अर्धापूर (जि. नांदेड) : रस्त्यावर सांडणारे निष्पाप रक्ताचे सडे आणि कायदा-सुव्यवस्थेचा ढासळलेला स्तर... या विरोधात दाभड परिसरातील ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. गेल्या काही दिवसांत झालेल्या सलग तीन मृत्यूंच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या दाभड, शेलगाव आणि बामणी परिसरातील नागरिकांनी आज राष्ट्रीय महामार्गावर तीव्र 'चक्का जाम' आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावर ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दाभड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून शोककळा पसरली आहे. एकामागून एक घडलेल्या तीन घटनांनी संपूर्ण तालुका हादरला असून १० फेब्रुवारी रोजी अनुसयाबाई बालाजी जाधव (४५) यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर २७ जानेवारी रोजी कलावतीबाई सुभाष तारडे (५०) यांचा अपघाती मृत्यू झाला तर
२८ जानेवारी पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी (६५) यांची निर्घृण हत्या झाली.या लागोपाठच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. "रस्ते मृत्यूचे सापळे बनले असताना प्रशासन झोपले आहे का?" असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
आज सकाळी दाभड पाटीजवळ हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तब्बल ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडली होती. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या भुयारी मार्ग
१५ हजार लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी भुयारी मार्ग तातडीने बांधावा. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आवश्यक सिग्नल आणि गतिरोधक बसवावेत, मृत कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी.
प्रशासनाची धांधल आणि ग्वाही....
आंदोलनाची तीव्रता पाहता महामार्ग प्रकल्प संचालक महेश पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
अखेर, "दाभड पाटीजवळ भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरू होईल," अशी लेखी ग्वाही राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरण चे प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी दिली. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, "प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल," असा इशारा ग्रामस्थांनी जाता-जाता दिला आहे.

COMMENTS