बालकुमारांच्या भावविश्वातील आणि अनुभवविश्वातील विविध विषयांवरील आशयसंपन्न कवितांद्वारे मुलांसाठी मनोरंजनातून मिळणारा ज्ञानाचा खजिना डॉ. सावंत यांनी खुला केला आहे. ज्ञान, रंजन आणि संस्कारांची उत्तम सांगड या कवितासंग्रहात दिसून येते. बालकुमार वयातच मुलांच्या मनाची मशागत करून त्यांच्यात आवश्यक ती जाणीवजागृती सहज-सुंदररीत्या हा संग्रह करतो, हे कविता वाचताना प्रत्ययाला येते.
'नदी रुसली, नदी हसली' या पहिल्याच कवितेत भौतिक प्रगतीच्या हव्यासापायी माणसांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे नदीमाय रुसल्याचे कवी सांगतो-
'माऊलीच्या मनाला, मानवी बेईमानी डसली
नदीमाय रुसली, आमची नदीमाय रुसली !'
पर्वतराजाची ही लाडकी राजकन्या, कडेकपारीतून रांगत-लोळत-दौडत-पळत जाणारी ही अवखळ पोर आता धरणाच्या गाळात फसली आहे. जगन्माता, माऊली, नदीमाय म्हणवणाऱ्या, कधीही खंत न करणाऱ्या या नदीआईला रुसायला मानवी अप्पलपोटेपणाने भाग पाडले आहे. हे सांगतानाच तिला हसवण्याचा मूलमंत्रही कवीने दिला आहे-
'कोरड्या नदीपात्राला एकदा नांगरून तर पाहा
तिच्या हक्काची वाळूची शाल पांघरून तर पाहा
बारमाही पुन्हा नदी वाहताना दिसेल
नदीमाय हसेल! माझी नदीमाय हसेल!'
पर्यावरणरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या आणखीही काही कविता या संग्रहात आहेत. 'अन्नदाता' या कवितेतील शेतकरी म्हणतो-
'झाडांना वेलींना
मी माझा श्वास देतो
रोज नव्या पिकांतून
मी पुन्हा जन्म घेतो'.
झाडे, वेली, माती यांची निगा राखण्याबद्दल सांगतानाच 'पेरल्याशिवाय उगवत नाही', हे जीवनाचे सूत्रही कवी सांगतो.
मुलांमध्ये आपली शाळा आणि आपला वर्ग यांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता हे भाव वृद्धिंगत करणाऱ्या 'विद्यालय गीत', 'स्वर्गासारखा वर्ग', 'माझी शाळा' या कविता या संग्रहात आहेत. शाळेतल्या वर्गात अवांतर वाचनाचा आनंद देणारी 'वाचनपेटी' असावी. तिच्यामुळे मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. मुलांना वाचनाचे महत्त्व आणि फायदे या कवितेतून सांगताना कवी मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजवतो. वर्गात वाचनपेटी आल्यावर मुलांना अलिबाबाची गुहा हाती लागल्याचा आनंद होतो.-
'ग्रंथसखा ग्रंथमित्र
आम्ही पुस्तकप्रेमी
वाचनवीर होण्याची
संधी आली नामी.
आवडलेल्या पुस्तकांवर
निबंध लिहून झाले
पुस्तकांशी मैत्री होता
मस्तक उन्नत झाले!'
मुलांमध्ये पुस्तकांबद्दल आपुलकी निर्माण करणारी ही 'वाचनपेटी' नावाची कविता. 'पुस्तक माझा मित्र' या कवितेतूनही पुस्तकांशी मैत्री असण्याचे, वाचनाचा ध्यास घेण्याचे महत्त्व कवी सांगतो.-
'पुस्तकांनी बोट धरून
अद्भुत विश्वात नेले
पुस्तकांच्या मैत्रीनेच
मला श्रीमंत केले!'
'परिपाठ' ही शाळेच्या दिनचर्येची सुरुवात. हल्ली बर्याच शाळांमध्ये दररोज एका वर्गाने परिपाठ सादर करावा, असा संकेत नित्यनेमाने पाळला जातो. मुलांनाही परिपाठ हा कला, ज्ञान, रंजन नि उत्साहवर्धनाचा उपक्रम म्हणून आवडतो. हा परिपाठ आदर्श आणि आनंददायी असावा, हे सांगणारी 'आमचा परिपाठ' ही एक उत्तम कविता या संग्रहात आहे.
'सेल्फी', 'आमच्या गल्लीतली पोरं', 'सईबाई', 'कागदाची कमाल', 'खाद्यजत्रा' या मजेशीर कविता मुलांच्या आवडीचे विविध विषय घेऊन आलेल्या आहेत. कवीने या कवितांमध्ये गमतीतूनही सहजतेने मूल्यसंस्कार दिला आहे. 'खाद्यजत्रा' या कवितेतील चॉकलेट-गोळ्यांबरोबरच खाद्यपदार्थांप्रमाणे 'चापटपोळ्या, धम्मकलाडू, तिळपापड, पाठीचे धिरडे, अकलेचा कांदा' या आलंकारिक शब्दांचा चपखल वापर केल्याने झालेली गमतीशीर रचना मुलांना आवडणारी आहे.
जीवनाच्या वाटेवरून चालताना मार्गात अनेक अडथळे येतात. या अडचणींकडे दुर्लक्ष करून आणि ते सोडवण्यात आळस करून चालणार नाही. कधीही चालढकल करू नये, आत्मविश्वासाने आलेल्या अडचणींची उकल स्वतःच करावी. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी, म्हणजे यश निश्चित मिळते, हे 'चालढकल' या कवितेत कवी सांगतो:
'इच्छाशक्तीच्या बळावर
नक्कीच तू होशील सफल
अडचणींची होईल उकल
करू नकोस चालढकल!'
वडीलकीचा हा सल्ला बालकुमारांच्या जीवनात नक्कीच उपयोगी पडेल.
डोक्यात शंकाकुशंकांचा, विविध विषयांचा गुंता घेऊन बसणाऱ्या चिंतातुराचे वर्णन करणारी 'चिंतोबा' ही गमतीदार कविता विशेष उल्लेखनीय ठरते. पावसातल्या गारांची, बरसणाऱ्या धारांची, घराची, दाराची, वाऱ्याची, ढगाची अशी साऱ्या जगाची उगीचच चिंता करणाऱ्या चिंतोबाची कविता मुले आवडीने वाचतील.
मुळातच मुलांचं जगणं आनंदमय असतं. ताणतणावांपासून दूर राहून ते सहजसुंदर, आनंदी जीवन जगत असतात. तरीही कधीकधी काही गोष्टींची भीती त्यांच्या आनंदाच्या आड येते. त्यामुळे या भीतीची अनाठायी भीती मुलांच्या मनातून काढण्यासाठी कवीने मुलांना 'आनंदाने जगण्याचा मंत्र' दिला आहे. या कवितेत कवी म्हणतो:
'भीती असते एक भावना
दुबळ्या मनातच जन्मणारी
वेडेवाकडे चाळे करून
मनाचा ताबा घेणारी.
निर्धाराने करता येतात
भीतीशीही दोन हात
आत्मविश्वासानेच होतो
भित्र्या भीतीचाच घात!'
आधुनिक युगात वावरताना जुन्या, टाकाऊ प्रथा-परंपरा, अंधश्रद्धा टाळून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा. विज्ञानाची कास धरून अज्ञानाला पळवून लावण्याचा संदेश देणाऱ्या 'चंद्रावरची प्रयोगशाळा' आणि 'विज्ञानसाक्षर होऊ' या दोन कविता या संग्रहात आहेत. याशिवाय समता, बंधुता आणि मानवतेचा मूल्यसंस्कार देणारी 'मानवतेचे मंदिर', लहरी पावसाला विनवणारी 'पावसा पावसा धाव रे', श्रावणातल्या मनमोहक निसर्गाचे सुंदर चित्रण असलेली 'श्रावण', पुष्पविविधता आणि पुष्पसौंदर्याने नटलेल्या कासच्या पठाराची 'फुलांचा डोंगर' , 'होडी चालली' , 'पर्यावरणपूरक गणपती' अशा विविध विषयांवरच्या छान छान कविता या संग्रहात आहेत.
मोबाईलच्या अतिवापराचे वास्तव चित्रण करणारी, दुष्परिणाम समजावून सांगणारी 'कर्णपिशाच्च' ही कविता मुलांना मोबाईलच्या वापराबाबत सावध करते. टीव्ही मधला सुंदर (?) राक्षस चित्रविचित्र, वेडेचाळे करतो आणि मुलांचे डोळे रात्रंदिवस टीव्हीलाच बांधून ठेवतो. मुलांचा सगळा वेळ तोच खाऊन टाकतो. त्यापासून सावध व्हायला हवे, हेही कवीने आवर्जून सांगितले आहे:
'रंगीबेरंगी राक्षस
टीव्ही मधून डोकावतो
अभ्यासाचा सगळा वेळ
तोच खाऊन टाकतो!'
कवी डॉ. सुरेश सावंत यांच्या 'नदी रुसली, नदी हसली!' या संग्रहात विविध आयाम असलेल्या अठ्ठावीस कवितांची गुंफण कवीने कल्पकतेने केली आहे. ह्या कविता मुलांना मनोरंजनाचा आनंद तर देतातच, शिवाय सदाचाराची शिकवण आणि मूल्यसंस्कार देत मुलांना विचार करायला प्रवृत्त करतात. सोप्या, सहजसुंदर, यमकयुक्त, नाद-लययुक्त शब्दयोजनेमुळे मुलांना ही कविता गुणगुणावीशी न वाटेल, तरच नवल! चित्रकार ज्ञानेश बेलेकर यांचे आकर्षक नि बोलके मुखपृष्ठ, आतील समर्पक रंगचित्रे आणि 'ग्रंथाली'ची वैभवशाली निर्मिती यांमुळे पुस्तकाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे हा संग्रह बालकुमारांच्या आणि बालसाहित्य रसिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास वाटतो.
- नदी रुसली,नदी हसली!' (बालकवितासंग्रह)
- कवी : डॉ. सुरेश सावंत
- प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
- संपूर्ण बहुरंगी पृष्ठे : ६४,
- मूल्य- १२० रु.
- पुस्तक परिचय :
- डॉ. विनोद सिनकर, छत्रपती संभाजीनगर.
- ७५८८७३६३२६/ ८९९९५७९०६६.

COMMENTS