नांदेड: "महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर दिलेला जास्त भर होय. भाषेचा साधेपणा आणि लवचिकता कमी होत असल्याने वाचन संस्कृतीचा विकास खुंटत आहे," असे परखड मत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त 'वाचन: साद आणि प्रतिसाद' या विषयावर ते बोलत होते. सायन्स कॉलेजच्या पुरणमल लाहोटी सभागृहात रंगलेल्या या अनौपचारिक संवादात डॉ. विश्वाधार देशमुख यांनी त्यांना बोलते केले.
संवादातील मुद्दे:
साहित्य ॲप्रिसिएशन कोर्सेसची गरज: फिल्म ॲप्रिसिएशनप्रमाणेच साहित्यातील सौंदर्य आणि रसास्वाद समजण्यासाठी 'साहित्य ॲप्रिसिएशन' कोर्सेसची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.
दलित आत्मकथांचे महत्त्व: दलित आत्मकथांमध्ये वैचारिक क्रांतीची प्रचंड ताकद असून, त्यांनी साहित्याला नवी दिशा दिली असल्याचे कर्डिले म्हणाले.
मोबाईलचे आक्रमण: सध्याच्या युगात 'रील्स'च्या सततच्या बंबार्डिंगमुळे तरुण पिढीची वाचन आवड कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
व्यक्तिगत प्रवास: आपले वडील शिक्षक असल्याने घरात वाचनाचे वातावरण मिळाले; अगदी सलूनमध्ये जाऊनही वर्तमानपत्र वाचल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
या कार्यक्रमात त्यांनी यशवंतराव चव्हाण, नारायण सुर्वे, ग्रेस, वपु काळे आणि विंदा करंदीकर अशा दिग्गज साहित्यिकांच्या लेखनाचा संदर्भ दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब पांडे यांनी केले, तर आभार प्रा. शामल पत्की यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व रसिक उपस्थित होते.

COMMENTS