किनवट (प्रतिनिधी): नांदेड वनविभागातील वनपरिक्षेत्र कार्यालय (प्रा.) आप्पारावपेठ अंतर्गत मौजे दयाळ धानोरा गावालगत वनविकास महामंडळाच्या जंगलाज...
किनवट (प्रतिनिधी): नांदेड वनविभागातील वनपरिक्षेत्र कार्यालय (प्रा.) आप्पारावपेठ अंतर्गत मौजे दयाळ धानोरा गावालगत वनविकास महामंडळाच्या जंगलाजवळील वन सर्वे क्रमांक ८९, कक्ष क्र. २७२ मध्ये घडलेल्या अस्वल हल्ला प्रकरणामागील कारणमीमांसा समोर आली असून, अस्वलाच्या पिल्लाच्या मृत्यूमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वनविकास महामंडळाच्या कार्यकक्षेत ९ फेब्रुवारी रोजी अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती उशिरा मिळाली होती. १० फेब्रुवारीला सकाळी त्या पिल्लाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. संबंधित घटना वनविकास महामंडळाच्या हद्दीत घडल्याची माहिती प्रशासनाने दिली असली तरी पिल्लाच्या शोधात मादी अस्वल परिसरात फिरण्याची शक्यता प्रादेशिक वन विभाग किंवा नजीकच्या ग्रामपंचायतीला कळविण्यात आली नव्हती. त्यामुळे परिसरातील शेतकरी अनभिज्ञ राहिले.
याच पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी दयाळ धानोरा येथील शेतात पिकांना पाणी देत असताना दत्ता बळीराम जाधव या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या आठ शेतकऱ्यांवरही अस्वलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
दरम्यान, नांदेड येथील उपवनसंरक्षक वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीघ्र कृती दल (RRU) तसेच साहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) नांदेड श्रीकांत इटलोड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) आप्पारावपेठ उमेश ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) इस्लापूर धनगे, बोधडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पोतूलवार आणि वन कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्लापूर उमेश भोसले व त्यांच्या पथकाच्या संयुक्त कारवाईत संबंधित अस्वलाला जेरबंद करण्यात आले.
वनविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना व जखमींना शासकीय नियमांनुसार आर्थिक मदत देण्यात येणार असून दयाळ धानोरा व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS