माहूर (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील जंगलात वन्यप्राण्यांचे अस्तित्व नाकारणाऱ्या वनविभागाच्या दाव्याची लक्तरे आज वेशीवर टांगली ग...
माहूर (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील जंगलात वन्यप्राण्यांचे अस्तित्व नाकारणाऱ्या वनविभागाच्या दाव्याची लक्तरे आज वेशीवर टांगली गेली. पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकत असलेला एक बिबट्या मौजे गोकुळ येथील शेतशिवारातील विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रभर विहिरीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या या बिबट्याला गुरुवारी (दि. १९) सकाळी वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या साह्याने सुखरूप बाहेर काढून जेरबंद करण्यात आले.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, माहूर तालुक्यातील गोकुळ शिवारात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. तहानेने व्याकुळ झालेला एक बिबट्या बुधवारी रात्री पाण्याच्या शोधात भटकत असताना अचानक शिवम यमजलवार यांच्या विहिरीत पडला. विहिरीतून बाहेर पडणे अशक्य असल्याने बिबट्याने रात्रभर विहिरीच्या कड्याचा आसरा घेतला. गुरुवारी सकाळी विहिरीतून विचित्र आवाज येत असल्याचे लक्षात येताच शेतकरी यमजलवार यांनी पाहणी केली, असता त्यांना बिबट्या दिसून आला. त्यांनी तात्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले आणि वनविभागाला पाचारण केले.
अधिकारी कामात, वन्यप्राणी वाऱ्यावर! माहूर तालुक्यात बिबट्या, अस्वल आणि रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असून सातत्याने मानवी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. असे असतानाही वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी तालुक्यात बिबट्या नसल्याचा दावा केला होता. मात्र, आजच्या घटनेने त्यांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे. वनविभागाकडून जंगलात वन्यप्राण्यांसाठी पानवठे तयार करण्यासाठी कागदोपत्री कोट्यवधी रुपये खर्च दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात प्राणी पाण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.रेस्क्यू टीमचा अभाव आणि नागरिकांची दहशत वारंवार मागणी करूनही माहूरला स्वतंत्र रेस्क्यू टीम देण्यात आलेली नाही. आजच्या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर, कर्मचारी आणि पिंटू पाटील वायफणीकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मोठ्या हिमतीने बिबट्याला बाहेर काढले. बिबट्या जेरबंद झाला असला तरी, अद्यापही परिसरात रानडुकरे आणि अस्वलांची दहशत कायम आहे. वनविभागाने केवळ विकासकामांच्या फाईल्समध्ये मग्न न राहता वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS