मुंबई - भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांसाठी २७ सप्टेंबर २०२४ रोजी औद्योगीक कलह कायदा १२ (३)सी अंतर्गत इंडियन पोर्ट असोसिएशन आणि मान्यताप्राप्त सहा भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघामध्ये कायदेशीर वेतन करार झाला असून, या वेतन करारात पगारातील स्टॅग्नेशन दूर केले जाईल, कामगारांमधून बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर केला जाईल, बोनस करार त्वरित केला जाईल, या मागण्या मान्य करून देखील एक वर्ष झाले तरी देखील त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून भारतातील १२ प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांनी आज जेवणाच्या सुट्टीत केंद्र सरकारच्या या कामगार धोरणाविरुद्ध तीव्र निदर्शने केली. या मागण्या त्वरित मान्य न केल्यास भारतातील बंदर व गोदी कामगार १ डिसेंबर २०२५ पासून बेमुदत संपावर जातील, असा स्पष्ट इशारा गोदी कामगार नेते सुधाकर अपराज व केरसी पारेख यांनी केंद्र सरकारला दिला.
वेतन करारातील मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आज मुंबई बंदरात मुख्य कार्यालयाजवळ सर्व कामगार संघटनांच्या वतीने पोर्ट प्रशासन व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, वेतन करार झाला तेव्हा एक सब कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि ही कमिटी एक महिन्यात निर्णय घेईल असेही मान्य करण्यात आले होते. जे कामगार स्थापन सिनियर आहे त्यांच्यावर अन्याय झाला आहे, तो ताबडतोब दूर झाला पाहिजे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केलेला बोनसचा करार त्वरित करावा. स्थानिक भत्त्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, भारत सरकारने मुंबईत घेतलेल्या इंडिया मेरीटाईम वीकमध्ये मुंबई बंदराच्या हिताचे कोणतेही करार झाले नसून, महाराष्ट्रातील दोन खाजगी बंदरात अदानीचा विस्तार वाढविणारे करार झाले आहेत. या कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी केलेली आहे. कार्यक्रमाला गोदी कामगारांचा व अधिकाऱ्यांचा वापर केला, परंतु मुंबई पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनला व्यासपीठावर देखील घेतले नाही, ही खेदजनक घटना आहे.
याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे सचिव उदय चौधरी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिनास मेंडोसा यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी मनीष पाटील यांनी केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, विष्णू पोळ, संदीप चेरफळे, आप्पा भोसले, संतोष कदम,मीर निसार युनूस, मारुती विश्वासराव ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी आणि कामगार व निवृत्त कामगार उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा