या ऑनसाइट भेटीदरम्यान शास्त्रज्ञ डॉ. दिनेश जगताप , वैज्ञानिक अधिकारी, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई तसेच प्रा. संजय पेक्कमवार, RGST समन्वयक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, कार्यक्षमता, टिकावू स्वरूप आणि आदिवासी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम यांचा सविस्तर आढावा घेतला.
झेंडीगुडा हे गाव किनवटपासून सुमारे ४५ किमी अंतरावर असून महाराष्ट्र–तेलंगणा सीमेपासून केवळ ३ किमी अंतरावर आहे. अतिदुर्गम व डोंगराळ भागातील गेल्या १७ वर्षांपासून वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या या आदिवासी भागासाठी हा प्रकल्प आशेचा किरण ठरला आहे. सौर आणि पवन ऊर्जेच्या संयोगातून उभारण्यात आलेला हा पहिल्यांदाच राबविण्यात आलेला हायब्रिड मिनी ग्रीड प्रकल्प असून त्यामार्फत २० आदिवासी घरांना थेट वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
या वेळी गावातील गोंड आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक नृत्यसादरीकरणाद्वारे पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाला सरपंच देवराव धुर्वे, स्थानिक आदिवासी ग्रामस्थ, तसेच प्रा. साईनाथ पांचाळ आणि प्रा. सौरव राऊलवार यांची उपस्थिती लाभली.
प्रकल्पामुळे लाभार्थी आदिवासी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असून, “वीज म्हणजे फक्त दिवा नव्हे तर शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि आधुनिक जगाशी जोडणारा पूल” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा उपक्रम त्यांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल घडवत आहे.
अशा प्रकारचे थेट लाभ देणारे, तळागाळातील खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचणारे प्रकल्प अत्यंत मोजके असतात. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने सशक्त करण्यासाठी हा प्रकल्प एक आदर्श व प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.

COMMENTS