लोहा (जिल्हा नांदेड):
स्वतःची हक्काची रजा मंजूर करून घेण्यासाठी एका प्राथमिक शिक्षकाकडे ३ हजार रुपयांची लाच मागणारा आणि ती स्वीकारणारा लोहा पंचायत समितीचा केंद्रप्रमुख दिगांबर रामचंद्र शिंदे (५७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. सोमवारी (१६ फेब्रुवारी २०२६) दुपारी ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
तक्रारदार शिक्षक सन २०१८ पासून जिल्हा परिषद शाळा भाद्रा (ता. लोहा) येथे कार्यरत आहेत. त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक कारणास्तव ४६ दिवसांची अर्जित रजा (Earned Leave) मंजूर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज दिला होता. आरोपी दिगांबर शिंदे हा मूळचा केंद्रप्रमुख असला तरी, लोहा पंचायत समितीच्या आस्थापना विभागात लिपिक म्हणून काम पाहत होता.
तक्रारदाराने रजेबाबत विचारणा केली असता, शिंदे याने सुरुवातीला स्वतःसाठी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी ४ हजार रुपयांची मागणी केली. 'पैसे दिले तरच रजा मंजूर होईल', असे त्याने स्पष्ट सांगितले होते.
पडताळणी आणि सापळा
तक्रारदाराने याप्रकरणी एसीबी नांदेडकडे धाव घेतली. १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, शिंदे याने तडजोडीअंती स्वतःसाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. या माहितीच्या आधारे आज १६ फेब्रुवारी रोजी लोहा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला.
शिंदे याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम ३ हजार रुपये स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक सॅमसंग मोबाईल आणि २,७०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
पुढील कारवाई
सध्या लोहा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीच्या घराची झडतीही घेतली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता चव्हाण, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार आणि पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांच्या पथकाने यशस्वी केली.

COMMENTS