डॉ. सावंत यांची आजवर ६० पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ३५ पुस्तके बालसाहित्याची आहेत. त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार आणि अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ४५ पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि दै. सत्यप्रभाचा सौ. कुसुमताई शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पुणे येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी संपादन केली आहे. अनेक विद्यापीठांत त्यांच्या बालसाहित्यावर संशोधन होत आहे.
डॉ. सुरेश सावंत यांची १) वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती, २) बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, ३) आजची मराठी बालकविता, आणि ४) बालसाहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत. डॉ. सावंत यांनी कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे, तसेच पळसप (जि. धाराशिव) येथे झालेल्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. सावंत यांनी १४५ पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत किंवा पाठराखण केली आहे. अलीकडेच त्यांच्या साहित्याविषयी राजगुरुनगर येथील प्राचार्य साईनाथ पाचारणे यांनी 'डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता : आशय, शैली आणि समीक्षा' हा ग्रंथ लिहिला आहे.

COMMENTS