नांदेड दि. ११
सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. मथुताई सावंत यांना पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'अक्षरवाटा' ह्या समीक्षाग्रंथाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २ नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक ही न्या. रानडे, लोकमान्य टिळक इ. समाजधुरीणांनी १८९४ साली स्थापन केलेली आणि नावारूपाला आणलेली ध्येयवादी संस्था आहे. पूर्वी ह्या संस्थेचे नाव 'डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी' असे होते. १३१ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या ह्या संस्थेचा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो. ही संस्था फक्त संशोधनपर आणि वैचारिक ग्रंथांनाच पुरस्कार देऊन गौरविते.
'अक्षरवाटा' हा ग्रंथ पुण्यातील चेतक बुक्स ह्या प्रकाशनाने अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे.
डॉ. मथुताई सावंत यांची २० पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे ३ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांना दमाणी साहित्य पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, पुणे मसापचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार असे एकूण २४ साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण स्त्री हा त्यांच्या चिंतनाचा आणि लेखनाचा विषय आहे. 'तिची वाटच वेगळी' ही त्यांची कथा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारावीच्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यात आली होती. त्यांचा 'तिची वाटच वेगळी' हा कथासंग्रह स्वा. रा. ती. म. विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता.
साहित्याच्या इतिहासात 'मराठवाड्यातील पहिल्या महिला ग्रामीण कादंबरीकार' अशी त्यांची नोंद झाली आहे. त्यांनी बीड, कुंटूर आणि बरबडा येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. मथुताई सावंत ह्या पीपल्स कॉलेजमध्ये मराठीच्या प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
ग्लोबल मराठवाडा च्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐
addComments
टिप्पणी पोस्ट करा