मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे( लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम_ LMS) चे औपचारिक लोकार्पण १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळुरू येथे बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री मा. श्री. सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शिपिंगचे महासंचालक श्याम जगन्नाथन, अतिरिक्त महासंचालक सुशील मानसिंग खोपडे तसेच वरिष्ठ अधिकारी, सागरी प्रशिक्षण संस्था प्रमुख आणि उद्योगातील विविध मान्यवर उपस्थित होते. एमएससीचे कॅप्टन भसीन देखील या समारंभाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, श्री. सर्वानंद सोनोवाल यांनी कुप्पेपदवू परिसरातील नव्याने पुनर्निर्मित मंगळुरू मरीन कॉलेज अँड टेक्नॉलॉजी (MMCT) चे उद्घाटनही केले. अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा—फुल मिशन ब्रिज सिम्युलेटर, इंजिन रूम सिम्युलेटर, स्टीयरिंग व नियंत्रण प्रणाली, तसेच प्रगत LNG बंकरिंग सिम्युलेटर—यांच्या स्थापनेमुळे MMCT हा या प्रदेशातील अग्रगण्य सागरी प्रशिक्षण केंद्रांपैकी एक बनला आहे.
याप्रसंगी नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) तर्फे नौकानयन समुदायाच्या वतीने सरचिटणीस-कम-खजिनदार श्री मिलिंद कांदळगावंकर यांनी मा. मंत्रीं महोदयांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. आपल्या प्रमुख भाषणात, श्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारताच्या सागरी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सरकारची धोरणात्मक दृष्टी स्पष्ट केली. राष्ट्रीय विकास, जागतिक व्यापारातील नेतृत्व आणि युवकांना नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
Maritime India Vision 2030 (MIV 2030) अंतर्गत बंदरांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवणे, नाविक प्रशिक्षण उंचावणे आणि जागतिक सागरी पुरवठा साखळीत भारताची भूमिका विस्तारण्यावर केंद्रित उपक्रमांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. Maritime Vision 2047 या दीर्घकालीन आराखड्याशीही त्यांनी याची सांगड घातली, ज्यामध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला जागतिक दर्जाचे सागरी राष्ट्र बनविण्याचा संकल्प आहे—शाश्वत जहाजवाहतूक, स्मार्ट पोर्ट्स, हरित ऊर्जा संक्रमण, डिजिटल सागरी परिसंस्था आणि उच्च दर्जाच्या कौशल्य व स्वास्थ्य असलेले जागतिक क्षमतेचे नाविक हा त्याचा केंद्रबिंदू आहे. “सागर में योग” या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी महासंचालनालय आणि NUSI यांच्या संयुक्त प्रयत्नांचे अभिनंदन केले. भारतीय नाविकांच्या सर्वांगीण विकासात—मानसिक सक्षमता, शारीरिक तंदुरुस्ती आणि अंतर्गत संतुलन—या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. योग व वेलनेस प्रशिक्षणाचा समावेश करून हा उपक्रम MIV 2030 आणि Maritime Vision 2047 च्या उद्दिष्टांशी सुसंगत अशी निरोगी, सक्षम आणि सज्ज सागरी कार्यबल निर्मितीला हातभार लावतो, असे त्यांनी सांगितले. या लोकार्पणाने भारताच्या त्या वचनबद्धतेला नवे बळ मिळाले आहे, ज्याअंतर्गत देशातील नाविकांना तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, जागतिक स्तरावर प्रतिष्ठित आणि मानवकेंद्रित विकासावर आधारित भविष्यकालीन सागरी अर्थव्यवस्थेसाठी तयार केले जात आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा