मुंबई: भारतीय कामगार चळवळीच्या संघर्षातून निर्माण झालेले २९ कामगार कायद्यांचे ४ लेबर कोडमध्ये रूपांतर केले असून, हे कामगार कायदे मालक धार्जिणे व कामगार विरोधी असून, ते ताबडतोब मागे घेतले पाहिजे. त्यासाठी सर्व उद्योगातील कामगारांनी शेतकऱ्यांप्रमाणे एकजुटीने लढा देणे, ही काळाची गरज आहे. असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी इंदिरा गोदीतील जाहीर सभेमध्ये काढले.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी गोदी विभागातील आउटडोअर डॉक स्टाफतर्फे ११ डिसेंबर २०२५ रोजी श्री. संदीप घागरे यांच्या अध्यक्षतेखाली श्री. सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. याप्रसंगी झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ॲड. एस. के. शेट्ये यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले की, सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे कायम कामगारांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. ही गंभीर समस्या असून, आता भविष्यात कायम स्वरूपाच्या नोकऱ्या मिळणे फार कठीण आहे. मागण्या मिळवण्यासाठी संप हे शेवटचे हत्यार आहे, परंतु संप करण्यासारखी कामगारांची सध्या मनस्थिती नाही. चार लेबर कोड मध्ये तर संपासारखे कामगारांचे शेवटचे हत्यार देखील काढून घेतले आहे. मात्र सद्य परिस्थितीत देखील गोदी कामगार श्री. सत्यनारायणाची महापूजा घालून कामगारांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करतात. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. त्या निमित्ताने सर्व कुटुंबांच्या भेटी गाठी होतात. पूजेसाठी परिश्रम करणाऱ्या सर्व कामगार कार्यकर्त्यांचे अभिनंदन. यापुढे आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो. ही सदिच्छा.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, चार लेबर कोडबाबत कामगारांना जागृत करण्यासाठी लवकरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाईल. चार लेबर कोड बाबत सरकारने दाखविलेले आमिष खोटे असून, भविष्यात कामगारांना नोकऱ्या मिळणार नाहीत. ठराविक कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतील. चार लेबर कोड रद्द करण्याबाबत आम्ही कामगार संघटनांच्या वतीने नुकतेच मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. युनियनने आदेश दिल्यानंतर आपण सर्वांनी आंदोलनात उत्तरले पाहिजे. कामगारांना न्याय मिळविण्यासाठी संघर्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. कामगार एकजुटीच्या मार्गानेच लढा द्यावा लागेल.
याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या सत्कार सोहळ्याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी डॉ. यतीन पटेल, दत्ता खेसे, विजय रणदिवे, मनीष पाटील, मारुती विश्वासराव, निसार मीर युनूस, मुंबई पोर्टचे अधिकारी, कार्यकर्ते, कामगार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन विजय सोमा सावंत व संदेश मोरे यांनी केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा