माहूर(प्रतिनीधी)उन्हाचा कडाका वाढत असतानाच माहूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील सुमारे २० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, प्रशासनाच्या कूर्मगती कारभारामुळे ग्रामस्थांना थेंब-थेंब पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पंचायत समितीकडून विहीर अधिग्रहण आणि टँकरचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात माहूर तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, हे माहीत असूनही यंदा प्रशासनाने गांभीर्य दाखवले नाही. मे महिन्याचा पंधरवडा उलटून गेल्यानंतर आता कुठे पंचायत समितीने विहीर अधिग्रहण आणि टँकरचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत. या विलंबाचा फटका दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील महिला आणि मजुरांना बसत असून, रणरणत्या उन्हात भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
मागील वर्षी देखील पाणीटंचाईच्या निवारणासाठी करण्यात आलेले प्रस्ताव त्रुटीयुक्त आणि उशिरा सादर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित केलेल्या विहिरींचा मोबदला वेळेत मिळाला नव्हता, तर अनेक गावांना टँकरची प्रतीक्षा करावी लागली होती. यंदाही तोच 'Pattern' पाहायला मिळत असल्याने प्रशासनाने मागील चुकांतून कोणताही धडा घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
तालुक्यातील बहुतांश गावातील सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे.
प्रामुख्याने डोंगराळ भागातील २० गावांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
ज्यांना शक्य आहे ते नागरिक खाजगी टँकरने पाणी विकत घेत आहेत, तर गरीबांना वणवण चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
दरवर्षी टंचाई सोसते, पण प्रशासनाला जाग येत नाही. मे महिना अर्धा संपला तरी टँकर सुरू न होणे हे दुर्दैवी आहे.
आता सर्व लक्ष तहसील प्रशासनाकडे लागले आहे. पंचायत समितीकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तातडीने मंजूर करून, प्रत्यक्ष गावपातळीवर पाणी कधी पोहोचते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
प्रशासकीय दिरंगाईमुळे जनतेचा घसा कोरडा झाला असुन आता तरी यंत्रणा जागी होणार का? हाच प्रश्न माहूर तालुका विचारत आहे.

COMMENTS