राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) भावी पिढीच्या आरोग्याला अपायकारक असलेल्या गुटखा व सुंगधी तंबाखुच्या विक्रीवर राज्यासह संपूर्ण देशात बंदी असताना माहूर शहर व तालुक्यात त्याची धडाक्यात विक्री होत असून खुल्लेआम छोट्या छोट्या पान टपरीवर तोरण लोंबलेले दिसत असून संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
गुटखा विक्रीवर कुठलीही बंदी नसतांनाच्या काळात शाळा, महाविद्यालय परिसर व छोट्या मोठ्या दुकानातून गुटखा सहज विद्यार्थ्यांच्या हाती लागत असल्याने भावी पीढ़ी पूर्णतः गुटक्याच्या विळख्यात अडकली होती. परिणामतः देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या गुटखा विक्रीवर राज्य पातळीवर बंदी घालण्यात आली. काही काळ त्या बंदीचा चांगला परिणामही दिसून आला. नंतर मात्र बंदी घातलेल्या वस्तुच्या माध्यमातून मिळणाऱ्या अफाट पैशाने या व्यवसायाशी संबंधीत असलेले तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी हाती आलेल्या संधीचे सोने केले. बंदी असतानाही त्या वस्तु सर्वत्र सहज उपलब्ध होऊ लागल्याच्या बातम्या अनेक वृतपत्रात आल्यात मात्र ठोस कार्यवाही कुठलीही होताना दिसत नाही.
माहूर तालुका हा तेलगांना राज्याला लागून असल्याचा फायदा तस्कर घेतात. त्या राज्यातून येणारा गुटखा व शेतकऱ्यांना देशों धडिला लावणारे बोगस बियाणे, खते व किटकनाशक औषधीची मराठवाडा व विदर्भात सहज वाहतूक केल्या जात आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या सरहद्दीवरील तपासणी नाके केवळ वसूलीचे केंद्र बनले असल्याच्या वारंवार होणाऱ्या आरोपात तथ्य वाटत आहे. गुटका तस्कर कोण ? त्यांचे गोडावून व त्यात असलेल्या साठ्याची तंतोतंत माहीती असतानाही कुठलीच कार्यवाही का केल्या जात नाही ? याचे रहस्य आता सर्वांच्या लक्षात आले आहे. या प्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीच लक्ष देण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी केली आहे.
लवकरच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पुरव्यासहित रितसर निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 
 
 
addComments
टिप्पणी पोस्ट करा