राजर्षी शाहू महाराज: समाज परिवर्तनाचे धीरोदात्त पुरस्कर्ते* (लेखक:डॉ.अजय गव्हाणे

                आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या, महाराष्ट्राची सामाजिक चेहरेपट्टी बदलण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या...

                आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या, महाराष्ट्राची सामाजिक चेहरेपट्टी बदलण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या थोर तेजस्वी महापुरुषांच्या मालिकेत आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची गणना होते. शाहू महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रबोधनाच्या चळवळीमुळे सध्याचे परिवर्तन घडून आले आहे. शाहू महाराजांची भूमिका केवळ तत्त्वचिंतकाची नसून कृतिशील समाज सुधारकाची होती. सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणण्यावर त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रित केले होते. सामाजिक समता व न्याय या तत्त्वांचा त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर पाठपुरावा केला. अन्याय, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज माणसाच्या विकासाच्या वाटा खुल्या होऊ शकणार नाही; याची खूणगाठ मनाशी बांधूनच त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली.

               शाहू महाराजांच्या सामाजिक क्रांतिकारक कार्याचा आवाका केवळ कोल्हापूर संस्थानापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या झुंजार व्यक्तिमत्त्वाची पकड उभ्या महाराष्ट्रावर बसलेली होती. कोल्हापूरपासून जवळ असलेल्या माणगाव येथे इ. स. १९२० मध्ये भरलेल्या परिषदेमध्ये भाषण करताना बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे बोट दाखवून त्यांनी 'इथून पुढे हेच तुमची पुढारी' असा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजनांनी आपल्या मुक्ततेसाठी आणि सामाजिक व आर्थिक न्याय व समतेच्या प्रस्थापनेसाठी आपले आंदोलन चालू ठेवावे, असा सल्ला दिला.

               शाहू महाराजांची दूरदृष्टी शेतकरी आणि कामगार यांना जे त्यांनी मार्गदर्शन केले त्यात प्रगट होते. यावरून काळाच्या किती पुढे त्यांच्या विचाराची मजल गेली होती, हे दृष्टीपथास येते. शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांनी पिढीजात व जुन्या शेती करण्याच्या पद्धती सोडल्या पाहिजेत व नवीन मार्गांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. त्यांनी कामगारांना सांगितले की, मजूर व कारागीर यांनी नवनवीन कसब, तांत्रिक ज्ञान व विज्ञान शिकण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. आर्थिक संपन्नता औद्योगीकरणावर अवलंबून आहे. लोकांनी एकत्र येऊन सहकारी कारखाने, सोसायटी व मार्केटिंगची व्यवस्था राबविली पाहिजे. कोल्हापूर संस्थान त्याकरिता सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे.

               श्रमजीवी जनतेने आपल्या वर्गसंघटना बांधल्याखेरीज त्यांना सत्ता काबीज करता येणार नाही; तसेच त्यांचे आर्थिक प्रश्नही सुटणार नाहीत, हे शाहू महाराजांनी जाणले होते. कामगारांनी आपल्या ट्रेड युनियनस काढल्या पाहिजे, असे सांगणारा दुसरा एकही संस्थानिक शोधून सापडणार नाही. वर्गसंघर्षावर भर देत असतानाच संघर्षाचा अंतर्विरोधही लक्षात ठेवण्याचे भान त्यांनी दाखवले होते.

                महात्मा फुले यांच्याप्रमाणेच शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक सुधारण्याच्या कार्यात शिक्षणाला प्रमुख स्थान दिले होते. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीच निपजणार नाही; म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे, अशी त्यांची विचारसरणी होती. 

               अखिल भारताच्या राजकारणाचा संदर्भ त्यांच्या दृष्टीसमोर होता. आधुनिक भारताच्या एकराष्ट्रीयत्वावर त्यांची श्रद्धा होती.एकराष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ व स्थिर व्हावयाची असेल तर आपल्या सार्वजनिक जीवनात आपण जाती धर्मनिरपेक्षतेचे दृढ अनुसंधान राखले पाहिजे. आपल्या संस्थानात त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना सारखेच अधिकार व वागणूक दिली होती. समाजाचे जे जे घटक गुलामगिरीच्या पाशात अडकले होते त्या सर्वांबद्दल त्यांना सहानुभूती होती. बालविवाह, पडद्याची चाल, सक्तीचे वैधव्य, आंतरजातीय विवाहास प्रतिबंध इ. स्त्रीदास्य विमोचनाच्या प्रश्नावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी आर्थिक प्रश्नाचीही दखल घेतली होती. शाहू महाराजांची महत्तमता त्यांच्या उत्कट आचारनिष्ठेत आहे. 'बोले तैसा चाले' या उक्तीचा उल्लेख करून त्यांनी स्वतः आपण आपल्या निष्ठेपासून ढळणार नाही, असा ठाम निर्धार केला. शेती सुधारणेकडे त्यांनी लक्ष दिले. धरणे बांधून हरितक्रांतीचे बीजारोपण केले. शाहू मिल्सची उभारणी करून उद्योग व्यवसायाच्या प्रगतीचे पाऊल रोवले. शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवून व्यापाराकडे जनतेला वळवले. मल्लविद्याला उत्तेजन देऊन बलोपासना वाढवली. नाट्य, संगीत या कलांचा पुरस्कार करून कोल्हापूर ही कलानगरी केली. शिल्पकला, चित्रकला इ.कडेही त्यांनी तितकेच लक्ष पुरविले. असा हा व्यापक दृष्टीचा, उदार अंतकरणाचा, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांच्या प्रतिस्थापनेसाठी आजन्म झगडणारा, रंजल्या गांजल्यांचा कैवारी, नवयुगाचा निर्मितीकार आहे.

               थोर पुरुषांचा गुणगौरव कसा करावा, याबद्दल स्वतः शाहू महाराजांनीच जो विचार मांडला आहे; त्याचे आपण सदोदित स्मरण ठेवून तो अमलात येण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. आपल्या देशातील थोर विभूतीला बहुमान व आदर दाखवण्याचा एकच मार्ग म्हणजे त्यांनी दर्शवलेला कित्ता गिरवणे व त्यांच्या मार्गाचे अवलंबन करणे, हा आहे. शाहू महाराजांच्या विचारांचे व कृतीचे मर्म या विचारात साठवलेले आहे. समाज परिवर्तनाचे एक धीरोदात्त पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे नाव इतिहासात अजरामर राहील. नवविचारांनी क्रांतीचा गाडा पुढे नेणारे, आर्थिक समता सांगणारे, जन्मजात संपत्तीच्या मालकीविषयी पुनर्विचार करायला लावणारे, निधर्मी राज्याची कल्पना समाजात दृढ करणारे असे राजर्षी शाहू महाराज हे एक थोर कृतीशील विचारवंत आहेत.

                  -डॉ.अजय वसंतराव गव्हाणे,

                       राज्यशास्त्र विभागप्रमुख,

                  यशवंत महाविद्यालय, नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group