नांदेड (प्रतिनिधी) : नकारात्मकता आणि जातीयवादाचे चक्र तोडण्याचा वैज्ञानिक फॉर्म्युला व समाधान कांशीरामजी यांनी दिले आहे. त्यानुसार सामाजिक विंग्सच्या माध्यमातून गावे जोडावित आणि राजकीय विंग्सच्या माध्यमातून जागृती करावी असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने नाईकनगर नांदेड येथील मयूर टॉकीज परिसर येथे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षीय समारोप प्रसंगी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या प्रशिक्षणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, जोपर्यंत संपूर्ण राजकीय सत्ता प्राप्त करणार नाही तोपर्यंत मी आराम करणार नाही असे म्हणत वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय तत्वज्ञ असलेल्या मान्यवर कांशीरामजी यांनी शारीरिक परिस्थितीने मजबूर होऊन आपला प्राण त्यागला. त्यांच्या पश्चात आज बहुजन चळवळ गतप्राण झाली आहे. बहुजन चळवळीतील जणू आत्माच हरवला आहे.
ही बहुजन चळवळ पुनर्जीवित करायची असेल तर भारतीय संविधानाला हत्यार बनवून राजकीय शक्ती तयार करावी लागेल. त्यानंतर कांशीरामजी यांच्या प्रमाणे आपला स्वतःचा मिडिया बनवावा लागेल. क्षेत्रीय भाषेत आपले मुखपत्र आणि वृत्तपत्र आपण छापले पाहिजेत. आपल्या प्रशिक्षण संस्था उभारल्या पाहिजेत, आपले बहुजन फोर्स तयार करावेत तसेच लेखक विचारवंत चिंतक मोठ्या प्रमाणात चळवळीत जोडावे लागणार आहेत. चमचा युग संपवून सर्व बहुजनांनी एक होऊन सत्ता ताब्यात घ्यावी त्याशिवाय भारतात संपूर्ण सामाजिक परिवर्तन होऊ शकणार नाही असेही विचार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी मांडले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड आणि महिला नेत्या सौ. मंगल रमेश दुधंबे यांनी मान्यवर कांशीराम जी यांच्या जीवन कार्यावर सविस्तर अभ्यासपूर्ण विचार मांडले. सामाजिक संघटन मजबूत केल्याशिवाय राजकारण यशस्वी होऊ शकत नाही असे कांशीराम जी यांनी दाखवून दिले असे विचार गुणवंत मिसलवाड यांनी मांडले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा कांशीराम जी यांनी पुढे चालविला, तो आता आपणाला पुढे चालवावा लागेल असे मत सौ. मंगल दुधंबे यांनी यावेळी व्यक्त केले. युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांना वाचविण्यासाठी एखादी मोहिम हाती घेण्याचे आवाहन जमात ए इस्लामी हिंदचे सदस्य मोहसिन खान यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्य संघटक उत्तम गायकवाड यांनी केले तर शेवटी युवा नेते हणमंत उतकर यांनी आभार मानले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शेख नूर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. इंजि. अ. खवी साब, के. के. कांबळे, सोनाजी ढाकणीकर, राम सागुरे, विपुल देगलूरकर, सुशील हराळे, संजय बनसोडे, शशी काळे, गौरव जाधव, सौ. अनिता देगलूरकर, सौ. प्रियंका देगलूरकर, सौ. डिंपल साळे, सौ. शिंपल उतकर, सौ. पार्वती वाघमारे, सौ. रुक्मिणीबाई खोतकर, सौ. सुशीला वराळे, सुनिता जोगदंड, सविता वाडकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चर्मकार व बहुजन समाजाचे कांही नवीन सोबती सोबत घेऊन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद हे अराजकीय सामाजिक संघटन नव्याने शिस्तबद्धपणे सक्रीय करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या शिबिरात घेण्यात आला.

COMMENTS