकांची विनोदबुद्धी जागृत होते. त्यांची विचारप्रक्रिया गतिमान होते. त्यांच्या मानसिक शक्तींचा विकास होतो. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो. बालकुमारांचे आत्मभाव आणि आत्मभान जागे होते. घटना व घडामोडींना प्रतिसाद देण्याची दृष्टी मिळते. हे सर्व फक्त बालसाहित्य वाचनाने होते. त्यासाठी उत्तम बालसाहित्य निर्मिती होणे ही काळाची गरज असून बालाजी बिरादार यांचे बालसाहित्य बालकांच्या विकासासाठी उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी सौ. तोंडचिरकर आणि कु. अवनी स्वामी यांच्या स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. मुरलीधर जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर लेखक बालाजी बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अनंत कदम, डॉ. सुरेश सावंत, सौ. मैनाताई साबणे यांनी दोन्ही पुस्तकांवर सविस्तर भाष्य केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन तुळशीदास बिरादार यांनी केले, तर माजी प्राचार्य मोहनराव निडवंचे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS