डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
लाडोबा' हा यंदा बाजारात ऐटीत दाखल झालेला बालकुमारांसाठीचा पहिला दिवाळी अंक आहे. ह्या अंकात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सहा साहित्यिकांचे लेखन प्रकाशित करून लाडोबाने सुपर सिक्सर मारला आहे. अप्रतिम अशा १२ कथा, ८ कविता, १ नाटिका, १ ललितलेख आणि ५ प्रेरणादायी लेख असा भरघोस मजकूर ह्या अंकात वाचायला मिळतो. संपादक घनश्याम पाटील यांच्या संपादकीय लेखावरून ह्या अंकाच्या परिपूर्ण स्वरूपाची कल्पना येते. आबा गोविंदा महाजन यांची 'दप्तराची गोष्ट' ठोंब्याच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देऊन जाते.एकनाथ आव्हाड यांची 'आम्ही दोघे भाऊ' ही गोष्ट लहान मुलांना असलेली जबाबदारीची जाणीव अधोरेखित करते. संगीता बर्वे यांची 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' ही कथा 'काय भुललासी वरलिया रंगा' असा संदेश देऊन जाते.
'नकोशी झाली हवीशी' ह्या माझ्या कथेबद्दल मी काय बोलणार? बालकांसह पालकांनीही ही गोष्ट वाचून विचार करायचा आहे. नेहमीप्रमाणेच राजीव तांबे यांची 'माइंड रीडर मशीन' अद्भूतरम्य आहे. भारत सासणे यांची 'राक्षसाच्या तावडीत अभय - निर्भय' ही नाटिका बालकुमारांना वेगळ्या विश्वात घेऊन जाते.याशिवाय ह्या अंकात छान छान अशा आणखी सात कथा आहेत. सत्यवान सुळकर यांची 'गणिताचा पेपर' ही कथा अभ्यासाची आयडिया शिकविते. डॉ. कैलास दौंड यांची 'चंद्री' मुक्या जीवांचा लळा-जिव्हाळा दाखवून देते. नागेश शेवाळकर यांच्या 'माझी प्रिय सखी'मधील अनुजाने गरिबी आणि श्रीमंतीमधली दरी पुसून टाकली आहे. आशा पैठणे यांची 'पुलो डियर' ही एक धमाल गोष्ट आहे! या गोष्टीत लेखिकेने कल्पनारम्यता आणि अद्भुतरम्यतेचा छान संयोग साधला आहे. बहीण भावाच्या खोड्या दाखवणारी विनायक दिनकर ढवळे यांची 'गंमत' ही गोष्ट मुळातून वाचायला हवी. यात आपणच आपल्याला भेटू, शार्दुल आणि ईराच्या रूपात. संदीप वाकचौरे यांची 'आय लव्ह यू आजोबा' ही कथा खाडकन् डोळे उघडते. दोन पिढ्यांतील गैरसमज दूर करून टाकते. अनुजा कुळकर्णी यांचं 'शाळेसमोर असलेलं ते बुचाचं झाड' फारच लोभस आहे.
राहुल तांबोळी यांनी 'तव धैर्याचा एक अंश मिळू दे' ह्या लेखात कु. धैर्या विनोद कुलकर्णी हिच्या गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीचा फारच छान परिचय करून दिला आहे! तसेच विनोद कुलकर्णी यांनी 'धनुर्विद्येतील बाणेदार तारा' ह्या लेखात आदिती स्वामी हिच्या धनुर्विद्येतील तेजस्वी कामगिरीची तितकीच प्रभावी ओळख करून दिली आहे. हे दोन्ही लेख बालकुमारांना, त्यातही मुलींना क्रीडाक्षेत्रात आपली पायवाट निर्माण करण्यासाठी बळ देणारे आहेत. महाराणी ताराबाई हा ज्योती घनश्याम यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्यांनी आपल्या 'रणरागिणी ताराराणी' ह्या लेखात ताराबाईंचे मुलखावेगळे कार्यकर्तृत्व अधोरेखित केले आहे.
डॉ. शकुंतला काळे यांनी 'शहाण्या वाक्यांचा खजिना' ह्या लेखात लोकजीवनातील म्हणींचे महत्त्व सांगितले आहे. बालसाहित्यात ललितलेख अभावानेच लिहिले जातात. उमेश वाघेला यांनी 'पारिजातक : सुगंधी आठवण' ह्या लेखात ही उणीव भरून काढली आहे. ह्या लेखाच्या पानोपानी पारिजातकाचा परिमल दरवळतो आहे.
आश्लेषा महाजन यांच्या चार कविता म्हणजे अलभ्य लाभ आहे. ह्या कवितांमध्ये निसर्गाचे नितळ सौंदर्य उतरले आहे. उत्तम सदाकाळ, प्रशांत केंदळे, ललिता सबनीस आणि समृद्धी दामले यांच्याही कविता वाचनीय आहेत. श्रीराम मोहिते यांचे सुलेखन नेत्रसुखद आहे!
प्रत्येक मजकुरासोबत क्यूआर कोड दिले आहेत. ते स्कॅन करून त्या कथा, कविता आणि लेख ऐकण्याची सोय केली आहे. ह्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वाचकांची मोठीच सोय झालेली आहे. 'बोलका लाडोबा' ही ह्या अंकाची ओळख खरोखरच लक्षणीय आहे. अंकाची निर्मिती अंतर्बाह्य सुंदर आहे! २५० रुपयांत ११४ पृष्ठांची रंगीत आणि वाचनीय मेजवानी म्हणजे दिवाळीची अप्रतिम भेट आहे! सुजाण पालकांनी आपल्या बालकांना ही भेट अवश्य दिली पाहिजे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा