यासंदर्भात खा. डॉ. अजित गोपछडे यांनी नवी दिल्ली येथे माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री एल. मुरुगन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री महोदयांनीही या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
पत्रात खा. डॉ. गोपछडे यांनी नमूद केले आहे की, नांदेड आकाशवाणी केंद्र अनेक वर्षांपासून स्थानिक शहरी ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. विशेषतः कीर्तन, भजन आणि लोककला यांसारख्या पारंपरिक कला प्रकारांना आकाशवाणीच्या माध्यमातून मोठे प्रोत्साहन मिळत होते. शिवाय शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादाई कार्यक्रम प्रसारित करण्यात येत होते. मात्र, सध्या तांत्रिक अडचणीमुळे सायंकालीन कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे नांदेड आकाशवाणी केंद्र अधिक सक्षम करून त्याची प्रसारण क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच नांदेड एफएम केंद्राची प्रसारण क्षमता मर्यादित असल्याने जिल्ह्यातील अनेक ग्रामीण आणि सीमाभागांमध्ये एफएम सेवा स्पष्टपणे पोहोचत नसल्याचे त्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. नांदेड एफएम केंद्राचे क्षमतावर्धन झाल्यास संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना माहिती, मनोरंजन, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठा लाभ होईल. ग्रामीण भागातील कला आणि स्थानिक प्रतिभेला नवे व्यासपीठ उपलब्ध होऊन परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासालाही चालना मिळेल, असे खा. डॉ. गोपछडे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण कलाकार, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्र अधिक सक्षम करण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात एफएम प्रसारण सुविधा प्रभावीपणे उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

COMMENTS