यशवंत ' रसायनशास्त्र राष्ट्रीय परिषदेतील विचारधन लेखक: डॉ.अजय गव्हाणे)


           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन सोहळा दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. शंकररावजी चव्हाण मेमोरियलमध्ये संपन्न झाला.

                 या परिषदेच्या उद्घाटकीय समारोहातील काही विचारधन....... 

                माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी प्रास्ताविकात, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान पीएम उषाद्वारे प्रायोजित रसायनशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद हे खऱ्या अर्थाने बहुविद्याशाखीय व्यासपीठ आहे. या परिषदेच्या आयोजनामध्ये माजी मुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा.खा.श्री.अशोकरावजी चव्हाण यांची प्रेरणा व अमूल्य सहकार्य शब्दातीत आहे.  रसायनशास्त्रातील विविध पैलू ग्रीन केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, पर्यावरण रसायनशास्त्र मानवी जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध ठेवून आहेत. आजच्या काळात रसायनशास्त्राच्या असंख्य पैलूंवर संशोधनाची गरज आहे. त्या सर्व पैलूंवर परिषदेमध्ये फोकस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

                उद्घाटक पद्मश्री डॉ. के.एन.गणेश यांनी पुढील विचारांद्वारे परिषदेचे वैचारिक उद्घाटन केले........... यशवंत महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीकरिता प्रेरणा देणारे महाविद्यालय आहे, याची जाणीव आम्हाला होत आहे. मानवी जीवनात शिक्षणक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक, अध्यापक व प्राध्यापक म्हणून सेवा बजावणे, ही आयुष्यातील महत्त्वाची ठेव आहे. माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा ' ओमान' देशात व्याख्यानासाठी गेले असताना त्या देशात स्थायिक झालेला त्यांचा विद्यार्थी व्याख्यान ऐकण्यासाठी आला होता. माननीय राष्ट्रपतींची भेट घेतल्यावर तो म्हणाला, आपण राष्ट्रपती आहात म्हणून मी व्याख्यान ऐकण्यासाठी आलो नाही; तर आपला मी विद्यार्थी आहे. आपण मला शिकविले; म्हणून मी आपल्याला ऐकण्यासाठी आलो.

                रसायनशास्त्र ही मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. आरोग्य, स्पोर्ट्स, मेडिकल, पर्यावरण इ. क्षेत्रातील रसायनशास्त्राची भूमिका अनन्यसाधारण आहे. सर्वसाधारणपणे लोकांचा रसायनशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे तो प्रदूषणाच्या समस्येमुळे. मात्र या दृष्टिकोनामध्ये बदल झाला पाहिजे. या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही ज्यामध्ये रसायन नाही. आम्ही रसायनशास्त्राचे अभ्यासक या पृथ्वीवरील जीवसृष्टीला सहकार्य व पाठिंबा देतो. आम्ही संसाधने तयार करतो. पेट्रोल, डिझेल या इंधनांचा विचार केला तर ते किती दिवस मानवाला प्राप्त होणार? निश्चितच पर्याय शोधावा लागणार आहे. सोलर एनर्जी, बायोमास एनर्जी हा त्याला पर्याय आहे.

                आधुनिक काळात नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत; त्यामुळे रसायनशास्त्रासमोर फार मोठे आव्हान आहे. श्री.डी.पी. सावंत यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचे शिक्षण खाते असताना त्यांनी आम्हाला दिलेले सहकार्य अविस्मरणीय आहे. आयसर, पुणे या संस्थेकरिता त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 

               माजी शिक्षण राज्यमंत्री व संस्थेचे सचिव सोहळ्याचे अध्यक्ष श्री.डी.पी. सावंत यांनी, यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा केंद्रबिंदू आहे. महाविद्यालयास तीन वेळेस ए ग्रेड व चौथ्या वेळेस ए प्लस ग्रेड प्राप्त झाला; त्यासाठी इतर विभागांबरोबर रसायनशास्त्राने सिंहाचा वाटा उचलला. 

               आम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत; मात्र अकॅडमिशियनसोबत सहवास व संवाद आमच्यासाठी एक उत्कृष्ट वेळ असतो. 

               आज आपण जे काही आहोत ते रसायनशास्त्रामुळे. विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यातील उज्वलता रसायनशास्त्रामुळे निर्माण होईल. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे. या प्रगतीचा पाया रसायनशास्त्र आहे. विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण रसायनशास्त्राद्वारे व्हावे. विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ प्राप्त व्हावे. ज्ञानाचा अभाव म्हणजे जीवनाचा अभाव. राष्ट्रीय परिषदेद्वारे ज्ञान निर्मिती, संवर्धन व हस्तांतरण होण्याचे कार्य व्हावे.

               विचारमंचावर प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, आयआयटी, रूपर येथील प्रो. नरिंदर सिंघ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील प्रो. बापूराव शिंगटे, एनसीएल, पुणेचे डॉ.एच.डी. सावंत, सिनजेन इंटरनॅशनल कंपनी, हैदराबादचे डॉ. ओमप्रकाश बंडे, विभागप्रमुख डॉ.एम.ए.बशीर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ.विजय भोसले यांनी केले. आभार डॉ.एम.ए.बशीर यांनी मानले.

                               -डॉ. अजय गव्हाणे,

                        राज्यशास्त्र विभागप्रमुख, 

                   यशवंत महाविद्यालय, नांदेड.

टिप्पण्या