विद्यार्थी अवस्थेसारख्या अंतर्बाह्य नाजुक अवस्थेत चित्त स्थिर ठेवून समाजनिर्मित आवाहनांना तोंड देण्यासाठी, एकंदरीत काय तर आयुष्याला वळण देण्यासाठी योग्य टाके घालणारी माणसे अवतीभवती असणं हा एक महत्वाचा योगायोग असतो. चौफेर उधळण्याच्या अवस्थेत चारापाण्याची व्यवस्था करणारी माणसं अलगदपणे छानशा वळणावर घेवून गेली म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होते.नाहीतरी सामान्य माणसाचे स्वप्न तरी याहून वेगळं काय असतं ? ग्रामीण भागात जेमतेम पोट भरणाऱ्या अनेक कुटुंबांनी आपल्या पोटाला चिमटी देत पिढ्या घडविल्या.म्हणून १९७० ते १९९५ या पंचवीस वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील अनेक तरुण उच्च विद्याविभूषित होवू शकले व स्वतःचा उदरनिर्वाह करीत करीत समाजऋण फेडू शकले. एका सामान्य निरक्षर कुटुंबात जन्मास येवून विविध क्षेत्रात पूर्णपणे झोकून देवून काम करणारी माणसं तयार झाली ती त्या कुटुंबातील कर्त्या माणसांच्या स्वप्नांचं फलित म्हणून ! लहानेवाडी ता.रेणापूर जि.लातूर या जेमतेम दोनशे ते अडीचशे लोकसंख्या असलेल्या आडवळणी खेड्यात तेरा - चौदा एकर कोरडवाहू जमीन कसणाऱ्या वारकरी संप्रदायी कुटुंबात दि. ६ जुलै १९७२ रोजी प्राचार्य डॉ. बाबुराव तुकाराम लहाने यांचा जन्म झाला. सन १९८० - ८५ च्या दरम्यान गावातील मुले जेव्हा नोकरीस लागली व सणासुदीला ते जेव्हा सुटकेस घेवून गावी येत तेव्हा पिता स्व. तुकाराम लहाने यांनाही वाटे की, आपलाही मुलगा सुटकेस घेवून शहरातून यावा आणि त्यासाठी त्यांनी अनेक कस्ताही खाल्ल्या .लोकांची शेती केली, सावकारी कर्ज काढले, घरावरची पत्रे विकली, फळांची झाडे विकली पण आपल्या मुलाला शिकविले. संत गाडगेबाबा यांचे विचार प्रत्यक्षात उतरविले.
प्राचार्य डॉ. लहाने सरांचे प्राथमिक शिक्षण लहानेवाडी येथेच झाले. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कामधेनू विद्यालय माकेगाव येथे मराठी माध्यमात झाले. इयत्ता १२ वी विज्ञानचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर येथून झाले. महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथून बी.ए.ची पदवी परीक्षेत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून इंग्रजी विषयात एम.ए.चे पदव्युत्तर शिक्षण घेतले.एम.ए.ला ते विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले.
शिक्षण संपताच त्यांना एक वर्ष महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे अधिव्याख्याता म्हणून सेवा करण्याची संधी स्व. प्राचार्य कॅप्टन ढोबळे यांनी दिली. ज्या महाविद्यालयात विद्यार्थी राहून तीन वर्ष अध्ययन केले त्याच महाविद्यालयात अध्यापनाची संधी मिळणे हा दुर्मिळ गौरव त्यांच्या वाट्याला आला. त्यानंतर १९९५ ते २०१० पर्यंत श्री.व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा जि.बुलढाणा येथे इंग्रजीचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून काम केले. काही काळ तिथेच प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. सन २०१० पासून मान. मानवेंद्र केंद्रे यांनी अपार कष्टाने उभे केलेल्या संभाजीराव केंद्रे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जळकोट येथे पूर्णवेळ प्राचार्य म्हणून ते आजपर्यंत कार्यरत आहेत.
प्राध्यापक म्हणून नोकरी करताना राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी सुमारे आठ वर्षे काम केले. तीन वर्षे विभागीय समन्वयक म्हणून काम केले. जाफराबाद, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील विविध गावे दत्तक घेवून जलसंवर्धन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आदी कार्यक्रम राबविले.कब्रस्तान मध्ये हिंदू - मुस्लिम विद्यार्थी- विद्यार्थिनी मिळून श्रमदान करून अनेक झाडे लावली. अण्णा हजारे, विजयअण्णा बोराडे, पोपटराव पवार आदी समाजभूषण व्यक्तींना दत्तक ग्रामी आणले. राष्ट्रीय सेवा योजना चळवळ लोकाभिमुख केली.अतिशय साध्या आणि अशिक्षित समाजातून पुढे येवून थोरल्या भावासोबत मजुरीचे काम करून, इंग्रजी विषयात पीएच.डी. करून प्राचार्य होणे यासारखी झेप या व्यक्तिमत्वाने घेतली असून वाचन, भाषण, लिखाण इत्यादी कलेत ते निपुण आहेत.
संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळून ग्रामीण भागातील महाविद्यालय आज मोठ्या शहरातील प्रस्थापित महाविद्यालयाची बरोबरी करत आहे. दोनदा नॅक मानांकन मिळवून "बी प्लस " दर्जा मिळणारे ते ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळे सरांची निवड नॅक समिती सदस्य म्हणून झालेली आहे. महाविद्यालयातील सुमारे १५ प्राध्यापकांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने लघुशोध प्रबंध गेल्या दोन वर्षात मंजूर केले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण मध्ये महाविद्यालयास "अ " श्रेणी प्राप्त झाली आहे. जळकोट सारख्या ग्रामीण भागातील असंख्य मुलामुलींनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळ व सांस्कृतिक विभागात पारितोषिक प्राप्त केली आहेत. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी सिरम इन्स्टिट्यूट सारख्या नामांकित संस्थेत नोकरीस लागले आहेत. एकंदरीत महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख डॉ. लहाने सरांच्या नेतृत्वाखाली उंचावत आहे. अर्थातच त्यांना मान. मानवेंद्र केंद्रे यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या सहकाऱ्यांची साथ आहेच!!
आज प्राचार्य डॉ बी टी लहाने यांचा ५४ वा वाढदिवस!! त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊ या.
*शंकर बोईनवाड*

COMMENTS