नांदेड: जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तब्बल १७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई काय?
दिनांक २९/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि वसंत आरसेवार व त्यांचे पथक गुन्ह्यांचा तपास करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीचे ट्रॅक्टर विक्री करण्यासाठी काही इसम भोकर फाटा येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भोकर फाटा येथे सापळा रचला आणि ६ संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. मागील एका महिन्यात त्यांनी सिंधी (ता. उमरी), मांजरम (ता. नायगाव), शेनी चिंचबन (ता. अर्धापूर) आणि लामकनी शिवार (ता. भोकर) येथून ट्रॅक्टर चोरल्याचे कबूल केले.
लोणार नदीच्या काठावरून मुद्देमाल जप्त
आरोपींनी चोरलेले ट्रॅक्टर विक्री करण्याच्या उद्देशाने दिग्रस ते देगाव जाणाऱ्या रस्त्यावर लोणार नदीच्या बाजूला लपवून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ जॉन डिअर (John Deere) आणि १ स्वराज (Swaraj) कंपनीचा असे एकूण ६ ट्रॅक्टर आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण १७,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) सुनिल मारोती सिंगणापूरे (३१, रा. सिंधी, ता. उमरी)
२) उकंडी ऊर्फ बालाजी संभाजी पवार (३७, रा. रुई, ता. हदगाव)
३) बालाजी किशन गळाफोडे (४३, रा. बाबूळगाव, जि. नांदेड)
४) ओमकार अनिल पवार (१९, रा. पाथरड, ता. हदगाव)
५) मारोती ऊर्फ बजरंग पांडूरंग तेलंग (३२, रा. रुई, ता. नायगाव)
६) उत्तम धनराज राठोड (४८, रा. मदनापूर, ता. किनवट)
या टोळीतील इतर ३ आरोपी (सचिन शिंदे, मधूकर गळाफोडे आणि शिवाजी गडमवार) अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गुन्हे उघडकीस:
या कारवाईमुळे अर्धापूर, नायगाव, भोकर आणि उमरी पोलीस ठाण्यातील ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना अर्धापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि वसंत आरसेवार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

COMMENTS