राम दातीर माहूर (प्रतिनीधी )बनावट कागद पत्रा आधारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा रक्कम उचलल्याच्या गंभीर प्रकरणात माहूर न्यायालयाने दि. 12 मे रोजी वाईबाजार येथील रहिवाशी साजिद माजिद खान व मोईन माजिद खान यांचे विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश सिंदखेड पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सरकारी योजनेतील निधीचा गैरवापर झाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वाई बाजार येथील रहिवाशी प्रथमेश प्रमोद उपगनलावार यांनी माहूर न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात वाई बाजार येथील गट क्र. 200 व 201 ही जमीन त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची असल्याचे नमूद केले आहे. संबंधित जमिनीवर साजिद माजिद खान व मोईन माजिद खान यांनी बनावट कागदपत्रे तयार करून प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी विमा दावा मंजूर करून घेतल्याचा आरोप केला आहे.साजिद खान व मोईन खान यांनी दुसऱ्याच शेतातील पिकांचे फोटो वापरून आणि खोटे पुरावे सादर करुन गट क्र. 200 करिता 17 हजार 734 रुपये तर गट क्रमांक 201 साठी 9 हजार 981 रुपयांची विमा रक्कम उचलली असल्याचा उल्लेख प्रमोद उपगनलावार यांनी आपल्या दाव्यात केला होता.या संदर्भात अर्जदाराने यापूर्वी सिंदखेड पोलीस स्टेशन तसेच नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने तक्रार, प्रतिज्ञापत्र तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला, आणि प्रथमदर्शनी फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती व कटकारस्थान यांसारखे गंभीर दखलपात्र गुन्हे झाल्याचे दिसून येत असल्याचे आपल्या निकालात म्हटले आहे. या शिवाय हा केवळ खासगी वाद नसून सरकारी योजनेतील निधीच्या गैरवापराशी संबंधित गंभीर प्रकार असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.सदर प्रकरणी
माहूर न्यायालयाचे न्यायाधीश बी. ए. अग्रवाल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 175(3) नुसार सिंदखेड पोलिसांना संबंधितांविरुद्ध एफआयआर नोंदवून सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS