मूल्यभान जपणाऱ्या साहित्यकृतींचा लेखाजोखा : 'अक्षरवाटा' व्यंकटेश सोळंके, नांदेड

प्रा. डॉ. मथु सावंत यांनी गेली चार दशके विविध वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केलेले आहे. सामाजिक जाणिवांपेक्षा सामाजिक हस्तक्षेप वाढत असलेल्या ह्या काळात सडेतोड भाष्य करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. हल्ली वाङ्मयातील मूल्यभान याकडे कानाडोळा होत आहे. गटातटांच्या राजकारणात प्रतिभासंपन्नता मागे पडत आहे. साहित्यिक व साहित्याची उपेक्षा होत आहे. सकस साहित्यकृती बाजूला पडत आहेत. ते वाचलं जाऊन त्यावर चर्चा होणे ही काळाची गरज आहे. त्या गरजेतूनच 'अक्षरवाटा' ह्या समीक्षाग्रंथाची निर्मिती झालेली आहे. लेखिकेने प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृतींबरोबर त्यांच्या वाड्.मयीन व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला आहे. सत्य प्रखरपणे मांडणा-या या ग्रंथातील वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्यकृती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणूनच डॉ. मथु सावंत यांनी चिकित्सा व परामर्श घेण्यासाठी ह्या साहित्यकृती निवडलेल्या आहेत.

▪️▪️

'संमेलनाध्यक्षाची आत्मकथा' या ग्रंथावर भाष्य करताना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या स्वभाव आणि अंतरंगाचा शोध ह्या लेखातून घेतलेला आहे. विद्वान, व्यासंगी, बंडखोर, हरहुन्नरी, हरजवाबी आणि बिनधास्त अशा व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या लेखातून उजागर केले आहेत. सत्यासाठी विद्वत्ता व बंडखोरी करणाऱ्या या लेखकाचा निर्भिडपणा हा गुणविशेष अधोरेखित केला आहे. संमेलनाध्यक्ष होणं अवघड नसतं, पण त्यासाठी लढावी लागणारी लढाई अवघड असते. त्याची झळ कुटुंबाला भोगावी लागते. संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर लेखकाने अनेक पातळ्यांवर लढलेल्या लढाईच्या अवघड वाटा लेखिकेने या 'अक्षरवाटा' ग्रंथात मांडलेल्या आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ठाई असलेला बंडखोरपणा सगळ्यांना दिसतो, पण लेखिकेने त्यांच्यातील संवेदनशीलता व माणुसकीचे अनेक पैलू लेखातून मांडले आहेत.त्यामुळे लेख वाचत असताना राजकारणापेक्षा साहित्यातील राजकारण व अराजकता फार टोकाची आहे, हे वाचकांच्या लक्षात येते.

▪️▪️

डॉ.‌ नागनाथ कोत्तापल्ले हे बहुमुखी प्रतिभेचे विचारवंत व समाजचिंतक होते. त्यांनी सातत्याने समकालीन राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणातील अनेक खाचखळगे उजागर करण्यासाठी कादंबरी ह्या वाङ्मयप्रकाराचा आधार घेतला आहे. स्वान्तसुखाय लेखन करणारे ते कलावादी लेखक नव्हते, तर विकृत व सलणाऱ्या प्रवृत्तींवर परिवर्तनवादी लेखन करणारे समाजवादी लेखक होते. कवितासंग्रह, सात कथासंग्रह व तीन कादंब-या त्यांच्या नावावर आहेत. तीनही प्रकारांत त्यांना राज्यशासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. 'गांधारीचे डोळे' या कादंबरीत त्यांनी राजकारण व समाजकारणाचे बदलते स्वरूप चित्रित केले आहे. कादंबरीत नुसत्या व्यक्ती नाहीत, तर त्यांच्या वृत्ती- प्रवृत्ती वेगवेगळ्या रंगात रंगविलेल्या आहेत.कादंबरीत नारायण कल्लोळी हा कार्यकर्ता आणि कुसुम यांची तरल व असफल प्रेमकथा गुंफलेली आहे. सहवास, धडपड व धडाडी यातून प्रेमाचे तरल नाते तयार झालेले  असते. कादंबरीत अनेक मर्म व मथितार्थ तपशीलवारपणे येतात. प्रतिमा व प्रतीके यातून कादंबरी आशयपूर्ण होते. अशा पद्धतीची निरीक्षणे डॉ. मथुताई सावंत यांनी 'मूल्याधारित संघर्षाची पताका : गांधारीचे डोळे' या लेखात भाष्य केले आहे.सावित्रीचा निर्णय' हा डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा दीर्घ कथासंग्रह आहे. नवरा म्हणजे परम दैवत, स्त्री सत्वाचं मोल फार मोठं असतं, असे संस्कार घेऊन सावित्री वाढलेली होती.नवरा देवाघरी गेल्यावर तिला परंपरेनुसार सती पाठवण्याची तयारी होते. तिला सरणावर अग्नी देण्याची तयारी झालेली असते. अग्नी पायाजवळ येऊन पोहचताच ती चित्तेवरून उडी मारते. जीवाच्या आकांताने धावत सुटते. कुलटा, चांडाळीण असे म्हणत तिच्या मागे तलवारधारी पळत सुटलेले असतात. लेखकाने या साहित्यकृतीतून सरंजामशाही मनोवृत्तीचा बुरखा फाडून टाकलेला आहे. सावित्रीने तिच्यावर झालेले संस्कार बाजूला ठेवून आपल्या अंतर्मनाचा निर्णय घेतला आहे. ही कथा नव्या इतिहासाची पाऊलवाट अधोरेखित करते.सरस्वतीबाई व सविताबाई ह्या गणेशपंतांच्या दोन पत्नी. सरस्वतीबाईला उशिरा मूल होते. मुलाला बापाचे व्याजबट्ट्याचे व्यवहार आवडत नसतात, म्हणून तो विरक्त होऊन हिमालयात निघून जातो. मग सरस्वतीबाई स्वतःला समजावतात. ते दुख एकटीचे असते. दुःख पोरकं असते. मग दुःखाची माय आपणासच व्हावे लागते.मोलकरीण रूक्मिणबाईला घरात सर्व सुखी राहावेत, असे वाटते. फेकल्या अन्नावर पोसला जाणारा अश्राप जीव तो.डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांची भाषाशैली चित्रदर्शी आहे.‌ कथा निवेदनप्रधान असल्या तरी वातावरणनिर्मिती करणाऱ्या आहेत. स्त्री बाहेरून शांत संयमी असली, तरी तिच्या आतील द्वंद्व अफाट आणि अचाट आहे. श्रद्धावान स्त्रिया वेळ आल्यावर अंधश्रद्धा कशा प्रकारे फेकून देतात? नेमकं स्त्रीत्व म्हणजे काय? स्त्रियांचे अंतरंग उलगडण्यासाठी लेखिकेने कथेतील दाखले दिलेले आहेत.

▪️▪️

राजन गवस हे कादंबरीच्या माध्यमातून ‌समकालीन समाजव्यवस्था मांडणारे वास्तववादी लेखक आहेत. अनुभवसंपन्न निरीक्षणे त्यांच्या कादंबरीतून येतात. हुंदका कवितासंग्रह, चौंडकं, भंडारभोग, कळप, धिंगाणा, तणकट आणि  ब-बळीचा ह्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. संवेदनशीलपणे ग्रामीण स्थित्यंतरांचा खूप सूक्ष्म व बारकाईने अभ्यास केला आहे. जागतिकीकरणाच्या झंझावातात दिशाहीन झालेल्या तरूणाईच्या व्यथित व बधीर करणाऱ्या क्षणांनी ते नेहमी अस्वस्थ होतात. माणसे हीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा आहेत. उपेक्षित, परिघाबाहेरील, शोषित समाजव्यवस्थेचा निरंतर शोध म्हणून त्यांच्या साहित्यकृतीकडे बघावे लागते. कथा- कादंबरीत जे मांडता आले नाही, ते 'कैफियत' या ललित लेखसंग्रहातून राजन गवस यांनी मांडलेले आहे. त्यांच्या 'कैफियत' ह्या ललितसंग्रहात विषयांची विविधता आहे. यातील बऱ्याच लेखांमधून उसवलेल्या व नासलेल्या किळसवाण्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य केले आहे. त्यांनी व्यवस्थेचे किळसवाणे रूप जगासमोर आणले आहे. ग्रामीण भागातील बेकारी, तेथील बिनलग्नाची तरूणाई हा संशोधनाचा विषय लेखकाने पोटतिडकीने मांडलेला आहे. समकालीन शासनव्यवस्थेचे खुनशी व्यवस्थापनच, सामाजिक ऱ्हासाच्या गुंत्यास कारणीभूत आहे, अशी त्यांची धारणा आहे.गर्दीला जिभा फुटल्या, झाडं सावलीशी खेळतात, परिस्थितीच्या कचाट्यात माणसांना कीड लागते. ज्ञानाचा आणि शिक्षणाचा आता संबंध उरलेला नाही. राजन गवस यांच्या लेखनातील अभ्यासपूर्ण अशी निरीक्षणे 'अक्षरवाटा' या ग्रंथात मांडली आहेत.डाॅ. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेल्या ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ या ग्रंथात  राजन गवस यांच्या तेरा कथा आणि तीन ललितलेख आहेत. त्यात तेरापैकी पाच म्हणजे सर्वाधिक कथा स्त्री जाणिवेच्या आहेत. तीन कथा ह्या गावपातळीवरील विविध संघ, कारखाने यातील कमालीचे राजकारण या विषयावर आहेत. तीन कथा मानवी नातेसंबंधांवर आहेत. 'खांडूक' ही जोगत्या आणि जोगतिणीच्या विस्कटलेल्या जीवनावरची कथा आहेत.  'एक होता कावळा' या कथेत लेखकाने ग्रामीण भागातील श्रद्धा - अंधश्रद्धेचा गुंता उलगडून दाखवला आहे. तेरापैकी दहा कथा ह्या व्यक्तीचित्रणात्मक आहेत. ढव्ह आणि लख्ख ऊन' या संपादित ग्रंथावरील लेखात डॉ. मथु सावंत यांनी राजन गवस यांच्या समग्र लेखनशैलीचा लेखाजोखा मांडला आहे. स्त्रीशोषण, प्रणय, वासना, खंगलेपणा, उद्ध्वस्तता, अंतर्मनातील नग्नता इत्यादी भावनांचे आवेग त्यांच्या कथेत आलेले आहेत. राजन गवस यांच्या कथा समकालीन समाजजीवनाचा आरसा आहेत. सांस्कृतिक परिमाणे व गावगाड्यातील व्यथांचे प्रतिबिंब या कथांमधून येतात. वृद्धांची दैना, उपेक्षा आणि वंचना या कथांचा आत्मा आहे. गावगाडा, सामाजिक संस्कृतीचे प्रतिबिंब व जनजाणिवेची अक्षरगाथा म्हणजे राजन गवस यांच्या कथा आहेत, असे डॉ. मथु सावंत यांनी राजन गवस यांच्या समग्र लेखनाबाबत भाष्य केलेले आहे. संपूर्ण साहित्यकृतीचा बारकाईने व अभ्यासपूर्ण असा आढावा घेतला आहे.

▪️▪️

लेखक, संपादक आणि कृतिशील विचारवंत म्हणून ज्ञानेश महाराव यांची भूमिका मोलाची आहे. त्यांनी दोन नाटके व बावीस वैचारिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर नुसत्या प्रतिक्रिया न देता त्यावर उत्तरे शोधून, उपाययोजना केलेल्या आहेत. विचारांचा प्रसार हीच विचारजतनाची किंमत असते. प्रबोधनकारांचे विचार केवळ वाचायचे नसतात, तर ते कृतिशील असतात .राष्ट्रीय प्रेम व बेगडी दिखाऊपणा त्यांनी लेखांतून मांडलेला आहे.ज्ञानेश महाराव हे नुसते मार्गदर्शक नव्हेत, तर क्रियाशील व्यक्ती आहेत. त्यांच्या आक्रमक लेखणीला कृतिशीलतेची जोड मिळाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र विदर्भाच्या दिवास्वप्नांना त्यांनी आपल्या लेखांतून मांडले. महाराष्ट्र अखंड राखण्यासाठी स्थापन झालेल्या संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. कृतिशील पत्रकारिता हल्ली दुर्मिळ झाली आहे. अशा काळात ज्ञानेश महाराव यांच्या लेखनाने अनेक गरजू व्यक्तींना आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या चळवळींना सेवाभावी संस्थांना लक्षावधी रुपये अर्थसहाय्य मिळवून दिले आहे . जुने कालबाह्य झालेल्या काळात नवीन चांगले समाजोपयोगी काम प्रस्थापित करण्याची ताकद त्यांच्या लेखनातून कार्यकर्त्यांना मिळते.

▪️▪️

'भुई भुई ठाव दे' ही सीताराम सावंत यांची कादंबरी. सगळं हरवून बसलेल्या या अस्थिर समकाळात पायापुरती जमीन, तहानेएवढे पाणी व थोडेसे सुख अशी माफक व प्रांजळ अपेक्षा असतानाही, जगणं मुळासकट उपटून टाकलेल्या ग्रामीण, कौटुंबिक व ग्रामीण राजकारणातून माणसं बाहेर येऊ शकत नाहीत. नियोजनाच्या अभावामुळे भूमिपुत्र शेतीतून हद्दपार झालेले आहेत. अशी शोकांतिका या कादंबरीत सीताराम सावंत यांनी मांडलेली आहे.जागतिकीकरण हे शेती व शेतकरी यांना अस्थिर करते. वाळूचे कण रगडता तेल गळते, ही म्हण खरी ठरते आहे. सध्या वाळूची शेती भरभराटीला आलेली आहे. पिकाची शेती कालबाह्य होत आहे. माफिया, गुंड यांचे दिवस आले आहेत. पोटापाण्याच्या प्रश्नात अनेक कुटुंबे मातीत मिसळून गेली आहेत. स्त्रीभ्रूणहत्या, गर्भलिंग चाचणी यामुळे मुलामुलींचे प्रमाण असंतुलित झाले आहे. त्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलांचे मार्केट ढासळून मुलीचे मार्केट वधारले आहे. शहरीकरणामुळे चंगळवाद आलेला आहे. चंगळवाद व पैसा यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरांनी खेड्यांच्या पोटावर पाय दिलेला आहे. ग्रामीण रीतीभाती व परंपरा कालबाह्य झालेल्या आहेत. पूर्वी ग्रामीण भागातील माणूस मेला तर गावात चूल पेटत नसे. पण या सूतक संस्कृतीचे शहरी संस्कृतीत आता सोयरसूतक राहिलेले नाही. ग्रामीणता नष्ट होऊन प्रगतीचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनजीवन अस्थिर व विचलित झाले आहे. जागतिकीकरणाचे आव्हान ग्रामीणतेला सोबत घेईल का नाही, शाश्वती लेखकाला नाही. वाढते बांधकाम व रस्ते यामुळे शेतीसंस्कृतीतील भूमिपुत्रांना हद्दपार केले आहे. शेतीसंस्कृतीचे  भंगार झाले आहे. शेती सांभाळत आधुनिकतेचे आव्हान ग्रामीण संस्कृतीने स्वीकारायला पाहिजे, अशी सीताराम सावंत यांनी कादंबरीतून मांडलेली तपशीलवार तळमळ. डॉ. मथु सावंत यांनी कांदबरीचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक तळमळीचा पट 'अक्षरवाटा' या ग्रंथात मांडलेला आहे.

▪️▪️

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. केशव बा. वसेकर यांचे हिरवा ऋतू, चुटकी आणि इतर कविता, बत्तीस तारीख, रानवारा व झाड आणि चिमणी या कवितासंग्रहांवर डॉ. मथु सावंत यांनी भाष्य केले आहे. कवीने पाऊस शब्दांत बाधला आहे. हिरव्या रंगाची त्यांची बाराखडी बालकांना निखळ आनंद देणारी आहे. अंगणातील झाड व रानमेव्याचे महत्त्व या कवितेत आलेले आहे. माणसं पक्ष्यांसारखी हवेत उडू लागली तर? मांजरीचे डोके किटलीत अडकले तर? उंदीर डब्यात अडकला तर? साप निघाला तर? अशा अनेक कुतुहल व प्रश्नांतून कवीने मुलांना विचार करायला भाग पाडले. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला आहे. हसरी मुलं व रडकी मुलं यातील तुलनात्मक कविता मुलांना जगण्याचे मार्ग दाखवते.आत्मानंदासाठी लिहिलेली कविता बालकांना आत्मशोध घ्यायला लावते व आत्मशोध घेते, असे डॉ. मथु सावंत यांचे प्रा. केशव बा. वसेकर यांच्या साहित्यकृतीबाबत मत आहे.

▪️▪️

सुचिता खल्लाळ यांनी त्यांच्या 'डिळी' ह्या कादंबरीत ग्रामीण जीवन, तेथील अशिक्षित स्त्रियांचे कौटुंबिक जीवनावर होणारे परिणाम व त्यांच्या कणखर भूमिका मांडलेल्या आहेत. शोभाचा नवरा गणेश घरजावई आहे. नवऱ्याला आपल्या बोटांवर नाचवणारी पत्नी मुलांच्या भवितव्याबाबत हस्तक्षेप करते. मुलीला श्रीमंत घरची सून व मुलाला बीअरबारचा मालक बनवण्याचे ध्येय बाळगून असते. शंभू हा गणेशचा भाऊ. त्याची पत्नी गोदा. कुडाच्या झोपडीत अठराविश्व दारिद्रयाचे जीवन जगत असते. मुलांना शिकवायचे म्हटले, तरी जवळ पैसा नाही. झोपडीला असलेल्या संपूर्ण डिळ्या अधू झालेल्या असतात. फक्त गोदाच्या माहेरहून आणलेल्या सागाच्या डिळीने घर तग धरून असते. गणेशचा शंभूला काडीचा आधार नसतो. शोभा ही पैशाच्या जोरावर मुलांच्या शिक्षणासाठी विरोध करते. गोदा पैसा नसल्याने इच्छा असूनही लेकरांना शिकवू शकत नाही. एकाच कुटुंबात असा विरोधाभास आहे. शिकणाऱ्याला शिक्षण मिळत नाही. ज्यांना मिळते त्यांना घेऊ दिलं जात नाही. गणेश आणि शंभू यांचे वैवाहिक जीवन, त्यातील बारकावे, तसेच गोदाचे कंगाल जीवन आणि शोभाचे पुढारलेपण या कादंबरीत आले आहे. एकाच कुटुंबातील ही विषमता यावर लेखिकेने फारच छान भाष्य केले आहे. 'डिळी' या कादंबरीतील समकाल, समाजकारण, अर्थकारण, शेतीव्यवस्था, दारिद्रय, ऊसकामगार, किळसवाणी श्रीमंती, राजकारण, रुढी परंपरा या गोष्टी समीक्षेमध्ये डॉ. मथु सावंत यांनी समर्पकपणे टिपलेल्या आहेत.

▪️▪️

सर्वत्र स्पर्धा वाढलेली आहे. निकोप स्पर्धेला नैसर्गिक व नैतिक बळ मिळण्याऐवजी मुस्कटदाबी होते. साहित्यातही अशीच स्पर्धा आहे. ह्या पवित्र क्षेत्रातही निकोप स्पर्धा राहिलेली नाही. साहित्यात सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. प्रतिभावंतास उपेक्षेला सामोरे जावे लागते. अशा काळात स्वतंत्र विचारांवर बंधने येतात. खरं बोलायला बंदी व खोटं बोलणाऱ्यांना संधी मिळते. डॉ. मथु सावंत यांनी साहित्य व त्यातील जीवघेणे राजकारण याविषयी सडेतोड विचार मांडले आहे.स्त्रियांची कौटुंबिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती आणि त्यातील बारकावे या ग्रंथात आले आहेत. एकाच घरातील वैचारिक मतभिन्नता व कौटुंबिक जडणघडणीवर होणारे परिणाम हा विषय लेखिकेने मांडलेला आहे. तसेच श्रद्धा व अंधश्रद्धा यांचे सामाजिक दुष्परिणाम लेखिकेने मांडले आहेत. गुलामीत जीवन जगणाऱ्या उच्चविद्याविभूषित माणसाचे स्वातंत्र्य व अल्पशिक्षिताची मक्तेदारी यातून कौटुंबिक परिस्थितीवर होणारे परिणाम या ग्रंथात आलेले आहेत.रचनात्मक कार्य व पत्रकारिता ही राष्ट्रउन्नती व राष्ट्रहिताची रूपरेषा ठरवू शकते. यातून सामाजिक व देशहिताचे प्रश्न सुटू शकतात, असे विचार यात वाचायला मिळतात.गावपातळीवरील राजकारण, गुंडगिरी व माफीया राज यामुळे सामाजिक अधोगती होत आहे. सुशिक्षित बेकार, शेतीची नापिकी, मुलामुलींच्या प्रमाणातील असंतुलन व कौटुंबिक कलह यावर या ग्रंथात लेखिकेने भाष्य केले आहे. जोगतिणींच्या  आयुष्यातील जीवघेणी कसरत व त्यांचे अनेक प्रश्न, उपेक्षित व शोषित समाजाच्या जगण्यातील संघर्ष, वास्तव भयानकता, कारखानदारी, संघ व संस्था यातील घाणेरडे राजकारण व त्यामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम डॉ. मथु सावंत यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी साहित्यिक, कार्यकर्ता व सामाजिक भान ठेवून सामाजिक उन्नतीसाठी मूल्यभान ठेवून लिहिलेल्या साहित्यकृतींचा 'अक्षरवाटा' या ग्रंथात सूक्ष्म व अभ्यासपूर्ण घेतलेला लेखाजोखा, दिशादर्शक व समकालीन संदर्भ ग्रंथ म्हणून एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो.   

समीक्षाग्रंथ : 'अक्षरवाटा' 

लेखिका : डॉ. मथु सावंत 

प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे. 

किंमत : ३२४/- रु. 

पृष्ठे : २१६

टिप्पण्या