भगवान रजनीश (ओशो) यांचा जन्मदिवस दि. ११ डिसेंबर रोजी संपूर्ण देशभर आणि जगभर ओशो रजनीश प्रेमी, साधक आणि संन्यासी ध्यानधारणेमध्ये मग्न होऊन साजरा करतात.
ओशो रजनीश यांनी मानवी जीवनात ध्यानाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. मानवी जीवन आनंदी, सुखी, समाधानी आणि समृद्ध करण्यासाठी ध्यानाला कोणताही पर्याय नसल्याचे ६५० ग्रंथात आवर्जून सांगितले. तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, गुरुनानक देवजी, संत कबीर, तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती, संत मीरा, संत गोरखनाथ, भगवान कृष्ण, भगवान राम, येशू ख्रिस्त आदींवर असंख्य प्रवचनामधून प्रकाश टाकला.
भारताची अध्यात्मिक परंपरा ध्यानधारणा आणि योगासनाचे असल्याचे स्पष्ट केले. अध्यात्म व संन्यास म्हणजे संसाराचा त्याग नाही; तर मूर्खपणाचा, संकुचित आणि कोत्या मनोवृत्तीचा त्याग असल्याचे सांगितले. आजचा माणूस दुःखी, कष्टी, द्वेषभावना, घृणा, असूया यांनी लिप्त आहे. त्याच्याकडे बऱ्यापैकी आर्थिक संपन्नता, समृद्धी आलेली असतानाही तो विषादग्रस्त आहे. याचे कारण म्हणजे त्याची आंतरिक मनोवस्था डिस्टर्ब आहे. त्यावर मार्ग म्हणून एकूण ११५ ध्यानविधीचा मार्ग ओशो रजनीश यांनी सांगितला.
तथागत बुद्ध, महर्षी पतंजली यांनी ध्यानाचा या विश्वात पहिल्यांदा मार्ग सांगितला; मात्र तो काळ शेकडो वर्षांपूर्वीचा होता. त्या काळातील मानव आणि आजचा माणूस यांच्यामध्ये जमीन आसमानाचे अंतर पडलेले आहे. प्रश्नांच्या, समस्यांच्या स्वरूपामध्येही आमुलाग्र बदल झालेला आहे. चर्चेमध्ये, बोलण्यामध्ये, लेखनामध्ये माणूस हा मोठमोठी उदात्त तत्त्वे वारंवार प्रतिपादित करतो; मात्र ती तत्त्वे त्याच्या मनात, दृष्टिकोनात आणि व्यवहारात आढळून येत नाहीत. ओशो रजनीश यांनी, जसे अंत:करण तसा व्यवहार असल्याचे सांगितले. अंत:करणाला बदलण्याचा मार्ग ध्यान आहे. स्वतः त्यांनी सक्रिय ध्यान तयार केले. आजचा माणूस दमित आहे. वेळ व प्रसंगानुसार आलेला राग, हसणे, अश्रू इत्यादी भावना तो प्रतिष्ठेमुळे, सामूहिकता व सार्वजनिकतेमुळे व्यक्त करू शकत नाही.
ओशो रजनीश म्हणतात, मानवी मनात निर्माण झालेली प्रत्येक भावना व्यक्त न केल्यास ती नष्ट होत नाही; तर ती अचेतन मनामध्ये साचते. अचेतन मनात साचलेपणा जास्त वाढल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो. एखाद्या क्षुल्लक किरकोळ प्रसंगातही तो अत्यंत घातक प्रतिक्रिया देतो. स्वतःसह सर्वांनाच अडचणीत आणतो. या दमित भावनांचे निष्कासन करण्यासाठी सक्रिय ध्यान आहे. सक्रिय ध्यानाच्या एका स्टेपमध्ये ओरडणे, किंचाळणे, रडणे, हसणे व प्रतिक्रियात्मक हावभावाद्वारे हवेमध्ये हिंसा करणे आदींचा समावेश आहे. भावना ही भावना असते. ती कशाही प्रकारे व्यक्त केल्यास त्याचे निष्कासन होते; मात्र मानवी व्यवहारांमध्ये ती व्यक्त केल्यास संकटांना निमंत्रण भेटते.
भारतीय परंपरेतील विविध ध्यान अनापानसती(स्मृति) योग, नटराज, किर्तन, तथाता, नादब्रह्म, मृत्यु ध्यान आदी ध्यानांना संगीतमय रेकॉर्डिंग केले आहे. आजचा माणूस मानसिक व भावनिकदृष्ट्या जास्त किचकट व गुंतागुंतीचा झालेला आहे. निव्वळ शांत एखाद्या ठिकाणी केवळ बसल्याने तो ध्यानामध्ये प्रवेश करू शकणार नाही. असंख्य अनावश्यक विचारांचे मोहोळ त्याच्या मनामध्ये घोंगावत राहील. त्यासाठी ओशो रजनीश यांनी प्रत्येक ध्यानासाठी विधी दिलेली आहे.
मुख्य म्हणजे ओशो रजनीश यांचे प्रत्येक प्रवचन मृत्यूपासून प्रारंभ होते व मृत्यूपर्यंतच येऊन थांबते. माणूस जन्माचे स्वागत करतो; मात्र मृत्यूला नाकारतो. त्याचाच मृत्यू होतो; ज्याचा जन्म झालेला आहे. मृत्यूला देखील उत्सवाचे स्वरूप ओशो रजनीश यांनी दिले. जीवन उत्सव आहे, जीवन नृत्य आहे, जीवन गीत आहे, जीवन ध्यान आहे तसेच मृत्यू देखील उत्सव आहे. माणूस मृत्यूची चर्चा टाळतो. मृत्यूला नाकारण्याचा प्रयत्न करतो; मात्र ते शक्य नाही. मृत्यू स्वीकारणे, मृत्यूला देखील आलिंगन देणे; हे स्वीकारल्यास जीवन देखील आनंददायी होते. जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मृत्यूचा स्वीकार केल्यास माणसाच्या हातून वाईट कृत्य, कुकर्म व इतरांना त्रास देण्याची भावना आपोआपच नष्ट होते, हे ठासून सांगणारे ओशो रजनीश यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व मानवमात्रांना त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे ध्यानाची गोडी लागावी. एका माणसाला सूट झालेले ध्यान दुसऱ्याला जसेच्या तसे लागू होणार नाही. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस विभिन्न आहे, अद्भुत आहे.
आजचा माणूस जरा जास्तच व्यस्त असल्यामुळे चोवीस तासातील केवळ एक तास त्याने ध्यानधारणेसाठी काढावा. हा ध्यानधारणेचा एक तास उरलेल्या तेवीस तासांपेक्षा जास्त भारी, वरचढ, उत्कृष्ट ठरेल.
- *-डॉ.अजय गव्हाणे,*
- राज्यशास्त्र विभागप्रमुख व
- अध्यात्मिक शिक्षण समिती समन्वयक,
- यशवंत महाविद्यालय, नांदेड.

COMMENTS